01 June 2020

News Flash

बंदा रुपया : औद्योगिक ज्ञानेंद्रियांचे निर्मिक

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

 विद्याधर कुळकर्णी

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

कुठलीही गोष्ट जोखण्याची, मापण्याची अर्थात ‘सेन्स’ करण्याची एक यंत्रणा असते. आधुनिक जगात या अशा ‘सेन्सर’ प्रणालीला अजोड महत्त्व आहे. औद्योगिक क्षेत्रात तापमान, वजन, हवेचा दाब, एखाद्या द्रव्याची पातळी, प्रकाश, विजेचा प्रवाह किंवा दाब, विशिष्ट प्रक्रियेत वायूचे वा इंधनाचे प्रमाण वगैरे साऱ्या गोष्टी स्वयंचलित रूपात अर्थात ‘सेन्सर्स’च्या सहाय्याने अगदी नेमकेपणाने पार पडतात. आपल्या आसपास आणि आपल्याला नकळत असे अनेक प्रकारचे कृत्रिम सेन्सर्स आपले कार्य करीत असतात.

हे सेन्सर्स म्हणजे मानवी शरीरातील डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा या सारख्या इंद्रियांचे आधुनिक जगात माहिती ग्रहण व नियंत्रणाचे सेवा कार्य करणारी कृत्रिम ज्ञानेंद्रियच आहेत.

अशा क्षेत्रात मराठी मातीतील एक कंपनी आपले कसब-कौशल्य पणाला लावते आणि यशही कमावते. यशाची मात्राही इतकी जोमदार सुझुकी, बॉश, जीई या सारख्या महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्यांची तिच्या उत्पादनांना मान्यता मिळते. इतकेच नव्हे तर देशाच्या सीमांची घुसखोरीपासून अभेद्यता ते भारतीय लष्कराची शस्त्रसज्जता अशी जबाबदारी वाहणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओला देखील या कंपनीच्या कामगिरीची दखल घ्यावीशी वाटते. डीआरडीओच्या क्षेपणास्र विकसनामध्ये जिची अनेक उत्पादने वापरात येतात अशा सेन्सर निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या ‘युनि-ऑटोमेशन (इंडिया) प्रा. लि.’ आणि तिचे संस्थापक विद्याधर महाजन यांची यशोगाथा म्हणूनच विशेष लक्षवेधी ठरते.

प्रथम पिढीचे उद्योजक असलेल्या विद्याधर महाजन यांच्या सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील ‘युनि-ऑटोमेशन (इंडिया) प्रा. लि.’ या उद्योगाद्वारे पंचाहत्तरहून अधिक कुटुंबीयांचे भरणपोषण केले जात आहे. वडिलांकडून प्रेरणा घेत विद्याधर यांनी अभियांत्रिकी शिक्षण घेतले. सुरुवातीला काही वर्षे नोकरी केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न त्यांनी मोठय़ा संघर्ष आणि मेहनतीने पूर्ण केले. औद्योगिक, संरक्षण आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील उत्पादनांची मालिका तयार करणाऱ्या या कंपनीने आयएसओ ९००१-२०१६ आणि आयएटीएफ १६९४९ प्रमाणपत्र संपादन केले आहे.

आपल्या आजवरच्या प्रवासाचे कथन विद्याधर महाजन अशा तऱ्हेने करतात – माझे वडील प्रा. कृ. द. महाजन हे लंडन इम्पिरियल कॉलेजमध्ये शिकलेले एक कुशल स्ट्रकचरल अभियंता होते. ते पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होते. स्वाभाविकच मी अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचे ठरविले आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९७६ मध्ये पदवी संपादन केली. त्यानंतर मी लार्सन आणि टुब्रो लिमिटेड (एल अँड टी) कंपनीच्या मुंबई येथील स्विचगियर डिझाईन आणि विकास विभागात रूजू झालो. येथील सहा वर्षांंच्या कालावधीत मी देशभर प्रवास करून स्विचगियरच्या अनेक कंपन्यांना भेट दिली. १९८२ मध्ये मी पुण्याला परतलो आणि भारत फोर्ज कंपनीमध्ये मटेरियल मॅनेजमेंट विभागात रूजू झालो. या नोकरीमध्ये मी व्यवसायाच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास केला.

अग्रणी अभियांत्रिकी कंपन्यांतील १० वर्षांंच्या औद्योगिक अनुभवानंतर १९८५ मध्ये महाजन यांनी युनिव्हर्सल ऑटोमेशनची स्थापना केली. चार वर्षांंनी म्हणजे – १९८९ मध्ये या संस्थेचे एका खासगी मर्यादित कंपनीमध्ये रूपांतर झाले. त्यावेळी पोटेंशिओ मीटर, लेव्हल सेन्सिंग स्विच, लिकेज टेस्टिंग मशीन्स ही कंपनीची उत्पादने होती. सुझुकी मोटर्स इंडियासाठी ही कंपनी ओईएम उत्पादने पुरवठादार बनली. पुढे १९९१ मध्ये पुण्यापासून १५ किलोमीटर अंतरावर छोटय़ा जागेत कंपनीचा कारखाना हलविला.

