शेअर बाजाराच्या एसएमई मंचावर सूचिबद्ध छोटय़ा कंपन्यांपैकी काहींनी मुख्य बाजारात सूचिबद्धता मिळविण्याइतकी धष्टपुष्टता प्राप्त केली आहे. कंपन्यांनी साधलेली ही उन्नती नक्कीच, पण त्यांच्या गुंतवणूकदारांना आज दोन वर्षांनी आवश्यक तरलता मिळण्याबरोबरच, दुप्पट-तिपटीने मूल्यवृद्धीचा लाभही पदरी पाडता आला आहे. दोन वर्षांत इतका फायदा आजच्या घडीला तरी कोणती सनदशीर गुंतवणूक  देताना दिसून येत नाही..
देशाच्या उद्योगक्षेत्रात छोटय़ा व मध्यम कंपन्या ज्यांना आपण ‘एसएमई’ अशा संक्षिप्त नावाने संबोधतो, त्यांचे बडय़ा कंपन्यांच्या तुलनेत एक स्वतंत्र अस्तित्व आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीत मोठे योगदान असलेल्या एसएमई कंपन्या कायम संक्रमणावस्थेत असतात. आणि हीच बाब या कंपन्यांत गुंतवणुकीचे सर्वात आकर्षक वैशिष्टय़ ठरावे. आज बीएसई एसएमई मंचावरील चार कंपन्यांनी आपले ‘छोटे’पण त्यागून मुख्य बाजारात म्हणजे मुंबई शेअर बाजारात सूचिबद्धता मिळविण्याइतकी प्रगती साधली आहे.  आणखी अर्धा डझन कंपन्या या वाटेवर आहेत. या कंपन्यांत गुंतवणूक करणाऱ्यांना दोन-अडीच वर्षांनंतर त्यांच्या गुंतवणुकीचे फलित दिसून येत आहे. नुसतीच फळफळली नव्हे तर किमान दुप्पट परतावा या गुंतवणुकीने दिला आहे.
av-04
उच्च जोखीम आणि उच्च लाभ हे समभागांतील गुंतवणुकीचे अभिन्न लक्षण आहे. व्यवसायाचे छोटे व मर्यादित प्रारूप आणि पूर्वकामगिरी तसेच प्रवर्तकांची पाश्र्वभूमी याबद्दल अनभिज्ञता हा एसएमई समभागांतील गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावयाचा सर्वात महत्त्वाचा जोखीम घटक आहे. पण हेही लक्षात घ्यावयास हवे की, १०,००० कोटींची उलाढाल असलेल्या सुस्थापित बडय़ा कंपनीला वर्षांगणिक सरासरी २० टक्के दराने विकास साधणे निश्चितच आव्हानात्मक असते, त्या उलट जेमतेम १० कोटींची उलाढाल असणाऱ्या नवस्थापित एसएमई कंपनीने दरसाल ५० टक्क्य़ांच्या दराने प्रगती करणे तितकेसे अवघड नाही आणि आश्चर्यकारकही नसते. म्हणून ज्ञात व पुरत्या परिचयाचे व्यवसाय, उत्पादन, सेवा क्षेत्र निवडून त्यांचे व्यावहारिक अंग पाहून केलेली गुंतवणूक त्या कंपनीतील भागीदार असल्याप्रमाणे नफा देणारी ठरते. त्या कंपनीचे सारथ्य करणारे प्रवर्तक, व्यवस्थापकीय संघ यापैकी कुणी ओळखी-पालखीतले असल्यास त्यांचे वर्तन पाहून निर्णय घेणे केव्हाही चांगले.
 ‘सेबी’कडून घालून देण्यात आलेल्या सद्य नियमांप्रमाणे एसएमई मंचावर सूचिबद्धतेची दोन वर्षे पूर्ण करणाऱ्या आणि भरणा झालेले भागभांडवल १० कोटींपेक्षा अधिक पण २५ कोटींपेक्षा कमी असणाऱ्या लघू व मध्यम उद्योगक्षेत्रातील कंपन्या मुख्य बाजारात स्थलांतर करू शकतात. यानुसार ब्रॉन्झ इन्फ्राटेक, आंशूज् क्लोदिंग, एसआरजी हाऊसिंग लिमिटेड आणि संगम अ‍ॅडव्हायजर्स लि. या कंपन्यांनी स्थलांतर केले आहे. तर आशापुरा इंटिमेट्स फॅशन्स लि. येत्या आठवडय़ात स्थलांतर करीत आहे. एनएसईच्या इमर्ज या एसएमई मंचावरील व्हिटो स्विचगीयर्स अँड केबल्सने अलीकडेच मुख्य बाजारात स्थलांतर केले. या सर्व प्रथितयश कंपन्यांच्या उद्यमप्रवासातील हे मानाचे पानच आहे. दोन्ही शेअर बाजाराच्या एसएमई मंचांवर सूचिबद्ध अन्य ९० कंपन्यांनीही हाच मार्ग चोखाळावा असे उत्तेजन त्यांनी जरूरच दिले आहे.
मुख्य बाजारात स्थलांतराने या कंपन्यातील वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी व्यवहार केल्या जाणाऱ्या समभागांचे प्रमाण (ट्रेड लॉट) हे एकावर येईल, जे एसएमई कंपनीच्या समभागात शक्य नव्हते. तरलतेचा हा लाभच खूप मोठा आहे, असे लघू व मध्यम कंपन्यांच्या भागविक्री हाताळणाऱ्या महावीर लुनावत (पेंटोमॅथ अ‍ॅडव्हायजरी सव्‍‌र्हिस ग्रुप) आणि गौरव जैन (हेम सिक्युरिटीज लि.) दोहोंनी सांगितले. अर्थात ज्या आस्थेने या कंपन्यांच्या भागविक्रीत गुंतवणूक केली तीच आस्था कायम असल्यास या गुंतवणुकीला आणखी काही काळ देणे अधिक फायद्याचे ठरेल, असे गौरव जैन यांनी सांगितले. तर दर तिमाहीला निकालांना प्रसिद्धी व तत्सम नवीन अनुपालने कंपन्यांसाठी बंधनकारक ठरतील. कारभार अधिक चोख बनविणारी ही सक्ती गुंतवणूकदारांच्या दृष्टीने स्वागताचीच, असे लुनावत यांनी सांगितले.
* महावीर लुनावत,
व्यव. संचालक, पेंटोमॅथ अ‍ॅडव्हायजरी सव्‍‌र्हिस
मुख्य बाजारात स्थानांतर हे अनेक कंपन्यांसाठी उत्साहवर्धक निश्चितच आहे. हे एक प्रकारे या कंपन्यांच्या पतवाढीचेच द्योतक आहे. पण मुख्य बाजारातील स्थलांतराने या कंपन्यांवर ‘कम्प्लायन्सेस’ची जबाबदारीही वाढणार आहे. जी गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अधिकच स्वागतार्ह बाब ठरावी.

* गौरव जैन,
संचालक, हेम सिक्युरिटीज लि.
अनेक कंपन्या मुख्य बाजारात स्थलांतरासाठी उत्सुक आहेत आणि ही त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी निश्चितच उत्साहदायी बाब ठरावी. दोन वर्षे या कंपनीवर दाखविलेल्या विश्वासाचे खरे फळ, इतकेच नव्हे काही बाबतीत तिपटीहून अधिक लाभ त्यांना मिळविता येईल. थोडी अधिक सबुरी दाखविल्यास लाभ मात्रा आणखीही वाढू शकेल.