वारसाहक्क मालमत्ता आणि भांडवली नफ्याची मोजणी..
एखादी मालमत्ता विकून होणारा नफा हा अल्पकालीन की दीर्घकालीन भांडवली नफ्यास पात्र आहे हे करदात्यांनी पाहणे निश्चितच महत्त्वाचे ठरते. परंतु वारसाहक्काने मिळालेली भांडवली मालमत्ता विकल्यानंतर होणाऱ्या  भांडवली नफ्याविषयी (म्हणजे तो अल्पकालीन का दीर्घकालीन) करदात्यांना ठाऊक असावयास हवी अशी एक महत्त्वाची तरतूद..

भांडवली नफा (कॅपिटल गेन्स) हा दोन प्रकारचा असतो. एक अल्पकालीन आणि दुसरा दीर्घकालीन! शेअर्स आणि इक्विटी-संलग्न बचत योजना सोडून एखादी भांडवली मालमत्ता उदाहरणार्थ, राहते घर विकत घेतल्यानंतर तीन वर्षांच्या विकल्यास होणारा भांडवली नफा अल्पकालीन भांडवली नफा धरला जातो. हेच घर तीन वर्षांनंतर विकल्यास होणारा भांडवली नफा हा दीर्घकालीन भांडवली नफा धरला जातो. कर आकारणीबद्दल सांगायचे तर अल्पकालीन भांडवली नफा करदात्याच्या एकूण उत्पन्नामध्ये (ग्रॉस टोटल इन्कम) समाविष्ट होतो आणि तो करदाता ज्या इन्कम स्लॅबमध्ये असेल तो कराचा दर (म्हणजे १०%, २०% अथवा ३०%) त्याला लागू होतो. पण दीर्घकालीन भांडवली नफा करदाता कोणत्याही इन्कम स्लॅबमध्ये मोडत असला तरी (या ठिकाणी समजा राहते घर विकून मिळणारा दीर्घकालीन भांडवली नफा) कलम ११२ नुसार २०% या दराने करपात्र ठरतो. कराच्या दरातील या फरकामुळे एखादी मालमत्ता अल्पकालीन अथवा दीर्घकालीन भांडवली नफ्यास पात्र आहे की नाही हे पाहणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते. दुसरे असे की, दीर्घकालीन भांडवली नफ्याबाबत कलम ५४, ५४ ईसी आदी कलमांचा वापर करून करनियोजन करून कर वाचविण्यास खूप मोठा वाव आहे. तिसरे असे की, दीर्घकालीन भांडवली नफा मोजताना ‘कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स’चा फायदा घेता येतो. या सर्व कारणांमुळे भांडवली नफा अल्पकालीन आहे की दीर्घकालनी याचे महत्त्व अधोरेखित होते.
हे सर्व नमूद करण्याचे कारण म्हणजे अनेक करदात्यांना वारसा हक्काने भांडवली मालमत्ता मिळते. अशी मालमत्ता त्यांनी विकत घेतलेली नसते. पण अशी वारसा हक्काने मिळालेली भांडवली मालमत्ता काही काळानंतर विकली जाते. वारसा हक्काने मिळालेली अशी भांडवली मालमत्ता विकल्यानंतर होणाऱ्या भांडवली नफ्याविषयी (म्हणजे तो अल्पकालीन का दीर्घकालीन) एक महत्त्वाची तरतूद करदात्यांना माहित असणे गरजेचे वाटते.
एक घडलेली घटनाच येथे नमूद करतो. श्रीयुत जोशी यांना त्यांच्या वडिलांच्या पश्चात इच्छापत्राद्वारे एक राहते घर मिळाले. २५ एप्रिल २०१३ या तारखेला ते त्यांच्या मालकीचे झाले. श्रीयुत जोशी यांच्या वडिलांनी हे घर २५ मार्च २००० साली रु. १०,००,००० किमतीला विकत घेतले होते. श्रीयुत जोशी यांनी हे घर २५ मे २०१३ रोजी रु. २०,००,००० ला विकून टाकले. श्रीयुत जोशी यांना अल्पकालीन तसेच दीर्घकालीन भांडवली नफा म्हणजे काय हे माहित होते. म्हणूनच एका गोष्टीचा त्यांच्यावर ताण होता. ती गोष्ट ही की, २५ एप्रिल २०१३ला नावावर झालेले घर २५ मे २००३ रोजी म्हणजे एका महिन्याने विकल्यामुळे झालेल्या १० लाख (२० लाख वजा १० लाख) फायद्यावर अर्थात अल्पकालीन भांडवली नफ्यावर ३०% एवढा (अल्पकालीन भांडवली नफा ३०% स्लॅबमध्ये येत असल्याने)  अर्थात तीन लाख रुपये करदायित्त्वाचे त्यांना टेन्शन होते. परंतु ज्यावेळी प्राप्तिकर कायद्यातील एका खास तरतुदीची श्रीयुत जोशी यांना माहिती झाली, त्यांचे हे टेन्शन कुठच्या कुठे पळाले!

