जेव्हा वित्तीय नियोजनाबाबत ‘लोकसत्ता’चे तरुण वाचक मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त करतात तेव्हा हे सदर सुरू करण्यामागच्या हेतूची काही प्रमाणात पूर्तता झाली असे वाटते. परंतु त्यांनी दिलेला सल्ला आचरणात आणावा ही अपेक्षासुद्धा असते.
आजच्या भागात २७ वर्षांच्या अमृत साबडे यांचे नियोजन जाणून घेऊ. अमृत हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील देशाच्या सर्वात मोठय़ा कंपनीत पुण्यात कामाला असून त्यांना वार्षकि ५.१५ लाखाचे वेतन मिळते. त्यांनी पुणे जिल्ह्यात आंबेगाव येथे वन बीचके सदनिका घेतली असून त्यासाठी २३ लाखांचे गृहकर्ज घेतले आहे. विमा संरक्षण म्हणून एलआयसीची जीवन आनंद ही योजना त्यांनी खरेदी केली असून, त्याचा वार्षकि ३३ हजारांचा हप्ता भरत आहेत. त्यांनी एक लाखाची बँक मुदत ठेव केली आहे. 
अमृत साबडे यांना सल्ला
अमृत यांची मेल वाचल्यावर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे वित्तीय व्यवस्थापनात वापरल्या जाणाऱ्या Compounding व Discounting या गोष्टींशी अजिबात परिचय नाही. म्हणून तुम्ही वयाच्या पन्नासाव्या वर्षी एक कोटी रुपये जमा करण्याचा व्यक्त केलेला मनोदय अतिशय तोकडा वाटतो. वयाच्या ५० व्या वर्षी एक कोटी जमा करण्यासाठी वार्षकि परताव्याचा दर जर १२ टक्के धरला तर वार्षकि सहा लाख जमा करावे लागतील. जे आजच्या आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक आहेत. नोकरी पेशातील माणसाचा पगार साधारण दर सहाव्या वर्षी दुप्पट होत असतो. त्यामुळे तुमचे लक्ष्य मूळीच अवघड नाही. परंतु सात टक्के महागाईचा दर घसरला तर तुमच्या वयाच्या ५० व्या वर्षी आजच्या एक कोटीचे मूल्य १८,४२,९९२ इतके असेल.
तुम्ही हिंजवडीच्या राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये काम करता म्हणून वाकड परिसरात तुम्हाला स्वत:चे घर घ्यायचे आहे. स्थावर मालमत्ताविषयक वेबसाइटवर आज वाकड परिसरात उपलब्ध असलेल्या घरांच्या किंमती ३५ लाखांच्या पुढेच आहेत. व एखादे वाहन घेणे हे तुमचे दुसरे वित्तीय लक्ष्य आहे. वाहन घेणे सहज शक्य आहे ज्या पगारदार कर्जदाराचे वार्षकि वेतन पाच लाखाहून अधिक आहे त्यास वाहन कर्ज घेण्यास स्टेट बँकेकडून पात्र समजले जाते. तेव्हा तुम्हाला वाहन कर्ज आजही मिळू शकेल. वाहन घेतल्यानंतर वाहनाच्या किंमतीच्या दुप्पट खर्च वाहनाच्या इंधन व दुरुस्तीवर खर्च करावा लागतो. हा खर्च भागविण्यासाठी कर्जाची सोय अजून तरी उपलब्ध झालेली नाही.
या सदराच्या निमित्ताने तुमच्या सारख्या तरुण मंडळींशी जेव्हा गाठ पडते तेव्हा व त्यांच्याकडून त्यांच्या वित्तीय नियोजनात झालेल्या चुका जेव्हा दिसून येतात तेव्हा या चुकांना यांची पालक मंडळी व ते स्वत: जबाबदार आहेत असे दिसते. मुलगा अथवा मुलगी कमावती झाल्यानंतर आईवडील पाल्याचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने सर्वात पहिल्यांदा एखादी एलआयसी पॉलिसी घेण्याचा सल्ला देतात. त्या पॉलिसीची गरज असो अथवा नसो आणि विकत घेतलेली पॉलिसी १०० टक्के चुकीची असते. आजपर्यंत माझ्या पाहण्यात तरी टर्म प्लान विकणारा विमा विक्रेता आलेला नाही.
