||  श्रीकांत कुवळेकर

शेतकऱ्यांसाठी ठरले सोने-चांदी

मागील आठवड्यात सोयाबीनने भारतीय वायदे बाजारामध्ये प्रति क्विंटल ६,२०० रुपयांची पातळी ओलांडली आणि इतिहास रचला आहे. मागील तीन महिन्यांमध्ये सोयाबीनच्या भावात ३५ टक्क्यांची दणदणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सोयाबीनचे साठे शेतकऱ्यांच्या हाती असताना किमतीतील ही तेजी शेतकऱ्यांना चांगलाच पैसा देऊन गेली आहे यात दुमत नसावे. सोयाबीनचा या हंगामात वाढलेला हमीभाव ३,८८० रुपये असताना ५० टक्क्यांहून अधिक जास्त बाजारभाव हे बदलत्या कृषिमाल बाजारपेठेचे द्योतक आहे, का वाईट हवामानामुळे सोयाबीनच्या जागतिक उत्पादनात आलेली घट याला कारणीभूत आहे किंवा करोनामुळे बदललेल्या व्यापारव्यवस्थेचा त्यात मोलाचा वाटा आहे हे सांगणे कठीण असले तरी या तेजीमध्ये या सर्वच घटकांचा आपापल्या परीने सहभाग आहे हे नाकारून चालणार नाही; परंतु भारतीय सोयाबीन उत्पादकांना या परिस्थितीचा चांगलाच फायदा झाला आहे हे महत्त्वाचे.

सोयाबीनचा हंगाम साधारणपणे ऑक्टोबरपासून सुरू होतो. तिथपासून आजपर्यंत सोयाबीन सतत तेजीमध्ये राहिले आहे. एकंदर कमॉडिटी बाजाराचा विचार करता ऑगस्टमध्ये ५६,००० रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी पातळीवर असलेल्या सोन्यामध्ये आता सतत घसरण होताना दिसते. मागील महिन्यापर्यंतच्या सात महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात सुमारे १८ टक्के एवढी घसरण झालेली दिसते; परंतु याच काळामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये ७० टक्के एवढी प्रचंड भाववाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी सोने ठरले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोयाबीनएवढेच दुसरे महत्त्वाचे पीक म्हणजे कापूस. खरीप हंगामातील एकूण पेरण्यांमध्ये सिंहाचा वाटा केवळ या दोन नगदी पिकांचा असतो आणि याच दोन पिकांमध्ये कायम स्पर्धा पाहायला मिळते. या हंगामामध्ये सोयाबीनबरोबरच कापसाचे उत्पादनदेखील बरे झाले आहे. कापसाचा हंगामदेखील सोयाबीनप्रमाणेच ऑक्टोबरमध्येच सुरू होतो; परंतु या वर्षी कापसाचा बाजार सुरुवातीच्या काळामध्ये करोनाच्या परिस्थितीमुळे तुलनेने नरम राहिला. म्हणजे एनसीडीईएक्स या वायदेबाजारात कपासचा वायदा १ ऑक्टोबरला ९७० रुपये प्रति २० किलो म्हणजेच ४,८५०-४,९०० रुपये क्विंटल या पातळीवर होता. या वर्षासाठी सुमारे ३०० रुपयांनी वाढवलेला ५,५१६ रुपये आणि ५,८२५ रुपयांचा हमीभाव विचारात घेता हंगामाची सुरुवात वाईट झाली होती असे म्हणता येईल. अगोदरच मागील हंगामाचे मोठे साठे बाळगून असलेल्या कापूस महामंडळाला जोरदार हमीभाव खरेदी करावी लागली आणि त्यामुळे भाव कसेबसे तग धरून राहिले.

परंतु नोव्हेंबरपासून व्यापार उद्योग जवळपास पूर्वीच्या क्षमतेने काम करू लागल्यावर अचानक वाढलेल्या मागणीमुळे जगभर कापसाचे भाव वधारू लागले. कापसाबरोबरच सुतालादेखील मागणी प्रचंड वाढून त्याचा परिणाम कापसामध्ये विलक्षण तेजी येण्यात झाला. डिसेंबरमध्ये सुरू झालेल्या या तेजीमुळे कपास वायदा ऑक्टोबरच्या ९७० रुपयांवरून मागील महिन्यामध्ये १,३०० रुपयांच्या समीप गेल्याने सोयाबीनप्रमाणे कापसामध्येदेखील विक्रमी तेजी नोंदवली गेली. टक्केवारीच्या भाषेत सांगायचे तर, कापसाचे भाव या हंगामामध्ये आत्तापर्यंत ३५ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. त्यामुळे वर म्हटल्याप्रमाणे सोयाबीन हे शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे सोने ठरले त्याच भाषेत सांगायचे तर कापूस त्यांच्यासाठी चांदी ठरले आहे.

