गुंतवणूक कट्टा..

तृप्ती राणे

याच सदरातील मागील लेखात (अर्थ वृत्तान्त, १९ नोव्हेंबर) देसाई काकांनी सुनील-सुजाताला म्युचुअल फंडांनी खास मुलांसाठी तयार केलेल्या खालील योजनांची माहिती दिली आहे. (सोबतचा तक्ता पाहावा)

हा तक्ता दाखवून देसाई काका म्हणाले – आता तुमच्या लक्षात आलेच असेल की यूटीआय चिल्ड्रेन्स करियर फंड – सेव्हिंग्स प्लान आणि एचडीएफसी चिल्ड्रेन्स गिफ्ट प्लान हे जास्त लोकप्रिय आहेत. गेल्या १० वर्षांतील ‘एसआयपी’चे परतावे पाहता, एचडीएफसी चिल्ड्रेन्स  गिफ्ट प्लान हा सर्वश्रेष्ठ ठरतो. एसबीआय मॅग्नम चिल्ड्रेन्स बेनिफिट प्लान हा डेट फंड असूनसुद्धा एसआयपीचे परतावे चांगले आहेत.

वरील सर्व प्रकार हे इक्विटी, संतुलित किंवा डेट म्युचुअल फंडामध्ये मोडतात. त्यामुळे तसा म्हणायला यांच्यात आणि इतर म्युचुअल फंडांत काही फरक नसतो. परंतु या चिल्ड्रेन फंडांची एक खासियत अशी असते की, यांना इतर फंडांपेक्षा जास्त लॉक-इन कालावधी असतो किंवा एग्झिट लोड जास्त असतो. त्या मागचा हेतू असा की, मुलांसाठी गुंतवणूक दीर्घकालीन असली तर जास्त फायद्याची होते. शिवाय मुलाच्या नावाने केलेल्या गुंतवणुकीमध्ये खूप भावना असतात. आणि याचाच फायदा अशा प्रकारच्या फंडांना होतो. परंतु देसाई काका म्हणाले, ‘माझे असे मत आहे की, जर तुम्हाला १० वर्षांपेक्षा अधिक काळ गुंतवणूक करायची असेल तर मग स्मॉल कॅप किंवा मिड कॅप इक्विटी फंड हा जास्त चांगला पर्याय आहे. तुमचा आर्थिक आराखडा व्यवस्थित आहे आणि तुम्हा दोघांची जोखीम क्षमतासुद्धा चांगली आहे. म्हणून तुम्ही या नावाच्या गोंधळात न अडकता नेमकी कोणती गुंतवणूक आहे हे समजून मग निर्णय घ्यावा.’

स्वानंदच्या आजोबांना जर त्याला बालदिनाचं गिफ्ट द्यायचं असेल तर ते अशा फंडांचा विचार नक्कीच करतील, कारण तुम्हाला त्यातून हवे तेव्हा पैसे नाही काढता येणार. गुंतवणुकीचे पैसे फक्त स्वानंदला मिळणार. परंतु वेळेला उपयोगी आली नाही तर त्या गुंतवणुकीचा फायदा काय?

लहान मुलांसाठी गुंतवणूक करताना हे प्रश्न नेहमीच स्वत:ला विचारा:

*  हे पैसे मुलासाठी कधी हवे आहेत? जर गुंतवणूक कालावधी मोठा असेल (तीन वर्षांपेक्षा अधिक) तर मग बँकेतील एफडी, आरडी अयोग्यच!

*  लहान मुलांचा जीवन विमा कशाला? जीवन विमा आपण आपल्या आर्थिक जबाबदाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी घेतो. लहान मुलांवर कोणती आर्थिक जबाबदारी असते की ज्याच्यासाठी आपण त्यांचा विमा काढावा?

*  मुलांसाठी खास गुंतवणूक पर्याय जेव्हा कुणी सुचवितो, तेव्हा इतर पर्यायांपेक्षा हा पर्याय कसा वेगळा आहे हा प्रश्न नक्की विचारावा. बालक आणि वरिष्ठ – हे दोन शब्द गुंतवणूक पर्यायाला चिकटवून गुंतवणूकदाराचे लक्ष वेधून घेण्याचे प्रकार आपल्याकडे प्रचंड प्रमाणात केले जातात. तेव्हा नाव बाजूला करून गुंतवणुकीचे खरे स्वरूप ओळखा.

*  आजी-आजोबांना जर नातवंडांसाठी गुंतवणूक करायची असेल, तर खरेच त्यांनी चांगल्या शेअर्स किंवा म्युचुअल फंडाचा विचार करावा. स्वत:च्या इच्छापत्रातूनसुद्धा ते नातवंडांच्या नावावर स्वत:ची गुंतवणूक ते हस्तांतरित करू शकतात.

एवढे ऐकल्यावर स्वानंद म्हणाला – आजोबा, मला ना तुम्ही एखादा स्मॉल कॅप फंड सांगा. मग त्यात जास्त पैसे जमले की मी अमेरिकेत जाऊन शिकेन. देसाई काका अगदी मनापासून हसले. स्वानंदच्या निरागस बोलण्याने भारावून जाता जाता सुनील-सुजाताला म्हणाले, बघा कसा गुणाचा नातू आहे आमचा. मग त्याला शोभेल अशी गुंतवणूक आजपासून झालीच पाहिजे. असं सांगून काकांनी गुंतवणुकीसाठी फॉर्म काढून दिला.

* जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्या किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.

* या सदरात गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युचुअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युचुअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे केली जात नाहीये.

* सर्व म्युचुअल फंड हे रेग्युलर ग्रोथ प्लान आहेत.

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

trupti_vrane@yahoo.com