सुधीर जोशी

गेल्या सप्ताहाची सुरुवात सकारात्मक राहिली. दोन कोविड प्रतिबंधक लशींना भारतात मिळालेली मान्यता आणि डॉलरचे होणारे अवमूल्यन यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात खरेदी सुरूच ठेवली. सेन्सेक्सने अठ्ठेचाळीस हजाराचा टप्पा पार केला. बुधवारी अमेरिकेत जॉर्जियातील चुरशीची निवडणूक आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत निसटण्याच्या शक्यतेने अमेरिकी बाजारात झालेल्या घसरणीचा मोठा परिणाम भारतीय बाजारात काही काळ पाहायला मिळाला. सप्ताहअखेर डेमोक्रॅट्सच्या बहुमतासह अमेरिकेतील निवडणुकीबाबत निश्चिती आली आणि बाजार परत तेजीवर स्वार होऊन प्रमुख निर्देशांक विक्रमी पातळ्यांवर बंद झाले. या मुसंडीत धातू व माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा मोठा वाटा होता.

सिगारेट विक्रीवरील नव्या प्रस्तावित निर्बंधांमुळे आयटीसीच्या समभागात घसरण दिसली. परंतु आयटीसीच्या ग्राहकभोग्य वस्तूंमधील वाढत्या व्यवसाय वृद्धीची शक्यता व लाभांशाच्या रूपाने मिळणारा परतावा लक्षात घेता सध्याचे बाजार मूल्य वर्षभराच्या गुंतवणुकीसाठी आकर्षक आहे.

पीआय इंडस्ट्रीजने शेतकीय रसायने बनविण्यासाठी कंत्राटी सेवा पुरविणाऱ्या ईसाग्रो आशियाचे अधिग्रहण केले आहे. कंपनीला सध्याच्या उत्पादन क्षेत्राजवळच तीस एकर जागेवरच्या नव्या कारखान्याचा लाभ मिळेल. गेल्या दोन वर्षांतील कंपनीच्या प्रगतीचा वाढता आलेख, लहान भागभांडवल, कर्जाचे नगण्य प्रमाण आणि शेतीपूरक उद्योगांचे भवितव्य लक्षात घेता कंपनीमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

लार्सन अ‍ॅंड टुब्रोच्या हायड्रोकार्बन विभागाने एचपीसीएलकडून दोन मोठी कंत्राटे मिळविली. गेल्या तीन महिन्यात लार्सन अ‍ॅंड टुब्रोच्या विविध उद्योग विभागांनी अनेक महत्त्वाची मोठी कंत्राटे मिळवून वार्षिक तुलनेत ३६ टक्के वाढ दाखविली आहे. त्यामुळे या वर्षांच्या नवीन मागण्यांमधे अपेक्षेपेक्षा जास्त वाढ दिसेल. पायाभूत सुविधांवर भर देण्याच्या सरकारी धोरणाचा आणि बांधकाम क्षेत्रातील वाढीव मागणीचा तसेच  खासगी क्षेत्रातील वाढीव भांडवली खर्चाचा कंपनीला फायदा होईल. सध्या या समभागात सतत वाढ होत आहे. त्यामुळे योग्य संधी मिळताच खरेदी करावी.

बजाज फायनान्स आणि एचडीएफसी बँक या किरकोळ क्षेत्रात कर्ज देणाऱ्या दोन प्रमुख कंपन्यांनी डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीतील कर्ज वाटपाचे आकडे प्रसिद्ध केले. जास्त सतर्कतेचे धोरण ठेवले असल्यामुळे बजाज फायनान्सच्या कर्जवाटपात एक टक्क्य़ांची घट तर एचडीएफसी बँकेच्या कर्जवाटपात १६ टक्के  वाढ झाली. अल्प मुदतीसाठी बजाज फायनान्समध्ये नफावसुली करता येईल.

डिजिटल व क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली पुरविण्याची तयारी भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी तीन ते चार वर्षे आधीच केली होती. ट्रम्प प्रशासनाच्या ‘एच१बी’ व्हिसावरील निर्बंधांमुळे दूरस्थ सेवा देणेही त्यांनी आत्मसात केले होते. त्यामुळे घरून काम करण्याचे आव्हानही या कंपन्यांनी लीलया पेलले. त्यामुळे टाळेबंदीचा काळ या कंपन्यांना ‘वाय२के’सारख्या संधीचा ठरला. त्याचा पुरेपूर फायदा घेत नवीन कंत्राटे मिळविण्याची मालिकाच सुरू झाली. नुकत्याच जाहीर झालेल्या टीसीएसच्या तिमाही निकालात त्याचे प्रत्यंतर आले. पुढील दोन-तीन वर्षे या क्षेत्रातील कंपन्यांमधील गुंतवणूक मोठा फायदा देत राहील.

खासगी कारखानदारीच्या आकडय़ात झालेली ५६ टक्क्य़ांची वाढ, ग्राहकोभोग्य वस्तूंच्या विक्रीतील १७ टक्के  वाढ, एचडीएफसी बँकेच्या ठेवीमधील १६ टक्के वाढ हे काहीसे समाधानकारक संकेत आहेत. त्यामुळे बाजारातील तेजी कायम राहिली तरी एखाद्या लहानशा कारणाने बाजारात मोठी पडझड होऊ शकते. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार आधीच कमकुवत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ९.६ टक्क्य़ांनी खाली येण्याची शक्यता आहे. गेल्या बुधवारच्या घसरणीने बाजाराचा कमकुवतपणाच दाखवून दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध असणे महत्त्वाचे.

sudhirjoshi23@gmail.com