वसंत कुलकर्णी

सरत्या वर्षांत रोखे बाजारातील अनियमिततेमुळे रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांच्या मालमत्तांना गळती लागली होती. याउलट आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या रोखेसंलग्न फंडांच्या मालमत्तेत वाढ झाल्याचे दिसून येते. या फंड प्रकारात ‘आयडीएफसी बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड’ सर्वाधिक मालमत्ता असलेला फंड ठरला आहे. आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या स्थिर उत्पन्न फंडांचे गुंतवणूक प्रमुख असलेले सुयश चौधरी यांची बाजारातील यशाची रणनीती समजावून घेणे म्हणूनच उद्बोधक ठरेल. सरत्या सालाचा पुनर्वेध आणि आगामी सालातील रोखे बाजाराविषयक दृष्टिकोनासंबंधी झालेल्या संवादाचा हा गोषवारा..

* मागील वर्षभरात ‘ट्रिपल ए’ सर्वोच्च पत असलेल्या कंपन्या त्यांचे दायित्व वेळेत न निभावता आल्याने रोखे बाजाराला एकामागोमाग धक्के बसले. दुसऱ्या बाजूला २०१९ हे साल सर्वाधिक व्याजदर कपात झालेले वर्ष म्हणून ओळखले जाईल. या सर्व गोष्टींकडे रोखे गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून कसे पाहता?

– गेल्या वर्षांपासून रोखे बाजारात दोन वेगळे विचारप्रवाह आहेत. पहिला, अर्थव्यवस्था वाढीचा दर दशकातील नीचांकी पातळीवर आहे. वर्षभरात महागाईचा दर रिझव्‍‌र्ह बँकेला अपेक्षित मर्यादेत राहिल्याने रिझव्‍‌र्ह बँकेची धोरणे विपुल रोकडसुलभता राखणारी असल्याने उत्तम पत असलेल्या, जसे की केंद्र आणि राज्य सरकारचे रोखे, सरकारी मालकीच्या ‘ट्रिपल ए’ पत असलेल्या कंपन्यांसाठी हे खूप फायदेशीर ठरले, ज्यायोगे त्यामध्ये या रोख्यांत वर्षभर मोठी तेजी होती. दुसऱ्या बाजूला पतपुरवठय़ाबाबत बँका अतिशय दक्ष होत्या. गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांचे स्रोत जवळजवळ आटले आहेत. गैर ‘ट्रिपल ए’ पत असलेल्या कंपन्या ज्या रोखे विकून भांडवल उभारण्याच्या विचारात आहेत त्यांना गुंतवणूकदार अधिक व्याज मागत असल्याने, त्यांच्यासाठी रोखे विकून निधी उभारणे जवळजवळ अशक्य झाले आहे. विपुल रोकडसुलभता असूनही गुंतवणूकदार अतिशय सजग झाले असून व्याजापेक्षा मुद्दल आणि नियमिततेला प्राधान्य दिले जात आहे. आमच्या फंड घराण्याचे असे मत आहे की, हा सुरक्षिततेचा प्राधान्यक्रम निश्चित असलेला विचारप्रवाह पुढील वर्षी तसाच राहील. वेळेवर व्याज देण्यास सक्षम असलेल्या कंपन्याच रोखे विक्री करून भांडवल उभारणी करू शकतील. रोकडसुलभता आहे म्हणून असक्षम रोखे विक्रेती कंपनी भांडवल उभारू शकणार नाही. रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बठकीनंतर व्याजदर रोकडसुलभता आणि अर्थव्यवस्थेबाबतचा आशावाद लक्षात घेता, विपुल रोकडसुलभता आणि कमी व्याजदराबाबच्या धोरणात नजीकच्या काळात लक्षणीय बदल संभवत नाहीत.

*  रोखे बाजारातील अनियमिततेची सर्वात कमी झळ आयडीएफसीच्या रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांना बसली. त्रयस्थ कंपन्यांनी केलेल्या पतनिश्चितीवर तुम्ही किती विसंबून राहता? तसेच अशा कोणत्या बाबी आहेत ज्यामुळे तुमचे फंड घराणे कलंकित रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यापासून दूर राहिले?

