25 April 2019

News Flash

‘एसआयपी’चा प्रवास खडतर की सुलभ?

या वर्षी दोन महत्त्वाच्या घटनांकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

|| तृप्ती राणे

या वर्षी दोन महत्त्वाच्या घटनांकडे सगळ्यांचे लक्ष आहे. एक जी काल घडली- आपला अर्थसंकल्प आणि दुसरी जी लवकरच घडणार आहे, ती म्हणजे लोकसभा निवडणूक. या दोन्ही घटनांकडून सगळ्यात जास्त अपेक्षा आहेत त्या सर्वसाधारण गुंतवणूकदारांच्या आणि त्यात खासकरून अशांच्या, ज्यांनी गेल्या ४-५ वर्षांमध्ये ‘म्युच्युअल फंड सही है’च्या भरवशावर आपल्या मेहनतीची कमाई म्युच्युअल फंडांकडे सोपवली आहे. शुक्रवारी टीव्हीच्या एका कोपऱ्यात अर्थमंत्री तर दुसऱ्या कोपऱ्यात सेन्सेक्सची हालचाल असे चित्र बघणारे, मागील अनेक वर्षांच्या तुलनेत जास्त असावेत असा माझा अंदाज आहे. अर्थमंत्री काही तरी जादू करतील आणि आपली गुंतवणूक लाल रंगाकडून हिरव्या रंगाकडे झेपावेल अशी अनेकांची अपेक्षा होती. कालच्या अर्थसंकल्पानंतर आता गुंतवणूकदार त्यांचं लक्ष लोकसभा निवडणुकीकडे केंद्रित करतील. पण मला हा प्रश्न नेहमीच पडतो की, या घटनांचा शेअर बाजारावर होणारा परिणाम हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कितपत महत्त्वाचा आहे? आपण जेव्हा ८-१० वर्षांचा गुंतवणूक काळ ठरवतो तेव्हा प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प मांडला जातो आणि किमान एक निवडणूक तरी त्यात होते. शिवाय जगभरात इतर अनेक गोष्टी घडत असतात ज्याचा काही ना काही परिणाम शेअर बाजाराच्या कामगिरीवर होतच असतो. तर मग अशा वेळी गुंतवणूक ध्येय आपण बाजूला सारून फक्त निर्देशांक वर आहे की खाली एवढेच का बघतो? गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये अनेक गुंतवणूकदारांचे फोन आले- ‘आता एसआयपी बंद करू या’ असे त्यांना वाटायला लागले आहे. कारण हेच की, २०१८ सालात परतावे मिळाले नाहीत. अशा साशंक गुंतवणूकदारांना आज मला एक विश्लेषण द्यायचे आहे.

आज शेअर बाजार पुढे पडणार या भीतीने बरेच ग्रासले आहेत. आपण असे समजू या की, २००८ साली जे झाले तसेच पुढे काही महिन्यांत घडेल. आणि या अनुषंगाने जो अनुभव २००५ साली १,००० रुपयांची मासिक एसआयपी सुरू करणाऱ्या गुंतवणूकदारांना पुढे तीन, पाच, १० आणि १४ वर्षे आला तो समजून घेऊ या. उदाहरण म्हणून आपण खालील फंड पाहू या. खालील तक्त्यात प्रत्येक काळातील परताव्याचा टक्का कंसात दिलेला आहे.

या काळामध्ये प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प मांडला गेला, दोन लोकसभा निवडणुका होऊन गेल्या, जागतिक आर्थिक मंदीचे संकट येऊन गेले, आणि बरेच काही होऊन गेले. मागील कामगिरी पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, ज्या फंडाची सुरुवात दमदार झाली होती त्यांची पुढील कामगिरी मंदावली, आणि त्याउलट जे फंड सुरुवातीला हळू चालले त्यांनी नंतर वेग पकडला. मागील कामगिरी तशीच पुढे राहत नसते. परंतु आपण पुढचे अंदाज बांधताना मागचा आढावा नेहमीच घेत असतो. त्यामुळे जर तुम्ही दीर्घकालीन ध्येयासाठी गुंतवणूक सुरू केली आहे तर तग धरून गुंतवणूक सुरू ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या नजीकच्या ध्येयांसाठी जो पैसा लागणार आहे तो नक्कीच सुरक्षित ठेवा. ध्येयाच्या कालावधीनुसार गुंतवणूक कालावधी आणि त्यानुसार गुंतवणूक पर्याय हे समीकरण नेहमीच ध्यानात ठेवा. आणि तरीही पुढची काळजी वाटत असेल तर कृपया शेअर बाजारातील गुंतवणुकीतून बाहेर पडा आणि मुदत ठेवींकडे वळा. शेवटी रात्री शांत झोप लागली पाहिजे!

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

सूचना :

  • जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्याची किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.
  • या सदरामध्ये गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे केली जात नाहीये.
  • सर्व रेग्युलर ग्रोथ प्लानचे म्युच्युअल फंड
  • यातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील; परंतु माझ्या पोर्टफोलिओचा या सदरांमधील पोर्टफोलिओंच्या कामगिरीबरोबर काहीही संबंध नाही.
  • म्युच्युअल फंडांचे एक्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर – यांचा विचार या सदरामध्ये केलेला नाही. कोणतीही गुंतवणूक करताना या खर्चाचा आणि कर नियमांचा आढावा घ्या.

First Published on February 4, 2019 12:04 am

Web Title: systematic investment plan 5