28 February 2021

News Flash

करावे कर-समाधान : घराचा ताबा मिळाल्यावरच, गृह कर्ज व्याजाची कर वजावट!

मी पुण्यामध्ये एक सदनिका डिसेंबर २०२० मध्ये अग्रिम रक्कम भरून आरक्षित केली आहे.

|| प्रवीण देशपांडे

सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या घराच्या संदर्भात प्राप्तिकर कायद्यात काही विशेष तरतुदी आहेत. घर राहते असल्यास, भाडय़ाने दिलेले असल्यास, भाडय़ाने घेतलेले असल्यास, घराची खरेदी किंवा विक्री केल्यास प्राप्तिकर कायद्यात वेगवेगळ्या तरतुदी आहेत आणि त्याचे पालन करदात्याला करावे लागते. याची माहिती करदात्याने वेळोवेळी करून घेतली पाहिजे. घराच्या खरेदीवर उद्गम कर (टीडीएस) कोणी आणि कधी कापावा, गृहकर्ज घेतले असल्यास त्याच्या सवलती कधी घ्याव्या, या सवलती कधी रद्द होतात, घराच्या विक्रीवर भांडवली नफा झाल्यास त्यावर अग्रिम कर कधी भरावा किंवा कर वाचवायचा झाल्यास नवीन घरात किंवा रोख्यांमध्ये गुंतवणूक कधी करावी अशा अनेक तरतुदी करदात्याने माहीत करून घेतल्या पाहिजेत.

प्रश्न : मी पुण्यामध्ये एक सदनिका डिसेंबर २०२० मध्ये अग्रिम रक्कम भरून आरक्षित केली आहे. या घराचा ताबा मला ऑगस्ट २०२१ मध्ये मिळणार आहे. यासाठी मी गृह कर्ज घेतले आहे. या कर्जाचा हप्ता या महिन्यापासून (म्हणजे फेब्रुवारी २०२०) सुरू झाला. या गृह कर्जाच्या व्याज आणि मुद्दल परतफेडीची वजावट मला या वर्षी घेता येईल का?

* प्रथमेश सावरटकर

उत्तर : या वर्षी म्हणजे मार्च २०२१ पूर्वी आपल्याला घराचा ताबा मिळणार नाही. घराचा ताबा मिळाल्याशिवाय गृह कर्जाची वजावट घेता येत नाही. आपल्याला घराचा ताबा ऑगस्ट २०२१ मध्ये, म्हणजे आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये मिळणार असल्यामुळे गृह कर्जाची वजावट, आर्थिक वर्ष २०२१-२२ पासून घेता येईल. घराचा ताबा घेण्यापूर्वी भरलेल्या व्याजाची वजावट, घराचा ताबा घेतल्यानंतर (म्हणजे आर्थिक वर्ष २०२१-२२ पासून) पूर्वी भरलेल्या व्याजाच्या एक-पंचमांश एवढी रक्कम या वर्षी आणि पुढील चार वर्षांत घेता येते. परंतु एकूण व्याजाच्या वजावटीची मर्यादा दोन लाख रुपये इतकी आहे.

प्रश्न : मी जानेवारी २०२१ मध्ये माझे घर ६० लाख रुपयांना विकले. हे घर मी जून २०१७ मध्ये ५५ लाख रुपयांना खरेदी केले होते. या घरासाठी मी ३० लाख रुपयांचे गृह कर्जदेखील घेतले होते. मी गृह कर्जाच्या व्याज आणि मुद्दल परतफेडीच्या वजावटी वेळोवेळी घेतल्या होत्या. या घराच्या विक्रीवर मला कर भरावा लागेल का?

