|| तृप्ती राणे

आई, आज बाल दिन आहे. तर मग मला काय गिफ्ट देणार? सकाळी उठल्याबरोबर स्वानंद म्हणाला. तसे त्याला गिफ्ट मिळवण्यासाठी काहीही कारण लागते हे सुजाताला माहीत होते. म्हणून ती प्रत्येक वेळी त्याला साजेसे उत्तर तयार ठेवायची. पण तो चाचा नेहरूंच्या वाढदिवसासाठीसुद्धा गिफ्ट मागेल असे तिच्या ध्यानीमनी कधी आले नाही. तिने काही उत्तर द्यायच्या आत त्याचे बाबा म्हणाले, अगं, त्याच्यासाठी एखादा म्युच्युअल फंडाचा चिल्ड्रेन प्लॅन का नाही बघत तू? त्याला योग्य गिफ्ट दिल्याचे समाधान आपल्याला मिळेल आणि त्याच्यासाठी बाल दिनसुद्धा साजरा केल्यासारखा होईल. ही कल्पना तिला खूप आवडली. तिने असा विचार केला की, दोघेही म्युच्युअल फंड आणि शेअरमध्ये गुंतवणूक करतात. पण मुलासाठी अशी वेगळी गुंतवणूक कधी केली नव्हती. तेव्हा जरा माहिती काढून लवकरच निर्णय घेऊ असे दोघांनी ठरवले आणि ते पोहोचले थेट त्यांच्या देसाई काकांकडे.

देसाई काका हे त्यांचे आर्थिक सल्लागार. सुनीलच्या लहानपणीपासून देसाई काका त्याला ओळखत होते. त्यामुळे सुनीलबरोबर सुजातासुद्धा त्यांच्या सल्ल्याशिवाय कुठेही गुंतवणूक करत नव्हती. आज चक्क का भेटायला येत आहेत हा विचार करून देसाई काकासुद्धा चक्रावले. काका ऑफिसमध्ये यायच्या आधीच सुनील-सुजाता त्यांना बाहेर उभे दिसले. सोबत स्वानंदसुद्धा दिसल्यावर काकांच्या लक्षात आले की दिवाळीची सुट्टी अजून सुरू आहे.

आजोबा, बिलेटेड शुभ दिवाळी! स्वानंदच्या अध्र्या इंग्लिश आणि अध्र्या मराठी शुभेच्छेने सगळ्यांना छान हसवले. त्या तिघांना ऑफिसमध्ये आत घेत काका म्हणाले, आज काही तरी खास दिसते. त्याशिवाय तुम्ही तिघे माझ्याकडे एकत्र नाही येणार. सांगा बरं, क्या माजरा है? त्यावर स्वानंद पटकन म्हणाला, आजोबा, आज बाल दिन आहे म्हणून मी आईकडे गिफ्ट मागितले तर हे दोघे मला तुमच्याकडे मिळेल असे सांगून इथे घेऊ न आले. आता द्या बरे मला माझे गिफ्ट.

त्याचे सांगणे संपल्यावर काकांनी सुनील-सुजाताकडे पाहिले. अजिबात वेळ न घालवता सुजाता म्हणाली, काका, आम्ही विचार करत होतो की स्वानंदच्या नावाने आज बाल दिन स्पेशल म्हणून एखादी गुंतवणूक सुरू करावी. तेव्हा सुनीलने मला म्युच्युअल फंडाच्या चिल्ड्रेन प्लॅनबद्दल विचार करायला सांगितला. म्हणून आज आम्ही सकाळीच तुमच्याकडे आलो.

काका खूश होत म्हणाले, अरे वा! पुढची पिढी आर्थिक साक्षर व्हायला सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. नक्की. आपण आज स्वानंदसाठी खास गुंतवणूक करू. पण त्याआधी मी जरा तुम्हाला त्यांची माहिती देतो. म्युच्युअल फंडांमध्ये खास मुलांसाठी तयार केलेले अनेक प्लॅन्स आहेत.