आशीष ठाकूर
बाजारातील चंचल वाऱ्यामुळे तेजीच्या वातावरणात निफ्टी निर्देशांकावर मध्येच १५,९०० वरून १५,४५० पर्यंतची मंदी येऊन गेली. पुढे निफ्टी निर्देशांक काही काळ तिथेच रेंगाळल्याने, तेजीच्या लख्ख प्रकाशात मंदीची सांज कुणी केली असं वाटायचं. पण त्या वेळच्या निर्देशांकाच्या उलथापालथींमुळे मनात सुरू असलेल्या घालमेलीतदेखील मनोमन खात्री होती की, या काळोख्या दारावरतीच १६,००० च्या तेजीच्या वेलीदेखील माळल्या जातील. हे आनंदाचे क्षण जेव्हा प्रत्यक्षात येतात तेव्हा एकच भावना असते- ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.’ या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: ५४,२७७.७२

निफ्टी: १६,२३८.२०

सरलेल्या १५ जूनपासून, जुलैअखेपर्यंत बाजारातील तेजीची चाल मंदावल्यामुळे तो काळ तेजीची धारणा असलेल्या गुंतवणूकदारांच्या सहनशक्तीच्या कसोटीचा होता. जवळपास दीड महिने निफ्टी निर्देशांकांची वाटचाल ही १५,९०० ते १५,४५० च्या परिघातच होती, पण निफ्टी निर्देशांक १६,००० चे लक्ष्य गाठेलच याची मानसिक तयारी ही २८ जूनच्या ‘हृदयी वसंत फुलताना’ या लेखात शास्त्रोक्त गणिती पद्धतीने वाचकांना अवगत करून दिली होती, ते आता प्रत्यक्षात येत आहे. आताच्या घडीला अत्यल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी (गुंतवणूक कालावधी तीन महिन्यांहून कमी) अशांनी आता नवीन समभागांची खरेदी थांबवून, समभागांच्या नफारूपी विक्रीवर लक्ष्य केंद्रित करावे. नफ्यातील विक्रीयोग्य समभागांचे २० टक्के याप्रमाणे पाच तुकडय़ांत विभागणी करून, निफ्टी निर्देशांकाच्या प्रत्येक वाढीव टप्प्यांवर १६,२०० ते १६,५०० दरम्यान नफ्यातील विक्रीयोग्य समभागांची विक्री करून नफा गाठीला बांधून घ्यावा. या स्तरावरून निफ्टी निर्देशांकावर १६,००० ते १५,५०० पर्यंत घसरण संभवते. तेव्हा समभागांची नफारूपी विक्री करणे श्रेयस्कर.

आज आपण दीर्घ मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांचा देखील विचार करू या. या तेजीच्या उधाण वाऱ्यात आताच निफ्टी निर्देशांकांनी १६,५०० चा स्तर पार केल्यास, या स्तंभातील ७ जूनच्या लेखातील ‘दिसते मजला सुखचित्र नवे’ भाग-२ या लेखात सुचविलेल्या गोष्टी विचारात घेणे क्रमप्राप्त ठरते. त्यात आता चालू असलेल्या तेजीचा अत्युच्च बिंदू १६,८०० ते १७,००० असेल असे नमूद केले होते. पुढील लेखात निफ्टी निर्देशांकावरील १६,८०० चे लक्ष्य कसे निर्धारित केले त्याचा गणिती पद्धतीने शास्त्रोक्त आढावा घेऊ या.

निकालपूर्व विश्लेषण

१) कोल इंडिया लिमिटेड

* तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, १० ऑगस्ट

* ६ ऑगस्टचा बंद भाव – १४६.३० रु.

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १४८ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १४८ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १६५ रुपये, द्वितीय लक्ष्य १८० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १४८ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १३७ रुपयांपर्यंत घसरण.

२) जिंदाल स्टील पॉवर लिमिटेड

* तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, १० ऑगस्ट

* ६ ऑगस्टचा बंद भाव – ४२१.८५ रु.

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४५० रुपये, द्वितीय लक्ष्य ५०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ४०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३६५ रुपयांपर्यंत घसरण.

३) ल्युपिन लिमिटेड

* तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, १० ऑगस्ट

* ६ ऑगस्टचा बंद भाव – १,१५०.९० रु.

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,१३० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,१३० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,१९० रु., द्वितीय लक्ष्य १,२५० रु.

ब) निराशादायक निकाल : १,१३० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,०६० रुपयांपर्यंत घसरण.

४) हीरो मोटोकॉर्प लिमिटेड

* तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, १२ ऑगस्ट

* ६ ऑगस्टचा बंद भाव – २,८३२.६० रु.

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,७५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,७५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,९०० रु., द्वितीय लक्ष्य ३,१०० रु.

ब) निराशादायक निकाल : २,७५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,६०० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.