* वैभव सावंत

उत्तर : आपण घर खरेदी केल्याच्या तारखेपासून दोन वर्षांनंतर ते विकल्यामुळे होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असेल आणि आपल्याला महागाई निर्देशाकाचा (इंडेक्सेशन) फायदा देखील घेता येईल. आपण दिलेल्या माहितीनुसार, घराची खरेदी ५५ लाख रुपयांना झाली असली तरी महागाई निर्देशाकानुसार आपल्या घराचे मूल्य ६०,८६,३९७ रुपये (खरेदी मूल्य ५५ लाख गुणिले ३०१ (२०२०-२१ वर्षांचा निर्देशांक) भागिले २७२, २०१७-१८ वर्षांचा निर्देशांक) होईल. आपण या घराची विक्री ६० लाख रुपयांना केली असल्यामुळे आपल्याला ८६,३९७ रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा झाला आहे. त्यामुळे त्यावर कर भरावा लागणार नाही. परंतु आपण ‘कलम ८० सी’ नुसार गृह कर्जाच्या मुद्दल परतफेडीची वजावट पूर्वीच्या वर्षांत घेतली असल्यास, ती वजावट आपल्याला ‘इतर उत्पन्न’ या सदरात दाखवून त्यावर कर भरावा लागेल. ‘८० सी’ या कलमानुसार, ज्या घरावर या कलमानुसार वजावटी घेतल्या आहेत आणि ते घर पाच वर्षांत विकले तर या वजावटी रद्द होऊन ज्या वर्षी घराची विक्री केली त्या वर्षी या वजावटीची रक्कम इतर उत्पन्न म्हणून गणून त्यावर कर भरावा लागतो.

प्रश्न : मी एका खासगी कंपनीत नोकरी करते. मला घर-भाडे भत्ता (एचआरए) मिळतो. आमचे राहते घर माझ्या पतीच्या नावावर आहे. मी माझ्या पतीला घरभाडे दिले तर मला घर-भाडे भत्त्याची वजावट मिळेल का?

* शिल्पा कुलकर्णी

उत्तर : पतीला दिलेल्या घरभाडय़ावर पत्नीला घर-भाडे भत्त्याची वजावट मिळू शकते. यासाठी प्राप्तिकर कायद्यातील अटींची पूर्तता केली असली पाहिजे. प्राप्तिकर कायद्यात पती किंवा पत्नीला घरभाडे दिले असेल तर घर-भाडे भत्त्याची वजावट मिळत नाही अशी तरतूद नाही. करदात्याच्या नावावर घर नसेल (घरात सह-मालकसुद्धा नसेल) आणि त्याने घरभाडे दिलेले असेल तर त्याला घर-भाडे भत्त्याची वजावट मिळू शकते. प्राप्तिकर खाते मात्र या व्यवहाराकडे कर चुकविण्याच्या नजरेने बघू शकते. करदात्याने हा व्यवहार व्यावसायिक तत्त्वावर केला असेल आणि आवश्यक ती कागदपत्रे तयार केलेली असतील तर घर-भाडे भत्त्याची वजावट नाकारण्याची शक्यता नसते.

प्रश्न : भांडवली बाजारात सूचिबद्ध एका कंपनीने माझ्याकडे असलेले समभाग नुकतेच ‘बाय-बॅक’ तत्त्वावर प्रत्येकी ४०० रुपयांना माझ्याकडून खरेदी केले. हे १,००० समभाग मी मार्च २०१८ मध्ये प्रत्येकी २०० रुपयांना खरेदी केले होते. यामध्ये मला दोन लाख रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला. मला या रकमेवर किती कर भरावा लागेल?

* विवेक जोशी

उत्तर : वर्ष २०१९ च्या अंदाजपत्रकातील सुधारणेनुसार, ५ जुलै २०१९नंतर सूचिबद्ध कंपनीने ‘बाय-बॅक’ केलेल्या समभागावरील करदायीत्व गुंतवणूकदारांकडून कंपनीकडे स्थलांतरित केले आहे. ५ जुलै २०१९ पूर्वी गुंतवणूकदारांना अशा ‘बाय-बॅक’ वर झालेल्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागत होता. या तारखेपासून ‘बाय-बॅक’ केलेल्या समभागावर कंपनीला कर भरावा लागतो, गुंतवणूकदारांना मिळालेली रक्कम ही करपात्र असणार नाही. त्यामुळे आपल्याला झालेल्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागणार नाही.

 

वाचकांनी आपले प्रश्न खाली दिलेल्या ई- मेलवर किंवा ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’च्या arthmanas@expressindia.com ई-मेलवर शक्यतो मराठीत युनिकोडमध्ये टाइप करून पाठवावेत.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.
arthmanas@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 12:07 am

Web Title: tax deduction on home loan interest only after possession of the house akp 94
Next Stories
1 गोष्ट रिझव्‍‌र्ह बँकेची : ब्रिटिश सरकार विरूद्ध भारतीय ठिणगी
2 माझा पोर्टफोलियो : गुंतवणुकीतील आवश्यक ‘बेअरिंग प्रतिबल’
3 विमा.. सहज, सुलभ : विमा क्षेत्राला गतीचे इंधन
Just Now!
X