या माहितीच्या आधारे श्रीयुत जोशी यांनी तीन लाख रुपये एवढा प्राप्तिकर भरायची गोष्ट तर बाजूलाच, त्यांना प्रत्यक्षात दीर्घकालीन भांडवली तोटाच झाल्याचे सिद्ध झाले. हे कसे?  तर प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदीनुसार एखाद्या वारसदार व्यक्तीला वारसाहक्काने एखादी भांडवली मालमत्ता विकली असेल तर भांडवली नफ्याची मोजणी करताना ती भांडवली मालमत्ता विकली असेल तर भांडवली नफ्याची मोजणी करताना ती भांडवली मालमत्ता ज्या व्यक्तीकडून त्याच्या नावे हस्तांतरित झाली त्या व्यक्तीच्या नावे ती भांडवली मालमत्ता किती काळ होती हा निकष लावला जातो. वरील उदाहरणात श्रीयुत जोशी यांच्या वडिलांच्या नावे ते राहते घर २५ मार्च २००० पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या नावे होते. म्हणजे तीन वर्षांहून अधिक काळ ते त्यांच्या नावे होते. जोशी यांच्या नावे हे राहते घर २५ एप्रिल २०१३ रोजी हस्तांतरित झाले, त्यांनी ते मग महिन्यानंतर २५ मे २०१३ रोजी (म्हणजे तीन वर्षांच्या आतच) जरी विकले असले तरी वरील परिस्थितीत ती भांडवली मालमत्ता दीर्घकालीन भांडवली मालमत्ता म्हणूनच गणली जाईल. त्यामुळेच भांडवली नफ्याची मोजणी त्यानुसारच होईल. आता वरील व्यवहारात श्रीयुत जोशींना दीर्घकालीन भांडवली तोटा कसा झाला हे स्पष्ट करतो.
आर्थिक वर्ष १९९९-२००० चा कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स     = ३८९
आर्थिक वर्ष २०१३-२०१४ चा कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स     = ८५२
राहत्या घराची किंमत =
१०,००,०००/३८९  ७ ८५२ =
रु. २१,९०,२३१
राहत्या घराची विक्री किंमत =
रु. २०,००,०००
वजा : घराची विक्री किंमत =
रु. २१,९०,२३१
= रु. (-) १,९०,२३१ अर्थात दीर्घकालीन भांडवली तोटा
आता हा रु. १,९०,२३१ इतका दीर्घकालीन भांडवली तोटा जोशी यांना इतर भांडवली नफ्यासोबत ‘सेट-ऑफ’ करून मिळू शकतो. हे म्हणजे ‘आम के आम, गुटलीओं के भी दाम’ असेच झाले. इतकेच नव्हे तर हा दीर्घकालीन भांडवली तोटा ‘सेट-ऑफ’ करून घेण्यासाठी त्या विशिष्ट आर्थिक वर्षांत समोर भांडवली नफा नसेल तर असा तोटा पुढील आठ वर्ष इतर दीर्घकालीन भांडवली नफ्यासोबत ‘सेट-ऑफ’ करण्यासाठी वापरता येईल.
तेव्हा वारसाहक्काने मिळालेली भांडवली मालमत्ता विकल्यास करदात्यांनी वर नमूद केलेल्या आश्चर्यकारक पण वास्तवदर्शी तरतुदीचा उपयोग करून प्राप्तिकर वाचवावा!
(लेखक गुंतवणूक व प्राप्तिकर सल्लागार आहेत.)