av-05स्पेशालिटी रेस्टॉरंटस लिमिटेड ही कंपनी ‘मेनलँड चायना’, ‘ओह! कलकत्ता’, ‘मचाण’, ‘सिगरी ग्लोबल ग्रील’ या नाममुद्रांसहित एकूण १२ नाममुद्रांनी लोकप्रिय उपाहारगृहांची शृंखला चालविते. कंपनीच्या एकूण महसुलापकी निम्मा वाटा ‘मेनलँड चायना’ या नाममुद्रेने चालविल्या जाणाऱ्या उपाहारगृहांचा आहे. भारतात प्रसिद्ध असलेल्या नाममुद्रेचा विस्तार करून ‘मेनलँड चायना आशिया’ या नाममुद्रेने कंपनीने भारताबाहेर उपाहारगृहांची शृंखला सुरू केली आहे. चालू आíथक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालात विक्री १७ टक्क्यांनी वाढून ७५ कोटींवर पोहोचली आहे. विक्रीतील वृद्धी प्रामुख्याने नवीन उपाहारगृहे उघडल्याने शक्य झाली आहे. तुलनाच करायची झाली तर याच कालावधीत ‘मॅकडोनाल्ड’ची विक्री पाच टक्क्यांनी, तर ‘डॉमिनोज् पिझ्झा’ या नावाने उपाहारगृहांची शृंखला चालविणाऱ्या ज्युबिलन्ट फूडवर्क्‍सची विक्री सात टक्क्यांनी घटली. विक्री जरी वाढली तरी अपेक्षिल्याप्रमाणे नवीन उपाहारगृहांची संख्याही वाढल्याने कंपनीच्या नफाक्षमतेत आधीच्या तिमाहीच्या तुलनेत चार टक्क्यांनी घट झाली आहे.
कंपनीची शनिवार-रविवारची विक्री सरासरीपेक्षा अधिक असली तरी आठवडय़ातील कामकाजाच्या दिवशी विक्री वाढण्यासाठी कंपनीला प्रामुख्याने व्यावसायिक कामाने येणाऱ्या ग्राहकांवर अवलंबून राहावे लागते. या ग्राहकांना आकर्षति करण्यासाठी सूट किंवा सवलती द्याव्या लागतात. सध्या कमी होत असलेल्या महागाईच्या दरामुळे कंपनीच्या कच्च्या मालाच्या (अन्नधान्याच्या) दरात घट झाल्याने कंपनीच्या नफाक्षमतेत वाढ होणे अपेक्षित आहे. वर्षांच्या उर्वरित काळात कंपनीने मेनलँड चायनाची सहा ते सात नवीन उपाहारगृहे उघडणे निश्चित केले आहे, तर ‘मेनलँड चायना आशिया’ या नाममुद्रेने दक्षिण आशियाई देशात आठ उपाहारगृहे सुरू करण्याचे योजिले आहे. ‘ओह! कलकत्ता’, ‘मचाण’, ‘सिगरी ग्लोबल ग्रील’ अन्य नाममुद्रांचीही प्रत्येकी तीन ते चार उपाहारगृहांची भर पडणार आहे. संख्येने वाढलेली उपाहारगृहे व कमी झालेल्या महागाईमुळे कंपनीची नफाक्षमता चार ते साडेचार टक्क्यांनी वाढणे अपेक्षित आहे.
तरुणांची बहुसंख्या असलेल्या देशात शनिवार-रविवारी बाहेर जेवण घेणे अशा रूळलेल्या सवयी कंपनीच्या व्यवसायवृद्धीच्या पथ्यावर पडणार आहेत. म्हणून आपल्या गुंतवणुकीत स्पेशालिटी रेस्टॉरंट्सला स्थान हवे, अशी शिफारस आम्ही आमच्या ग्राहकांना करीत आहोत.