पोटेंशिओ मीटर याच एका उत्पादनावर १९९७ पासून लक्ष केंद्रित केले. जर्मनीला छोटय़ा प्रमाणात निर्यात करण्यास सुरुवात केली. २००४ मध्ये कंपनीने स्वत:च्या सूत्रीकरणासह प्रथमच प्रवाहकीय प्लास्टिक मुद्रित पोटेंशिओ मीटर सेन्सरचे तंत्र विकसित केले.

२००७ मध्ये बॉश इंडियासाठी एक पोटेंशिओ सेन्सर विकसित केला. या सेन्सरच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी आणि अभियांत्रिकीसाठी युनिव्हर्सल ऑटोमेशनला बॉशकडून सलग चार वर्षे सर्वोत्कृष्ट पुरवठादार म्हणून मान्यता देण्यात आली.

महाजन सांगतात, २०१० मध्ये आम्ही पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर शिरवळ येथे एक मोठी जागा खरेदी करून उद्योग तेथे हलविला. दोन हेक्टर जागेवर सात हजार चौरस मीटर बांधकाम करण्यात आले असून येथे भारतातील आणि परदेशातील बऱ्याच ग्राहकांसाठी सेन्सर प्रिंटिंगसाठी एक अनोखा क्लीन रूम प्रस्थापित केला आहे.

अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिक (जीई) कंपनीसाठी युनिव्हर्सल ऑटोमेशनने २०१३ मध्ये एक विशेष पॉवर पोटेंशिओ मीटर विकसित केला आणि जानेवारी २०१६ पासून अमेरिकेला पुरवठा केला. जीई कंपनीसाठी लोकोमोटिव्ह कंट्रोलर विकसित केला.

या लोकोमोटिव्ह कंट्रोलरचा सध्या भारतीय रेल्वेकडूनही उपयोग केला जात आहे. कंपनीकडे चारशेहून अधिक ग्राहक असून यापैकी अनेक ग्राहक अमेरिका, युरोप आणि चीनमधील आहेत. भारत, युरोप, अमेरिका आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये वितरणाची साखळी आहे.

युनि-ऑटोमेशनकडे २५ अभियंत्यांसह, ७५ निष्णात कर्मचारी आहेत.

सेन्सर तंत्रज्ञानामध्ये नवीन उत्पादन विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे युनि-ऑटोमेशन प्रा. लि. आज मजबूत वाढीच्या टप्प्याला पोहोचू शकली आहे. महाजन यांनी समयोचित निर्णयाची आज मधूर फळे चाखावयास मिळत असल्याचे सांगितले.

याच धोरणानुसार, २०१७ मध्ये त्यांनी पोटेंशिओ मीटर बनविणारी एक स्विस कंपनी ताब्यात घेतली. या कंपनीच्या माध्यमातून युनि-ऑटोमेशनला युरोप आणि जगातील विकसित बाजारपेठेमध्ये चांगल्या प्रकारे पोहचता आले. या सर्व कामामध्ये पत्नी स्नेहा महाजन यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांचे सहकार्य आणि सर्वात मुख्य म्हणजे कंपनीतील अभियंते व कर्मचाऱ्यांसह सहाय्य लाभत असल्याने या उद्य्ोगाला ही मजल गाठता आली, असे महाजन कृतज्ञतापूर्वक सांगतात.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे १९९५ मध्ये विद्यधर महाजन यांना प्रथम पिढीचे उद्य्ोजक म्हणून प्रतिष्ठित गो. स. पारखे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार हे आपल्या कष्टप्रद उद्यम प्रवासाला लाभलेले यशाचे कोंदण म्हणून आणि कामाची दखल घेऊन निश्चितच दिले जातात. तरी त्यातून यापुढेही असेच चांगले काम करीत यशाची नवनवीन कक्षांना ओलांडत जाण्याच्या जबाबदारीची जाणीवदेखील दिली जाते.

ही जाणीव ठेऊनच महाजन आणि त्यांच्या कंपनीची निरंतर वाटचाल सुरू आहे.

विद्याधर महाजन

युनि-ऑटोमेशन(इं)प्रा.लि.

’ व्यवसाय : सेन्सर तंत्रज्ञानावर  आधारीत उत्पादने

’ कार्यान्वयन : सन १९८९

’ कर्मचारी संख्या : १०० (पैकी २५ अभियंते)

’ डिजिटल अस्तित्व  : www.uniautomation.com

लेखक ‘लोकसत्ता’चे पुणे प्रतिनिधी आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2020 6:25 am

Web Title: successful marathi industrialists maharashtra industrialists zws 70
Next Stories
1 नावात काय ? : व्ही? यू? की डब्ल्यू?
2 माझा पोर्टफोलियो : नभांगण..
3 थेंबे थेंबे तळे साचे : रोकड सुलभता फायदे आणि तोटे
Just Now!
X