29 October 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : गुगली

बाजारात शाश्वत सुधारणा ही सेन्सेक्सवर ३९,३०० आणि निफ्टीवर ११,६००च्या वरच असेल.

आशीष ठाकूर

या स्तंभातील १४ सप्टेंबरच्या ‘दिस जातील, दिस येतील’ या लेखातील वाक्य होतं.. ‘‘हे तेजीचे दिस भारत-चीन सीमा प्रश्नामुळे निर्माण होणारा युद्धज्वर, अथवा अमेरिकी भांडवली बाजारातील घातक उतार, किंवा आताच्या घडीला अज्ञात असलेल्या कारणांनी केव्हाही सरतील. मात्र भांडवली बाजारात घातक उतार आले तरी, या पडझडीत, सेन्सेक्सवर ३६,६५० ते ३५,७०० आणि निफ्टीवर १०,८०० ते १०,५५०चा स्तर राखण्यात निर्देशांक यशस्वी ठरल्यास हे वाईट दिस आणि भोगदेखील सरून सुखाचे चांगले दिस येतील.’’ वाक्यातील आशावादावर, सरलेल्या आठवडय़ातील मंदीने टाकलेल्या  गुगलीवर बाद न होता, ही गोलंदाजी  गुंतवणूकदारांनी खेळून काढली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३७,३८८.६६

निफ्टी : ११,०५०.२५

अमेरिकी भांडवली बाजाराचे ‘डाऊ जोन्स’ आणि ‘नॅसडॅक’ निर्देशांक हे आलेखानुसार तेजी करून थकल्यागत वाटत असल्यामुळे, अमेरिकेत व आपल्या बाजारात मंदी येण्यामागचे हे एक कारण असेल, याचे सूतोवाच ‘दिस जातील, दिस येतील’ या लेखात केलेले, ते आता प्रत्यक्षात आले.

येणाऱ्या दिवसांत निर्देशांकाचा भरभक्कम आधार हा सेन्सेक्सवर ३६,६५० आणि निफ्टीवर १०,८०० असेल. या स्तराचा आधार घेत निफ्टीचे वरचे लक्ष्य हे ११,२९२ ते ११,४१० असेल.

निफ्टीचे उपरोक्त वरचे लक्ष्य काढण्यासाठी ‘फेबुनासी फॅक्टर’चा आधार घेतला, यासाठी निफ्टी निर्देशांकाचा ३१ ऑगस्टचा ११,७९४ हा उच्चांक गृहीत धरला व २४ सप्टेंबरचा निफ्टीवरील १०,७९० नीचांक गृहीत धरला. आता उच्चांक व नीचांकातील फरक (११,७९४ वजा १०,७९०) १,००४ अंशांचा आला. आता १,००४ हा केंद्रबिंदू पकडून फेबुनासी फॅक्टरचे ०.३८२ टक्के हे (१,००४ .३८२%) ३८४ अंश इतके येतात. निफ्टीच्या १०,७९० च्या नीचांकामध्ये ३८४ अंश मिळवले असता, निफ्टीवर ११,१७४ (१०,७९०+३८४ = ११,१७४) हे प्रथम वरचे लक्ष्य असेल. त्यानंतर १००४ चे ०.५०० टक्के हे ५०२ असेल. हे ५०२ अंश निफ्टीच्या १०,७९० नीचांकामध्ये मिळवले असता निफ्टीचे ११,२९२ चे लक्ष्य असेल. अंतिमत: ०.६१८ टक्क्यांचा घटक. १००४ चे ०.६१८ टक्के हे ६२० अंश येतात. हे निफ्टीच्या १०,७९० च्या नीचांकामध्ये मिळवले असता निफ्टीचे वरचे लक्ष्य हे ११,४१० असे असेल.

ज्या गुंतवणूकदारांना गणित विषयाची आवड आहे त्यांना हे बौद्धिक खाद्य असेल. अन्यथा वरील आकडेमोडीची व्यवहारातील उपयुक्तता आहेच. बाजारातील सुधारणेचे प्रथम वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३७,८२३ आणि निफ्टीवर ११,१७४ / द्वितीय लक्ष्य सेन्सेक्सवर ३८,२३८ व निफ्टीवर ११२९२ आणि अंतिम लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३८,६५३ आणि निफ्टीवर ११,४१० असे असेल. बाजारात शाश्वत सुधारणा ही सेन्सेक्सवर ३९,३०० आणि निफ्टीवर ११,६००च्या वरच असेल.

जाहीर झालेले कंपन्यांचे वित्तीय निकाल आणि त्यांचे विश्लेषण..

या स्तंभातील ३ ऑगस्टच्या लेखात ल्युपिन लिमिटेडचे निकालपूर्व विश्लेषण केले होते. त्यानुसार, तिमाही निकालाची नियोजित तारीख ६ ऑगस्ट होती. ३१ जुलैचा बंद भाव ९२७ रुपये होता. निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर ९०० रुपये होता. तिमाही वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर, समभागाचा बाजारभाव महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तरावर टिकला, तर तिमाही निकाल चांगला, अन्यथा वाईट, असे त्या विश्लेषणात नमूद केले होते. जर निकाल उत्कृष्ट असेल तर ९०० रुपयांचा महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तर राखत १,१०० रुपयांचे वरचे लक्ष्य लेखात सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होते. ल्युपिन लिमिटेडने निकालापश्चात ९०० रुपयांचा स्तर राखत १८ सप्टेंबरला १,१२२ रुपयांचा उच्चांक नोंदवला. ज्या गुंतवणूकदारांकडे ल्युपिन दीर्घमुदतीच्या गुंतवणूक धारणेअंतर्गत आहेत त्यांनी ते राखून ठेवले व अत्यल्पमुदतीच्या गुंतवणूकदारांनी अल्पावधीत १८ टक्क्यांचा घसघशीत परतावा मिळविला. सरलेल्या सप्ताहातील घातक उतारातदेखील ल्युपिनने ९०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत, सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारचा त्याचा साप्ताहिक बंद हा ९९७ रुपये आहे.

करू या तुमच्याकडील समभागांचे विश्लेषण!

अनेकांगाने उपयुक्त ठरलेल्या ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ या संकल्पनेचा वाचकांनाही जास्तीत जास्त फायदा मिळायला हवा. यासाठी, वाचकांकडून आलेल्या शिफारसीनुरूप, त्यांच्या समभागांच्या निकालपूर्व विश्लेषण ‘लोकसत्ता – अर्थ वृत्तान्त’ करणार आहे. आपल्या समभागाचे नाव आम्हाला या ई-मेल – arthmanas@expressindia.com वर कळवावा. ज्यायोगे ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कंपन्यांच्या त्रमासिक निकालांच्या हंगामात या समभागाचे विश्लेषण, किमतीचा चढ-उतार आदींशी प्रत्यक्ष निकालाअगोदरच तुम्हाला अवगत होता येईल.

ashishthakur1966 @gmail.com

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 1:45 am

Web Title: stock market analysis stock market review zws 70
Next Stories
1 थेंबे थेंबे तळे साचे : शेअर बाजारातील अभिमन्यू की अर्जुन?
2 अर्थ वल्लभ : आहे मनोहारी तरी..
3 कर बोध : घर आणि प्राप्तिकर  वजावटी  
Just Now!
X