|| अजय वाळिंबे

फिनोलेक्स केबल्स

(बीएसई कोड – ५००१४४)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ३७२

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु.४२६/१६२

१९७२ मध्ये इंडियन केबल इंडस्ट्रीजने अल्फा रबर कंपनी ताब्यात घेतल्यानंतर फिनोलेक्स केबल्स लिमिटेड अस्तित्वात आली. आज ४८ वर्षांनंतर फिनोलेक्स केबल्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी आणि इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशन केबलची आघाडीवर उत्पादक असून कंपनीची वार्षिक उलाढाल २,८०० कोटी रुपयांहून अधिक आहे.

कंपनीने ऑटोमोबाइल उद्योगासाठी पीव्हीसी इन्सुलेटेड इलेक्ट्रिकल केबल्सच्या निर्मितीसह त्याचे कामकाज सुरू केले. तेव्हापासून कंपनीने पीव्हीसी इन्सुलेटेड इंडस्ट्रियल केबल्स, एफआर-एलएसएच पीव्हीसी इन्सुलेटेड इंडस्ट्रियल केबल्स, रेपेलेंट मल्टीकोअर फ्लेक्झिबल इंडस्ट्रियल केबल्स, पीव्हीसी इन्सुलेटेड विंडिंग वायर्स आणि थ्री कोअर फ्लॅट केबल्स, पॉवर आणि कंट्रोल केबल्स, उच्च व्होल्टेज पॉवर केबल्स (३३ केव्हीपर्यंत), पॉलिथिलीन इन्सुलेटेड टेलिफोन केबल्स, ऑटो आणि बॅटरी केबल्स, लॅन केबल्स, स्विचबोर्ड केबल्स, फायबर ऑप्टिक केबल्स अशा विविध उत्पादनात पदार्पण करून आपले स्थान मजबूत केले आहे.

विविध प्रकारच्या वायर आणि केबलव्यतिरिक्त कंपनी प्रकाश उत्पादने, विद्युत उपकरणे, स्विचगियर, पंखे आणि वॉटर हिटरचेदेखील उत्पादन करते. कंपनीचे पुण्यात पिंपरी आणि उरसे तसेच गोवा आणि उत्तराखंड येथे अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प आहेत.

उत्पादने वितरित करण्यासाठी कंपनीकडे ५,००० हून अधिक वितरकांचे जाळे असून ५०,००० हून अधिक किरकोळ विक्रेते आहेत. कंपनीने तंत्रज्ञानाचे निरंतर उन्नतकरण, उत्पादन सुविधांचे आधुनिकीकरण आणि गुणवत्ता व सेवांचे उच्चतम स्तर राखून एक दर्जेदार उत्पादक म्हणून प्रतिष्ठा स्थापित केली आहे. कंपनीला हार्वर्ड बिझिनेस स्कूल असोसिएशन ऑफ इंडिया – ‘कॉर्पोरेट एक्सलन्स’साठी इकॉनॉमिक टाइम्स पुरस्कार; आयआयएम – ‘मार्केटिंग’साठी एलआयसी पुरस्कार आणि अभियांत्रिकी निर्यात पदोन्नती परिषदेच्या ‘निर्यात कामगिरी प्रमाणपत्र’ असे अनेक सन्मान मिळाले आहेत.

कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल अद्याप जाहीर व्हायचे आहेत. सप्टेंबर २०२०साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ६३९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ६९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला होता. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो ४४% ने कमी होता. अत्यल्प कर्ज असलेल्या फिनोलेक्सच्या उत्पादांनाना वाढती मागणी असून यंदाच्या तिमाहीत तसेच आगामी कालावधीत कंपनीकडून भरीव कामगिरी अपेक्षित असून सध्या ३७० रुपयांनजीक उपलब्ध असलेला हा शेअर एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून खरेदी करण्यास हरकत नाही.

भरणा झालेले भागभांडवल रु. ३०.५९ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक           ३५.९२

परदेशी गुंतवणूकदार    ७.५५

बँक/ म्यु. फंड/ सरकार           १८.३३

इतर/ जनता     ३८.२०

संक्षिप्त विवरण

* शेअर गट     : स्मॉल कॅप

* प्रवर्तक        : छाब्रिया समूह

* व्यवसाय क्षेत्र : इलेक्ट्रिकल केबल

* पुस्तकी मूल्य          : रु. २०१.२०

* दर्शनी मूल्य : रु. २/-

* लाभांश       : २७५%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न:         रु. १९.७४

*  पी/ई गुणोत्तर :        १८.९

*  समग्र पी/ई गुणोत्तर :          २७

*  डेट इक्विटी गुणोत्तर :        ००

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    २६५

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : १९.५

*  बीटा :       ०.६

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.