सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

भारतीय बाजारांची घोडदौड गेल्या सप्ताहातही सुरूच राहिली. चीनमधील करोना विषाणूच्या नव्याने उद्रेकाच्या बातमीने बुधवारी आलेली घसरण अल्पजीवी ठरली. माहिती तंत्रज्ञान, औषधे व पोलाद अशा क्षेत्रांत खरेदीचा उत्साह दिसून आला. स्टील अ‍ॅथॉरिटीचे दमदार निकाल, जेएसडब्यू स्टीलच्या मे महिन्याच्या उत्पादनाचे आकडे व चीनकडून पोलादाच्या निर्यातीवर बंधने आणण्याची बातमी यामुळे सर्वच पोलाद क्षेत्रातील कंपन्यांना मागणी राहिली. टीसीएसच्या वार्षिक सभेत व्यक्त झालेला आशावाद माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांना प्रेरक ठरला. सतत चार आठवडे उच्चांकाकडे वाटचाल करीत सेन्सेक्स व निफ्टी परत एकदा नव्या उच्चांकावर बंद झाले.

गेल्या डिसेंबर महिन्यात २८८ रुपयांस प्राथमिक समभाग विक्री केलेल्या मिसेस बेक्टर फूड्सचे समभाग सध्या ४३४ रुपयांच्या आसपास मिळत आहेत. बाजारात सूचिबद्ध झाल्यावर समभागाने ६०० रुपयांच्या वरची पातळी गाठली होती. कंपनी बेकरी क्षेत्रात १९७८ पासून कार्यरत आहे. कंपनीची उत्पादन क्षमता सध्या ८० ते ९० टक्क्यांपर्यंत वापरली जात आहे. कंपनीच्या पंजाब व मध्य प्रदेशात विस्तार कार्यक्रम हाती घेतला आहे. कंपनीचा मोठय़ा बर्गर विक्रेत्यांशी पुरवठा करार आहेत. टाळेबंदी शिथिल झाल्यावर खाद्यपदार्थाच्या वाढू शकणाऱ्या विक्रीचा कंपनीला अप्रत्यक्ष फायदा मिळेल. मार्चअखेर वर्षांचे निकालही समाधानकारक आहेत. सध्याच्या भावात दोन वर्षांसाठी गुंतवणुकीची संधी आहे.

मागील सप्ताहात सुचविलेल्या एनसीसीसारखीच अशोका बिल्डकॉन ही पायाभूत क्षेत्रातील बांधकाम कंपनी आहे. अशोका बिल्डकॉनला मालदीवमधून १,०१८ कोटींची घर बांधणीचे कंत्राट मिळाले आहे. कंपनीचे मार्चअखेरचे निकाल अजून यायचे आहेत. त्यामध्ये करोनाकाळाचा प्रभाव दिसेल तरीही करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरचे कमी होणारे निर्बंध बघता कंपनी पुढील वर्षांत चांगली कामगिरी करू शकेल. रस्ते, रेल्वे तसेच ऊर्जा प्रकल्प अशा विविध क्षेत्रांत असलेल्या या कंपनीच्या हातात पुढील तीन वर्षे पुरतील इतकी कंत्राटे आहेत. कंपनीच्या कर्जाचे कमी झालेले प्रमाण व इतर सम-व्यावसायिक कंपन्यांच्या तुलनेतील सध्याचे बाजार मूल्य खरेदीसाठी आकर्षक आहे.

टीमलीज सव्‍‌र्हिसेस या कंत्राटी कामगार व ऑफिस स्टाफ पुरविणाऱ्या कंपनीच्या उत्पन्नात सलग दुसऱ्या तिमाहीत ५ टक्के वाढ झाली. पर्यटन, प्रवास, हॉटेलसारख्या सेवा उद्योगांमध्ये अजूनही मंदीचे सावट असले तरी ई-कॉमर्स, बँकिंग व अत्यावश्यक वैद्यकीय सेवांसारख्या क्षेत्रांमधील नव्या नोकरभरतीचा लाभ कंपनीला मिळाला. करोनानंतरच्या काळातही असणाऱ्या अनिश्चित वातावरणामुळे उद्योग क्षेत्रांचा भर कंत्राटी कामगार नेमण्यावरच राहील. त्यामुळे यासारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी आहे.

गॅलेक्सी सरफॅक्टंट्स ही कंपनी सौंदर्य प्रसाधने, साबण, शाम्पू अशा स्वच्छतेशी निगडित उत्पादने बनविणाऱ्या कंपन्यांना मुख्य कच्चा माल पुरविते. कंपनीचे ५५ टक्के उत्पन्न हिंदुस्तान युनिलिव्हरसारख्या मोठय़ा कंपन्यांकडून मिळते. कंपनीच्या कच्च्या मालाच्या किमतीतील चढ-उतार ग्राहकांकडून वसूल करता येतो, त्यामुळे नफ्याचे प्रमाण स्थिर राहू शकते. कंपनीची नवीन उत्पादन क्षमता या वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांत कार्यरत होणार आहे. कंपनीमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज या दलाली व्यवसाय करणाऱ्या कंपनीने मार्चअखेरच्या तिमाहीत ३२९ कोटींचा नफा मिळविला आहे जो गेल्या वर्षांच्या याच तिमाहीत १५४ कोटी होता. कंपनीची प्रति समभाग नफा १०.२२ रुपये झाला आहे जो गेल्या वर्षी ४.७८ रुपये होता. शेअर बाजारातील सामान्य गुंतवणूकदारांचा सहभाग या वर्षी वाढला आहे. बाजाराच्या एकूण व्यवहारांमध्ये सामान्य गुंतवणूकदारांचे प्रमाण गेल्या वर्षी ३९ टक्के होते जे आता ४५ टक्के झाले आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजला बँकेचे मोठे पाठबळ आहे, तसेच तंत्रस्नेही सेवा पुरवण्यामध्ये हा समूह अग्रेसर आहे. त्यामुळे बाजारातील थोडय़ा घसरणीच्या वेळी हे समभाग जमविणे फायद्याचे ठरेल.

बाजारावर तेजीवाल्यांची मजबूत पकड आहे. केंद्रीय अर्थखात्याच्या अहवालाप्रमाणे करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीपर्यंतच सीमित राहील. भारताचा लसीकरणाचा कार्यक्रमही नव्या धोरणाने जोरात अमलात येणार आहे. त्यामुळे जागतिक घडामोडींशिवाय भारतीय बाजाराला मोठय़ा पडझडीची  शक्यता दिसत नाही. काही लहान कंपन्यांचे समभाग वर जाताना दिसत आहेत. त्यांच्यापासून दूर राहायला हवे. गुंतवणूकदारांनी संधी मिळेल तेव्हा पोर्टफोलियोमधील उत्तम समभागात भर घालणे व जर समभाग खरेदीचा कुठला चुकीचा निर्णय घेतला गेला असेल तर तो समभाग विकून मोकळे होण्याची हीच संधी आहे.