नीरज राऊत

अनुभवाच्या जोडीने उद्योजकाकडे शोधक दृष्टी व नवनवीन प्रयोग करण्याची तयारी असली तर शैक्षणिक पात्रतेवर मात करून ‘चिनी’ उत्पादनांशी स्पर्धा करता येते. डहाणूतील उद्योजक दीपक रमेश मेस्त्री यांनी स्वयंपाकासाठी वापरावयाच्या भांडय़ातील विविध वस्तूंच्या उत्पादनाद्वारे हे दाखवून दिले आहे. त्यांची साठहून अधिक उत्पादने निर्यात होत असून त्यापैकी अनेक उत्पादनांना गेल्या २० वर्षांपासून सातत्याने मागणी मिळत आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक संकटे किंवा मंदीचे सावट आले की त्यामधून संधी शोधण्याची दृष्टी लाभलेल्या या उद्योजकाने नवनवीन उत्पादने तयार करून हॉटेल आणि बार व्यवसायासाठी लागणाऱ्या युटेन्सिल्समध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे.

पालघर जिल्ह्य़ातील डहाणू येथे राहणारे दीपक मेस्त्री यांचे १९७९ मध्ये दहावीपर्यंत शिक्षण के.एल. पोंदा हायस्कूल येथून झाले. घरच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेण्याऐवजी त्यांनी मुंबई येथे टूल व डायमेकिंग क्षेत्रात नोकरी स्वीकारली. वडिलांच्या डहाणू येथील लहानशा वर्कशॉपमध्ये त्यांचा बालपणापासून वावर असल्याने त्यांना अभियांत्रिकी कामांची आवडवजा जुजबी माहिती होती. औद्योगिक क्षेत्रातील अनुभव प्राप्त केल्यानंतर त्यांनी शासनाच्या सुशिक्षित बेरोजगारांसाठीच्या योजनेतून २५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य घेतले आणि १९८१ साली डहाणूमध्ये स्वतंत्र वर्कशॉप सुरू केले. त्यामध्ये त्यांनी प्रारंभी इलेक्ट्रिक बल्ब होल्डरची निर्मिती सुरू केली. मेल्ट्रॉन या कंपनीला ते अनेक वर्षे त्याचे उत्पादन देत असत. शीट मेटल कम्पोनन्ट्स क्षेत्रांमध्ये त्यांनी अनेक उत्पादने बनवण्याचे काम हाती घेतले. पुढे स्टेनलेस स्टीलपासून इलेक्ट्रॉनिक्स, हॉटेल व बार व्यवसायातील भांडी, स्वयंपाकघरातील भांडी, कटलरी वस्तू उत्पादन करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. सद्य:स्थितीत ते साठहून अधिक वेगवेगळे प्रकारचे उत्पादन तयार करीत आहेत.

या व्यवसायात १९८५ मध्ये त्यांचे भाऊ  विवेक सोबतीला आले. सध्या या भावंडांचे श्री गणेश इंजिनीअरिंग आणि अ‍ॅक्युरेट कम्पोनन्ट्स असे दोन स्वतंत्र उद्योग कार्यरत आहेत. दीपक मेस्त्री यांच्यासोबत उच्चशिक्षण घेऊन त्यांचे चिरंजीव चैतन्य गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असून २५ गुंठे जमिनीवर असलेल्या त्यांच्या या वर्कशॉपमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ८०-९० कामगार कार्यरत आहेत.

डहाणू येथे स्थित या उद्योगातून उत्पादित होणाऱ्या या अनेक वस्तूंची निर्यात केली जाते. विपणन (मार्केटिंग) करण्याऐवजी दर्जेदार उत्पादनाकडे त्यांचा कल असल्याने त्यांनी आपला स्वतंत्र ब्रॅन्ड विकसित केला. नावीन्यपूर्ण उत्पादन विकसित करण्यातील त्यांची हातोटी असल्याने अनेक निर्यातदारांनी त्यांना नवनवीन उत्पादने विकसित करण्याची संधी दिली. या कामी त्यांच्याकडे असलेले इन-हाऊस टूल रूम, प्रेस शॉप, स्पिनिंग अ‍ॅण्ड रोलिंग, फिनिशिंग शॉप, इलेक्ट्रोपॉलिशिंग, विनाईल कोटिंग, इंजेक्शन मोल्डिंग, स्विझ्झिंग, पॅकेजिंग असे विविध विभाग कार्यरत आहेत.

