19 October 2019

News Flash

मंदीच्या बाजारातील ‘मौल्यवान’ ऐवज

सुप्रीम इंडस्ट्रीज लि. (बीएसई कोड -५०९९३०)

|| अजय वाळिंबे

सुप्रीम इंडस्ट्रीज लि. (बीएसई कोड -५०९९३०)

सुप्रीम इंडस्ट्रीज भारतातील आघाडीची प्लास्टिक उत्पादन करणारी एक मोठी कंपनी आहे. कंपनीच्या देशभरात ११ राज्यांतून २५ उत्पादन सुविधा उपलब्ध आहेत. कंपनीच्या प्रमुख उत्पादनात प्लास्टिक पाइपिंग, औद्योगिक आणि इंजिनीयरिंग मोल्डेड उत्पादने, मटेरियल हँडलिंग उत्पादने, प्लास्टिक मोल्डेड फर्निचर, प्रोटेक्टिव्ह पॅकेजिंग उत्पादने, क्रॉस लॅमिनेटेड फिल्म, परफॉर्मन्स पॅकेजिंग फिल्म आणि कंपोझिट एलपीजी सिलिंडर इ.चा समावेश होतो. कंपनी आपली उत्पादने तिच्या ९१४ भागीदार वितरकांतर्फे सुमारे २७,००० विक्री दालनांमधून विकते. सुप्रीमच्या प्रस्थापित ब्रॅंडमुळे उत्पादन वितरणाचा खर्च खूप कमी आहे.

अत्यल्प कर्जभार असलेल्या या कंपनीने सप्टेंबर २०१८ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. या कालावधीत कंपनीने १३१६.१७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १०७.२८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो ५१ टक्कय़ांनी अधिक आहे.

आधुनिकीकरण तसेच विस्तारीकरणासाठी कंपनी सातत्याने कार्यक्रम राबवत आहे. मार्च २०१७ अखेर समाप्त आर्थिक वर्षांमध्ये कंपनीने २३० कोटी रुपयांचा भांडवली खर्च (कॅपेक्स) केला होता, तर गेल्या आर्थिक वर्षांत ३०० कोटी रुपयांचा भांडवली खर्च होता. चालू आर्थिक वर्ष २०१९ मध्ये कंपनीकडून ३५० कोटी रुपयांचा भांडवल खर्च अपेक्षित आहे. परिणामी आगामी आर्थिक वर्षांपासून कंपनीची उत्पादन क्षमता पाच लाख टनांवरून सात लाख टनांवर जाईल. बहुतेक भांडवली खर्च हा उच्च मूल्यवर्धित उत्पादनांचा आहे, जो १७ टक्कय़ांपेक्षा अधिक ऑपरेटिंग नफा मार्जिन (ओपीएम) देऊ  शकतो. त्यामुळेच आगामी कालावधीत कंपनीची कामगिरी उत्तम राहील अशी अपेक्षा आहे. सध्याच्या बाजार मंदीचा फायदा घेऊन काही उत्तम शेअर्स तुम्हाला तुमच्या पोर्टफोलियोमध्ये जमा करायचे असतील तर त्यात सुप्रीम इंडस्ट्रीजचा विचार नक्की करा.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

First Published on December 17, 2018 1:04 am

Web Title: supreme industries ltd bse code 509930