|| भालचंद्र जोशी

आपण ‘एसडब्ल्यूपी’ आणि आर्थिक नियोजन याची सांगड कशी घालता येईल याबद्दल जाणून घेऊयात. सिस्टिमॅटिक व्रिडॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी) ही साधी आणि सोपी सुविधा आहे ज्यामध्ये म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला पूर्वनियोजित कालावधीने विद्यमान गुंतवणुकीतून (म्युच्युअल फंडातून) ठरावीक किंवा बदलत्या स्वरूपातील रक्कम काढून पूर्वनियोजित खर्चासाठी उपलब्ध होऊ शकते. अशा प्रकारे पैसे काढणे (व्रिडॉवल) हे निश्चित रकमेचे किंवा बदलत्या रकमेचे असू शकते आणि ते दर वर्षांला, दर सहा महिन्यांनी, तीन महिन्यांनी किंवा प्रत्येक महिन्याला काढता येतात.

या योजनेच्या साहाय्याने एक गुंतवणूकदार म्हणून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीद्वारे नियमित कालांतराने मिळकतीचा प्रवाह सुरू ठेवू शकता. या सुविधेमुळे नेहमीचे घरातील खर्च, मुलांच्या शिक्षणासाठी भरण्याची फी किंवा अगदी सुट्टीत सहलीला जाणे यासारख्या गरजा पूर्ण करण्यासाठी ठरावीक कालांतराने पैशाचा प्रवाह उपलब्ध असेल अशा प्रकारे नियोजन करण्यास मदत होते.

  • सिस्टिमॅटिक व्रिडॉवल प्लॅन हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय का आहे?

याची दोन कारणे आहेत. अशा प्रकारे केलेल्या व्रिडॉवल्स (पैसे काढल्यास) त्याला रिडम्प्शन म्हणतात. सिस्टिमॅटिक व्रिडॉवल प्लॅन्समधून पैसे काढल्यास त्यावर कर लागू शकतो. परंतु काढलेल्या पैशापैकी भांडवली लाभ हा करपात्र असतो. तुम्ही तुमचे पैसे काढण्याचे अशा प्रकारे नियोजन करू शकता की तुम्ही फक्त गुंतविलेल्या रकमेवर मिळालेल्या लाभाची रक्कम काढाल. यामुळे तुमचे भांडवल गुंतविलेले राहते आणि त्याच वेळी तुम्हाला नियमित कालांतराने त्यावरील लाभ घेता येतो.

  • सिस्टिमॅटिक व्रिडॉवल प्लॅन कसे काम करते?

गुंतवणूकदारांनी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की म्युच्युअल फंड योजनेतील सिस्टिमॅटिक व्रिडॉवल प्लॅनमध्ये तुम्ही जितके युनिट्स काढून घेता तितके तुमच्या फंडाचे मूल्य कमी होते.

अशा प्रकारे तुम्ही जेव्हा प्रत्येक वेळी पैसे काढता तेव्हा तुमच्या गुंतवणुकीतील युनिट्सची संख्या कमी झालेली दिसते. एनएव्हीत वाढ झाल्यास, युनिट्सचे रिडम्प्शन कमी प्रमाणात होत जाते आणि जेव्हा एनएव्ही खाली जातो तेव्हा त्याचा उलट परिणाम होतो, व अधिक युनिट्स रिडिम करावे लागतात. या सुविधेचा जास्तीतजास्त फायदा करून घेण्यासाठी, तुमच्या गरजा आणि तुमचे आर्थिक उद्दिष्ट यांचा विचार करून एसडब्ल्यूपीचे नियोजन करावे.  एसडब्ल्यूपीचा वापर केल्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन अधिक प्रभावी होईल.

  • ‘एसडब्ल्यूपी’चे उदाहरण : समजा, तुमच्या म्युच्युअल फंड योजनेमध्ये १०,००० युनिट्स आहेत ज्याचा एनएव्ही १० रुपये आहे आणि आपण आपल्या सिस्टिमॅटिक व्रिडॉवल प्लॅनच्या योजनेद्वारे दरमहा ५,००० रुपये काढू इच्छित आहात.

या योजनेतून ५,००० रुपये काढण्याचा अर्थ असा होतो की ५०० युनिट्स (५०००/१०) रिडिम केल्या जात आहेत. आपल्या म्युच्युअल फंडातील उर्वरित युनिट्स ९,५०० (१०,०००-५००) असतील म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीची किंमत ९५,०००(९५०० ७ १०) रुपये असेल.

पुढच्या महिन्यात आपल्या योजनेचा एनएव्ही २० रुपये झाला तर ५,००० रुपयांची रक्कम काढणे म्हणजे २५० युनिट्स (५०००/२०) विकणे आहे. हा विथड्रॉवलनंतर (९५००-२५०) म्युच्युअल फंडाचे ९२५० युनिट्स उर्वरित राहतील.

या सुविधेचे फायदे काय?

  • शिस्तबद्ध गुंतवणूक करण्यासाठी एसडब्ल्यूपी एक प्रभावी मार्ग आहे आणि आपल्याला नियमित कालावधीमध्ये निश्चित उत्पन्न प्रदान करते.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि सेवानिवृत्त व्यक्तींसाठी नियमित कालावधीच्या अंतराने मासिक खर्चासाठी किंवा इतर खर्चासाठी पैसे काढून घेण्यासाठी एसडब्ल्यूपी हा अतिशय प्रभावी पर्याय आहे.
  • एसडब्ल्यूपी पर्यायाचा वापर करत असताना बाजारपेठेतील जोखीम लक्षात घेऊन भांडवल कमी-जास्त होऊ शकते. परंतु, वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये तुम्ही योग्य पद्धतीने संमिश्र गुंतवणूक केल्यास त्यामुळे जोखीम विभागली जाऊ न तुम्हाला जेव्हा पैशाची गरज असेल तेव्हा त्यासाठी धावपळ करावी लागणार नाही. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यास तुम्हाला एसडब्ल्यूपीमुळे मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे,एसडब्ल्यूपी ही निवृत्तीनंतरच्या कालावधीत नियमित मिळकत मिळविण्यासाठी गुंतवणुकीच्या नियोजनाची उत्तम पद्धती असू शकते.

(लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत असून, सध्या रिलायन्स म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार सेवा आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आहेत.)

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.