त्यांच्या उत्पादनांना गेल्या वीस वर्षांपासून ‘रिपीट ऑर्डर्स’ मिळत असून ही उत्पादने चीनच्या उत्पादनापेक्षा दर्जाने व किमतीने सरस ठरत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांच्या उत्पादनांना मागणी आहे. अद्ययावत राहण्याची त्यांची कार्यपद्धती तसेच नवनवीन उत्पादने विकसित करण्याच्या त्यांच्या शोधक दृष्टीमुळे त्यांना मर्यादित शिक्षणाची अडचण भेडसावली नाही. ३५ वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या कंपनीचे संकेतस्थळ तयार केले होते तसेच वीस वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या फॅक्टरीमध्ये सीसीटीव्ही प्रणाली बसवली. त्याचा आपल्याला विविध टप्प्यांत लाभ झाल्याचे ते सांगतात. वेगवेगळ्या वस्तूंच्या उत्पादनांमध्ये स्वयंचलित प्रणाली (ऑटोमेशन) आणण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहिला असून त्यामुळे उत्पादकता वाढवणे तसेच किफायतशीर दरात उत्पादन करणे हा त्यांचा प्रयत्न स्पर्धेत टिकून राहण्यास कारणीभूत ठरला.

आई-वडिलांच्या आशीर्वादाने आणि दिवंगत अरुण लोखंडे यांच्याकडून प्रेरणा घेऊन तसेच अण्णा डहाणूकर व पुरुषोत्तम डहाणूकर यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक मेस्त्री यांनी सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. समाजाच्या शैक्षणिक, आरोग्य व इतर उपक्रमांमध्ये त्यांच्या सक्रिय सहभागाची नोंद घेऊन पांचाळ समाजाने २०१६ मध्ये ‘पांचाळ भूषण’ या पुरस्काराने त्यांना गौरविले. सध्या ते पांचाळ समाज ट्रस्टचे व श्री दत्त मंदिर ट्रस्टचे विश्वस्त तसेच श्री पांचाळ समाज मध्यवर्ती मंडळाचे उप-कार्याध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या जुन्या वर्कशॉपच्या जागेच्या लगतच्या श्री दत्त मंदिराचा जीर्णोद्धार करून परिसर विकसित करण्यास महत्त्वपूर्ण सहभाग दिला.

उत्पादकता वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे तसेच नवनवीन उत्पादने तयार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांची उत्पादने सध्या १४ देशांमध्ये निर्यात होत आहेत. करोनाच्या पाश्र्वभूमीवर चीनकडून येणाऱ्या उत्पादनांवर अनेक देशांनी र्निबध लादले असताना श्री गणेश इंजिनीअरिंग वर्क्‍समधील उत्पादनांना सध्या चांगले दिवस आले आहेत. कल्पकता, निरीक्षणशक्ती व अभियांत्रिकी क्षेत्रातील जुजबी माहिती असणाऱ्या व्यक्तीला कोणतेही नवीन उत्पादनाच्या सर्जनात उच्च शिक्षणाचा अभाव आडवा येत नाही हे दीपक मेस्त्री यांनी आपल्या कर्तबगारीतून दाखवून दिले आहे.

दीपक मेस्त्री, चैतन्य मेस्त्री   श्री गणेश इंजिनीयरिंग वर्क्‍स, डहाणू

’ व्यवसाय – विविध भाडय़ांची निर्मिती

’ कार्यान्वयन :      १९८१  साली

’ मूळ गुंतवणूक : २५,००० रुपये

’ कोणत्या सरकारी योजनेतून मदत: : सुशिक्षित बेरोजगार प्रोत्साहन योजनेतून वित्तसाहाय्य

’ सध्याची उलाढाल : वार्षिक ६.५० कोटी रुपये

’ कर्जपुरवठा : स्टेट बँक,अन्य वित्तीय संस्था

’ रोजगार किती : थेट ८० ते ९०

’ संकेतस्थळ :     www.shreeganeshdrm.com

मंदीमध्ये संधी

‘मंदीमध्ये संधी’चा शोध हा जणू मेस्त्री यांचा स्थायिभाव आणि छंदच बनला आहे. प्लास्टिकवर बंदी आल्यानंतर त्यांनी स्टेनलेस स्टील धातूमध्ये लहान मुलांसाठी दुधाच्या फीडिंग बॉटल तयार केल्या, स्टेनलेस स्टील स्ट्रॉ व आरोग्याबाबत दक्ष असलेल्या मंडळींसाठी तांब्याच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या बनविल्या; श्ॉलो फ्राय करण्यासाठी हँडल असलेले तळण्यासाठी झारा अशी त्यांची अनेक नवीन उत्पादने बाजारामध्ये विशेष मागणी मिळविणारी ठरली आहेत.

लेखक ‘लोकसत्ता’चे  पालघर जिल्हा प्रतिनिधी 

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल: arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.

niraj.raut@expressindia.com