|| अजय वाळिंबे

इंजिनीयरिंग आणि तंत्रज्ञान म्हटले की डोळ्यासमोर ज्या काही थोडय़ा कंपन्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. त्यातील एक मोठी नावाजलेली कंपनी म्हणजे सीमेन्स. सीमेन्स एजी या जर्मन कंपनीची ही भारतीय उपकंपनी. इंजिनीयरिंग, तंत्रज्ञान आणि ऊर्जा अशा महत्त्वाच्या क्षेत्रात सीमेन्स जगभरात आघाडीवर आहे. कंपनीच्या जगभरात अनेक कंपन्या-उपकंपन्या असून तिचे जवळपास ३,७२,००० कर्मचारी आहेत. तसे भारताबरोबर सीमेन्सचे नाव जोडले गेले ते १५० वर्षांपूर्वी म्हणजे १८६७ मध्ये, जेव्हा वेर्नर सीमेन्स यांनी स्वत: लंडन आणि कोलकाता दरम्यान पहिली टेलिग्राफ सेवा सुरू केली. आज भारतामध्ये सीमेन्सच्या २२ फॅक्टरीज असून, ११ संशोधन कें द्रे, आणि देशभर विक्री व सेवा केंद्रे आहेत. स्विच गीयर, स्विच बोर्ड, ट्रान्सफॉर्मर्स आणि जनरेटर्स खेरीज कंपनी स्टीम टर्बाइन, टबरे कॉम्प्रेसर्स, स्मार्ट ग्रीड्स, मोटर्स, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे इत्यादींचे उत्पादन करते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारताच्या प्रगतीत भागीदार असलेली ही कंपनी सध्या स्मार्ट सिटी प्रकल्पातही सहभागी आहे. तसेच कंपनीने गुजरात सरकार, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याबरोबर सामंजस्य करार केला असून त्यायोगे कंपनी विविध औद्योगिक संस्था तसेच आयटीआयसारख्या शैक्षणिक संस्थांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देत आहे.

कंपनीच्या उलाढालीत गेल्या तीन वर्षांत विशेष वाढ झाली नसली तरीही इतर आर्थिक आघाडीवर कंपनीने लक्षणीय कामगिरी करून दाखविली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत म्हणजे सप्टेंबर २०१८ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने ११,०१५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७४९.७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला होता. कंपनीचे जून २०१८ साठी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निष्कर्ष नुकतेच जाहीर झाले आहेत. या तिमाहीत कंपनीने २,९६४.४ कोटी रुपयांची उलाढाल साध्य केली असून, २०४.४ कोटी रूपयांचा नक्त नफा मिळविला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत उलाढालीतील वाढ १४.६ टक्के असून नक्त नफा २५.५ टक्क्य़ांनी अधिक आहे. याच कालावधीत कंपनीला २,८४०.७ कोटी रुपयांचा नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत, हे विशेष. तर कंपनीची आतापर्यंतची म्हणजे पहिल्या नऊ माहीची उलाढाल ८,४९०.७ कोटी रुपयांची असून त्यावर ६१४.७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. दुर्दैवाने गेल्या वर्षभरात शेअर बाजारात कंपनीने फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. सध्या हा शेअर गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्के सवलतीत उपलब्ध आहे. आर्थिक मंदीचे सावट येते आणि जाते, परंतु सीमेन्ससारख्या बलाढय़, बहुराष्ट्रीय आणि बहुआयामी कंपन्यांना त्याचा विशेष फरक पडत नसतो. सध्या १,००० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर तुमच्या पोर्टफोलिओत दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटतो.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.