फंडाविषयक विवरण
फंड प्रकार    :    समभाग व रोखे गुंतवणूक  – तीन पर्याय. अल्प ते सर्वाधिक जोखीम असलेले. परंतु निवडलेल्या पर्यायानुसार कमी-अधिक
निधी व्यवस्थापक     :    रुपेश पटेल हे या फंडाचे एप्रिल २०१५ पासून निधी व्यवस्थापक आहेत. ते सरदार पटेल विद्यापीठ, गांधीनगरचे स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील पदवीधर असून याच विद्यापीठातून त्यांनी व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांना १५ वर्षांचा गुंतवणूकविषयक अनुभव असून प्रामुख्याने प्रकल्प व्यवस्थापन, रोखे पत निर्धारण, समभाग व रोखे गुंतवणूक या क्षेत्रातील ते तज्ज्ञ आहेत. टाटा म्युच्युअल फंडात दाखल होण्यापूर्वी, गुजरात राज्य रस्ते विकास महामंडळ व ‘केअर’ या पतनिर्धारण कंपनीत त्यांनी जबाबदारीची पदे भूषविली आहेत.
गुंतवणूक पर्याय    :    वृद्धी (ग्रोथ)
फंड खरेदी पद्धत    :    फंड घराण्याच्या http://www..tatamutualfund.com या संकेतस्थळावरून थेट खरेदी वा फंड विक्रेत्यामार्फत अथवा TMF असा एसएमएस ५७५७५ या क्रमांकावर पाठविल्यास कंपनीचा गुंतवणूकदार सेवा प्रतिनिधी संपर्क करेल.
व्यक्तीच्या जीवनांत पहिली २०-२५ वष्रे विद्यार्जनांत व पुढील ३०-३५ वष्रे अर्थार्जन करण्यात जातात. त्या पुढील २५ ते ३० वष्रे सेवानिवृत्तीत जातात. आíथक उदारीकरणानंतर सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी होऊन खाजगी नोकऱ्यांचे प्रमाण वाढल्याने निवृत्तीवेतन (पेन्शन) मिळणाऱ्यांची संख्या कमी होत आली आहे. म्हणूनच निवृतीवेतन न मिळणाऱ्या बहुसंख्यांना आपला अर्थार्जन कालावधी संपल्यानंतरच्या जीवनातील खर्चाची तजवीज कमावत्या वयात करणे जरुरीचे बनले आहे. परंतु प्रत्यक्षात तसे होत नाही. पहिले घर, आणखी मोठे घर, मुलांची शिक्षणे यानंतरच मग कोणी स्वत:च्या निवृत्तीपश्चातचा विचार करताना दिसतात. परंतु नोकरी लागल्यापासून थोडी शिल्लक आपल्या निवृत्तीपश्चात उदरनिर्वाहासाठी राखणे गरजेचे आहे. अशी ‘एसआयपी’ सुरू करून निवृत्तीपश्चात वर्षांसन मिळविण्यासाठी ‘टाटा रिटायरमेंट सेिव्हग्ज फंड’ उपयुक्त आहे. निवृत्तीनंतरच्या उदरनिर्वाहाची सोय म्हणून मोठा निधी तयार होण्यासाठी बचतीचे साधन म्हणून या फंडाची निवड करावयास हरकत नाही.
कोणी गुंतवणूकदार आपल्या भविष्याच्या तरतुदींची सुरुवात वयाच्या कुठल्याही टप्प्यापासून करण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन टाटा अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने या फंडाअंतर्गत उपलब्ध केलेले गुंतवणुकीचे तीन पर्याय असे –
* प्रोग्रेसिव्ह प्लान: हा पर्याय स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदारांचा निधी ८५ ते १०० टक्के समभाग गुंतवणूक व शून्य ते १५ टक्के रोख्यांमध्ये गुंतविला जातो.
* मॉडरेट प्लान: हा पर्याय स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदारांचा निधी ६५ ते ८५ टक्के समभागांत व ३५ ते १५ टक्के रोखे गुंतवणूक प्रकारात जातो.
* कन्झव्‍‌र्हेटिव्ह प्लान: हा पर्याय स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदारांचा निधी शून्य ते ३० टक्के समभागांत व ७० ते १०० टक्के रोखे गुंतवणुकीत जातो.
या व्यतिरिक्त ‘ऑटो स्वीच’ व ‘लाइफ सायकल प्लान’ हे पर्याय उपलब्ध आहेत. ऑटो स्वीच या पर्यायात वयाच्या अमूक एका टप्प्यावर फंडातील जमा रक्कम दुसऱ्या पर्यायात परिवर्तीत करण्याचा मार्ग उपलब्ध आहे. म्हणजे एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या २५ व्या वर्षी गुंतवणुकीला प्रोग्रेसिव्ह प्लानमधून सुरुवात केली व वयाच्या ४०व्या वर्षी सर्व रक्कम मॉडरेट प्लानमध्ये व वयाच्या ५० व्या वर्षी कन्झव्‍‌र्हेटिव्ह प्लानमध्ये परिवर्तीत करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. लाइफ सायकल प्लान या पर्यायात वाढत्या वयानुसार टप्प्याटप्प्याने एकूण गुंतवणुकीतील समभाग गुंतवणुकीचा हिस्सा कमी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु एकरकमी रक्कम गुंतविल्यापासून किंवा एसआयपी सुरू केल्यापासून पहिली पाच वष्रे कुठलेही परिवर्तन शक्य नाही. या फंडात एसआयपी करण्यापूर्वी गुंतवणूक सल्ल्लागाराशी आपल्या गरजांविषयी चर्चा करणे आवश्यक आहे.
हा फंड तीन पर्याय उपलब्ध करून देत असल्याने वाढत्या वयानुसार मालमत्तेचे समभाग व रोखे यांत विकेंद्रीकरण सहज शक्य आहे. आज फ्रॅकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंड, यूटीआय म्युच्युअल फंड, टाटा म्युच्युअल फंड व रिलायन्स म्युच्युअल फंड ही चार फंड घराणी वर्षांसन देणाऱ्या योजना विकत आहेत. आणखी दोन फंड घराण्यांनी वर्षांसन देणाऱ्या योजना सुरू करण्यासाठी सेबीकडे प्राथमिक माहिती दस्तऐवज दाखल केला आहे. लवकरच त्यांच्या योजना गुंतवणूकदारांना उपलब्ध होतील. प्राप्तिकराच्या कलम ८० सी खाली मिळणाऱ्या वजावटीचा फायदा या फंडाला लागू नाही. या फंड घराण्याने हा फायदा देण्याचे अधिकार असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे अर्ज केला असून लवकरच सकारात्मक उत्तराची अपेक्षा आहे. हा फायदा मिळो वा न मिळो निवृत्तीपश्चात वर्षांसन देणारा व विमा कंपन्यांच्या युलिपपेक्षा सर्वार्थाने उजव्या अशा या पर्यायाचा तरुण गुंतवणूकदारांनी नक्कीच विचार करावा.
mutualfund.arthvruttant@gmail.com