सोने आणि सोयाबीनची तुलना केली त्याप्रमाणे चांदीची तुलना कापसातील तेजीशी करता असे दिसते की,चांदीचे भाव या काळात वायदेबाजारात ७५,००० रुपये प्रति किलोवरून अगदी ६२,००० रुपयांवर घसरले आहेत, तर कापूस वर म्हटल्याप्रमाणे ३५ टक्क्यांचा परतावा देऊन गेला आहे. तसेही कापसाला पांढरे सोने म्हणतातच; परंतु या वर्षीच्या तेजीनंतर सोयाबीन आणि कापसाला सोने-चांदीच म्हटले जाईल.

पुढील हंगामाकडे  वाटचाल 

तसे पाहता कृषिमाल बाजारपेठेमध्ये या वर्षी बहुतेक कमॉडिटीजनी चांगली कामगिरी नोंदवली असली तरी येऊ घातलेल्या खरीप हंगामात परत एकदा कापूस आणि सोयाबीनमध्ये ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळेल असे सध्याचे चित्र आहे. उत्तर भारतात कापसाची लागवड एप्रिलअखेर आणि मेमध्ये सुरूहोईल, तर सोयाबीन पेरण्या चांगला पाऊस पडल्यावरच सुरू होतील; परंतु या महिन्याअखेरपर्यंत येणारे मोसमी पावसाचे ठोकताळे पुढील हंगामाबद्दलचे अंदाज बांधण्यासाठी महत्त्वाचे ठरतील.

सध्याच्या परिस्थितीमध्ये कापसाच्या बियाण्यांची टंचाई निर्माण होईल अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. तेलंगणा सरकारने आपल्या शेतकऱ्यांना येत्या हंगामात कापूस लागवडीखालील क्षेत्र वाढवण्याचा सल्ला दिला असून यामुळे राज्यातील कापसाची लागवड ६० लाख हेक्टरवरून ८० लाख हेक्टरवर जाण्याचे प्रयोजन आहे. या हंगामातील किमती पाहता इतर राज्यांमध्येदेखील क्षेत्रवाढ होण्याची शक्यता जमेस धरता बियाण्यांच्या मागणीत त्या प्रमाणात वाढ होईल. यामुळे ही टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे असे म्हणता येईल.

सोयाबीनची परिस्थिती सध्या तरी बरीचशी तशीच आहे. या हंगामातील सोयाबीन उत्पादनाचे सुरुवातीचे अंदाज १२० लाख टनांहून अधिक होते ते कालांतराने १०५ लाख टनांवर आले. तर आता बाजारधुरीणांच्या मते बाजारातील आवक लक्षणीय घटलेली पाहता हाच आकडा ९०-९५ लाख टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. पुरवठ्यामध्ये असे चित्र आहे, तर मागणीमध्ये सतत वाढच होताना दिसत आहे. सोयाबीनवर प्रक्रिया करताना ते क्रश केले असता ८० टक्के सोयापेंडीची निर्मिती होते, तर १८ टक्के तेल निर्माण होते. जनुकीय बदल न केलेल्या सोयाबीनपासून निर्माण झालेल्या भारतीय सोयापेंडीला जगात जोरदार मागणी असून अगदी अमेरिका आणि युरोपनेदेखील या पेंडीला प्राधान्य दिले आहे. यामुळे सोयापेंडीची निर्यात ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या तेलवर्षात कैकपटीने वाढली असून वर्ष संपताना यात एकंदरीत दुपटीहून अधिक वाढ होऊन ती १८-२० लाख टन एवढी होईल असे या उद्योगाचे म्हणणे आहे, तर देशांतर्गत निदान ४०-४५ लाख टन एवढी मागणी विचारात घेता केवळ पेंडीसाठी ७५ लाख टन सोयाबीन क्रशिंगची मागणी राहील. याव्यतिरिक्त सोयाबीनपासून अनेक प्रकारचे अन्नपदार्थ बनवले जातात त्याचीदेखील मागणी प्रचंड वाढत आहे. तसेच सोयाबीनचे पुढील पीक अजूनही जवळपास सहा महिने दूर असल्यामुळे सध्या सोयाबीनचा पुरवठा भारतामध्ये तरी कमीच राहणार आहे. या पार्श्वभूमीवर नियमित पेरण्या, विक्रमी भावामुळे वाढीव क्षेत्र आणि मागील काही हंगामांतील हवामानाचा लहरीपणा बघता दुबार पेरणी करावी लागल्यास सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासल्यास नवल ठरू नये.

सोयाबीन आणि कापसामधील या शर्यतीमध्ये कुठल्या पिकांचा बळी जातो हे बघणे महत्त्वाचे ठरेल; परंतु त्याच वेळी ‘बळी तो कान पिळी’ या नियमाप्रमाणे येत्या खरीपहंगामामध्ये हेच पीक जोरदार कमाई करून देऊ शकेल ही शक्यतादेखील शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

लेखक वस्तू बाजार विश्लेषक

ksrikant10@gmail.com