– आमच्याकडे खरेदीचा प्रस्ताव आलेल्या रोख्यांचे पत निर्धारण एका निश्चित केलेल्या अंतर्गत प्रक्रियेद्वारे होत असते. पतनिश्चिती प्रक्रियेचे प्रमाणीकरण किंवा काही रोख्यांच्या बाबतीत अंतर्गत आणि त्रयस्थ पत निर्धारणाच्या दृष्टिकोनात तफावत असते. कधीकधी आम्हाला असे वाटले आहे की, पत निर्धारण करताना आमच्या दृष्टीने रोख्याचा बाजारातील परतावा हा संभाव्य पत निश्चित करीत असतो. रोख्याचा बाजारभाव हा पतनिश्चितीचा सर्वाधिक चांगला दिशादर्शक असतो जो एका सामूहिक शहाणपणाने आलेला असतो. त्रयस्थ पतनिश्चिती कंपनीने ‘ट्रिपल ए’ पत देऊनही अनेक रोख्यांना तत्कालीन ‘ट्रिपल ए’पेक्षा हीन परतावा मिळतो आणि या सामूहिक शहाणपणातून आम्ही कलंकित रोख्यात गुंतवणूक करण्यापासून दूर राहिलो.

* बहुसंख्य म्युच्युअल फंड विक्रेते रोखे गुंतवणूक करण्यासाठी फंडांची शिफारस करताना सर्वाधिक फंड हे आयडीएफसीचे असतात, जसे की शॉर्ट टर्म फंड, बँकिंग अँण्ड पीएसयू डेट फंड वगैरे. रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवणुकीचे ध्रुवीकरण आणि रोकडसुलभतेसंबंधित जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी तुमची काय धोरणे आहेत?

– रोखे गुंतवणुकीत वैविध्य जपून ध्रुवीकरण टाळण्याच्या काही पद्धती आम्ही जाणीवपूर्वक स्वीकारल्या आहेत. काही विशिष्ट प्रवर्तकांच्या कंपन्यांच्या रोख्यांत गुंतवणूक न करण्याचे आमचे धोरण आहे. आम्ही कायमच आभासी वैविध्यापासून दूर राहिलो आहोत. समान प्रवर्तक असलेल्या वेगळ्या कंपन्यांमधील गुंतवणूक करणे नेहमीच विविधता म्हणून ओळखले गेले तरी आमच्यासाठी एका प्रवर्तक समूहाच्या कंपन्यांसाठी कमाल मर्यादा ठरविली आहे. दोन स्वतंत्र कंपन्यांची पत एक असली तरी उद्योगक्षेत्रानुसार त्यांचे जोखिमांक वेगळे असतात. काही मालमत्ता किंवा वस्तूंच्या किमतीत बदलामुळे पत बदलली नाही तरी जोखिमांक बदलतो. म्हणून गुंतवणुकीतील विविधता ही वास्तवात हवी आणि आभासी नसावी. वर म्हटल्यानुसार गुंतवणूक पद्धती आणि वस्तुस्थितीतून आमचे जोखीम व्यवस्थापनदेखील वेगाने बदलत असते. हे आमचे विविधता आणि रोकड सुलभता यांचा समतोल साधण्यामागचे धोरण आहे.

* गेल्या एक वर्षांत रोखे अनियमिततेनंतरदेखील तुमच्या रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांच्या मालमत्तेत वाढ झाली. तुमचा बँकिंग अँण्ड पीएसयू डेट फंड त्या फंड गटात म्युच्युअल उद्योगातील सर्वाधिक मालमत्ता असलेला फंड ठरला. या यशाचे गमक काय?

– आम्हाला वाटते की निश्चित उत्पन्न निधीसाठी गाळणी लावण्याचे तीन स्थर आहेत. पहिला गुंतवणुकीचे तत्त्वज्ञान, जे फंड घराण्याचा सर्व फंडासाठी एकसारखे असते, दुसरे जोखमीचे मापदंड गुंतवणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात आणि तिसरी गोष्ट कठोर जोखीम व्यवस्थापन. बऱ्याच कमी मूल्यांकित मालमत्तांमध्ये पुरेशी रोकडसुलभता नसते आणि किमतींच्या आधारे, रोखे बाजारपेठा निश्चित काही संकेत देत असतात. आमच्या गुंतवणूक तत्त्वज्ञानाच्या पातळीवर, आम्ही जोखीम व्यवस्थापनाच्या बाबतीत पुराणमतवादी आहोत. कारण या निश्चित उत्पन्न व्यवस्थापनात एक चुकीची मोठी किंमत मोजावी लागते. दुसरी गाळणी स्थितीचे आकलन करून आमचा प्रत्येक फंड कुठे गुंतवणूक करू शकतो किंवा करू शकत नाही याची स्पष्ट सीमा आम्ही निश्चित केली आहे. तिसरी गाळणी आम्ही गुंतवणूक केलेल्या रोख्यांचा अधिक कठोर मागोवा. गुंतवणुकीतील या पुराणमतवादाचा कुठल्याही टप्प्यावर त्याग न करणे हे आमच्या निश्चित उत्पन्न गुंतवणुकीतील यशाचे गमक आहे.

shreeyachebaba@gmail.com