सुधीर जोशी

करोनाचा पुन्हा एकदा सुरू झालेला वाढता प्रसार बाजाराला चिंताग्रस्त करत आहे. त्यामुळे बाजारातील वातावरण सध्या अनिश्चित बनले आहे. मार्चअखेरच्या वार्षिक निकालांना सुरुवात होत नाही तोपर्यंत बाजाराला निश्चित दिशा मिळणार नाही.

अमेरिकी मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याज दर नियामकांच्या बैठकीकडे लक्ष ठेवून गुंतवणूकदारांनी नवीन खरेदीला लगाम घातला व थोडी सावधगिरी दाखवत दोन पावले मागे टाकली. ‘फेड’ने पुढील दोन वर्षे व्याज दर न वाढवण्याचे व अमेरिकी अर्थव्यवस्था लवकरच पूर्वपदावर येण्याचे संकेत दिले. अमेरिकी बाजारात त्याचे संयमित स्वागत झाले. परंतु भारतीय बाजारात सुरू झालेली घसरण अधिकच तीव्र झाली. करोनाच्या दुसऱ्या लाटेचे आगमन व अमेरिकेतील रोखे बाजारातील परताव्यात होणारी वाढ यामुळे गुंतवणूकदारांची जोखीम क्षमता थोडी कमी झाली. गेल्या सप्ताहात पाच कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्रीमुळेदेखील बाजारातील रोकडसुलभतेवर मर्यादा आल्या. मात्र चार दिवसांच्या घसरणीनंतर ऊर्जा व एफएमसीजी क्षेत्रातील कमी जोखमीच्या समभागांना गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिले व या समभागांनी बाजार सावरला आणि निर्देशांकांची साप्ताहिक घसरण एक टक्क्यापर्यंत मर्यादित राहिली.

‘सेबी’ने म्युच्युअल फंडांच्या बँकांमधील ‘परपेच्युअल बाँड’मार्फत होणाऱ्या गुंतवणुकीवर बंधने आणली. १ एप्रिलपासून अमलात येणाऱ्या नवीन बंधनांमुळे बँकांचा स्वस्तात कर्जउभारणी करण्याचा एक स्रोत कमी होईल. त्यामुळे बँकांच्या विशेषत: सरकारी बँकांच्या समभागांवर विक्रीचे दडपण आले व बँक निफ्टीमध्ये तीन टक्क्यांची घसरण झाली.

बाजाराच्या ताज्या घसरणीतही रोज वर गेलेला समभाग म्हणजे आयटीसी! याआधी अनेकदा अपेक्षा केलेल्या आयटीसीच्या उप-व्यवसायांच्या विलगीकरणाला येत्या काही महिन्यांतच वेग येईल अशी बातमी बाजारात चर्चेत होती. आयटीसीच्या ग्राहकोपभोग्य व्यवसायाचे बाजारात त्यामुळे योग्य मूल्यांकन होईल व भागधारकांचा फायदा होईल.

जागतिक स्तरावरील प्रसिद्ध अ‍ॅक्सेंच्युयर या माहिती सेवा क्षेत्रातील सल्लागार कंपनीने पुढील वर्षांच्या उत्पन्नाचे भाकीत दोन टक्क्यांनी वाढविले. डिजिटल व्यवसायात कंपनीला अधिक व्यवसाय अपेक्षित आहे. बाजारातील घसरणीमुळे गुरुवारी तीन टक्क्यांनी खाली गेलेले माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे समभाग या बातमीने परत सावरले.

‘ईझमाय ट्रिप’चे समभाग किरकोळ नफ्यासह सूचिबद्ध झाले. गुंतवणूकदारांनी नफावसुली करून भांडवल मोकळे करायला हरकत नाही. एमटार टेक्नोलॉजीचे समभाग दुप्पट किमतीला सूचिबद्ध झाले. कंपनी संरक्षण, अंतराळ व स्वच्छ ऊर्जा अशा क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी डीआरडीओ, न्यूक्लियर पॉवर कॉरपोरेशन, इसरो, राफेलसारख्या कंपन्यांबरोबर व्यवसाय करते. कंपनीला नुकतेच ९३ कोटींचे निर्यातीचे कंत्राट मिळाले. या क्षेत्रांचे भविष्यातील महत्त्व विचारात घेता दीर्घ मुदतीसाठी हा समभाग घेऊन ठेवता येईल.

बाजारातील व्यवहारांशी निगडित असा सीडीएसएलचा समभाग पुन्हा एकदा गुंतवणुकीसाठी सुचवावासा वाटतो. टाळेबंदीच्या काळात नवीन डीमॅट खात्यांमध्ये झालेल्या वाढीचा फायदा या कंपनीला मिळून कंपनीने एकूण खात्यांच्या संख्येत एनएसडीएललादेखील मागे टाकले आहे. कंपनीचा बाजाराच्या व्यवहारातील वाटा आता ५८ टक्के झाला आहे. कंपनीला ३५ टक्क्यांहून जास्त उत्पन्न कंपन्यांकडून वार्षिक फीच्या स्वरूपात मिळते. जे कायमस्वरूपी असते. २० टक्के उत्पन्न बाजारातील व्यवहारांवर अवलंबून असते जे दिवसेंदिवस वाढतच आहे. बाकीचे उत्पन्न कंपन्यांची प्रारंभिक समभाग विक्री, केवायसीसारख्या ऑनलाइन सेवा इत्यादी बाजाराशी निगडित स्रोतांतून मिळते. कंपनीचा खर्च मात्र संगणकीय सेवा व पगार यावर होतो जो व्यवहारांच्या तुलनेत फारसा वाढत नाही. त्यामुळे महाग वाटला तरी प्रत्येक घसरणीत जमवून ठेवावा असा हा समभाग आहे.

करोनाचा पुन्हा एकदा सुरू झालेला वाढता प्रसार ही एक चिंतेची बाब आहे. गेल्या वर्षी अनुभवलेली टाळेबंदी व त्याचे उद्योगजगतावर होणारे परिणाम बाजाराला चिंताग्रस्त करत आहेत. त्यामुळे बाजारातील वातावरण सध्या अनिश्चित बनले आहे. मार्चअखेरच्या वार्षिक निकालांना सुरुवात होत नाही तोपर्यंत बाजाराला निश्चित दिशा मिळणार नाही. परंतु गेल्या वर्षांतील टाळेबंदीचा अनुभव लक्षात घेता पुन्हा असे कडक नियम लागणार नाहीत. लसीकरणाच्या आघाडीवरदेखील प्रगती सुरू आहे. परंतु महागाईचा दरही वाढतो आहे. सध्या बाजारात थोडी सावधगिरी दाखवायला हवी. घसरणीत सामील न झालेल्या समभागांवर लक्ष केंद्रित करायला हवे.

sudhirjoshi23@gmail.com