तुम्हाला सुरवातीला वित्तीय नियोजनाच्या दृष्टीने एक प्रश्न विचारला होता तुम्ही तुमचे वितीय नियोजन कोणाकडूनही करून घेणार आहात का?  या प्रश्नाचे तुम्ही नकारात्मक उत्तर दिलेत. हा प्रश्न तुमची मानसिकता तपासण्यासाठी विचारला होता. हा प्रश्न विचारला त्याचे आणखी एक कारण तुम्ही तुमच्या आíथक नियोजनाची सुरुवात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीने करणे योग्य ठरले असते. त्या ऐवजी तुम्ही ‘जीवन आनंद’चा पर्याय स्वीकारलात या योजनेसाठी तुम्ही पुढील २५ वष्रे मिळून ८,२५,०००चा  हप्ता भरणार आहात व तुमच्या हप्त्यातून साधारण ३५ टक्के म्हणजे २,८८,७५० रुपये हे विमा विक्रेत्याला त्याच्या कमिशनपोटी मिळणार आहेत. म्हणूनच त्याने ही योजना तुमच्या गळ्यात मारली. हे लक्षात घेता वितीय नियोजकाचे शुल्क देऊन आपल्या गरजांनुसार विमा व गुंतवणूक करणे हितावह आहे की काहीही शुल्क न भरता चुकीची गुंतवणूक करणे योग्य याचा विचार होणे जरुरीचे आहे. आजही अनेक भारतीयांची मानसिकता विमा विक्रेता म्हणजे वित्तीय नियोजक अशीच आहे.
तुम्ही जर सध्या घेतलेल्या घरात जाऊन राहणार नाही तर ही सदनिका का खरेदी केलीत हा प्रश्न मनात आला. थोडे दिवस थांबून तुम्ही हव्या असलेल्या ठिकाणी स्वत:ची सदनिका घेऊ शकला असतात. जर वित्तीय नियोजककडे गेला असतात तर त्याने हे प्रश्न तुम्हाला विचारले असते. कदाचित थांबण्याचे सुचविले असते.
आज जरी तुमचे आईवडील तुमच्यावर अवलंबून नसले तरी ते कधी ना कधी सेवानिवृत्त होतील; भविष्यात तुमचा विवाह होईल; एखादे अपत्यही असेल. अशा परिस्थितीत तुमच्यावर अवलंबून असलेल्याची संख्या मोठी असेल. त्यावेळी तुमची जीवन आनंद पॉलिसी देत असलेले पाच लाखांचे विमा छत्र अपुरे ठरेल. म्हणून तुम्ही जीवन आनद या विमा योजनेचे हप्ते भरणे थांबविणे योग्य ठरेल. तुमच्या वेतनाच्या आधारावर तुम्हाला मोठे विमा छत्र मिळणार नाही. म्हणून सध्या एक कोटीचा व ३२ वष्रे मुदतीचा विमा लगेचच घ्या. दर पाच वर्षांनी विमाछत्रात ५० लाखांची वाढ करावी.
तुमच्या सारख्या तरुण माणसाची समभाग सदृश्य पर्यायांमध्ये मोठी गुंतवणूक असणे आवश्यक आहे, त्या ऐवजी तुम्ही एक लाखाची मुदत ठेव केलीत. तुम्हाला आवश्यक तेवढी स्थिर उत्पन्न असलेली गुंतवणूक ही तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून मिळत आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) खातेही सुरू करा. समभाग सदृश्य गुंतवणुकीसाठी एचडीएफसी इंडेक्स फंड सेन्सेन्क्स प्लानचा विचार करा. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही जेथे काम करता त्या कंपनीचे समभाग नेमाने खरेदी करीत राहा.
सुरुवातीच्या काळात झालेल्या चुका सुधारण्यास वाव असतो, पण सुरुवात लवकर म्हणजे कमावू लागल्यानंतर लगोलग व्हायला हवी. अजून वेळ गेलेली नाही, झालेल्या चुका सुधारा व एक उत्तम वितीय नियोजनकाराचा शोघ घ्या हेच या निमित्ताने सांगणे आहे.