19 October 2019

News Flash

गुंतवणूक कर-बचतीसाठी करताना..

डिसेंबर उजाडला की एक फोन खात्रीशीर येतोच!

(संग्रहित छायाचित्र)

|| तृप्ती राणे

डिसेंबर उजाडला की एक फोन खात्रीशीर येतोच! तो म्हणजे, माझ्या लहान बहिणीचा – ‘‘ए दीदी! जरा मला कर वाचवायला मदत कर ना! प्लीज प्लीज.. पुढच्या वर्षी मी नक्की हा प्रश्न मे महिन्यात विचारेन आणि नियमित गुंतवणूक करेन. पण आता काही तरी कर गं. नाही तर पुढे तीन महिने मला निम्म्या पगारावर जगावं लागेल.’’ आणि दर वर्षी मी तिला कुरकुरत का होईना मदत करते.

पण या वर्षी म्हटलं बस झालं आता. मुद्दामच जरा दमटावलं तिला – ‘‘या वर्षी तुझं तू बघ. खूप झालं हे शेवटच्या क्षणापर्यंत झोपणं. मी नाही तुला मदत करणार.’’

त्या बरोबर मस्का लावत म्हणाली – ‘‘दीदी! तू आहेस म्हणून माझा चाललय ना. मला माझ्या कामापुढे हे सगळं बघायला वेळ नाहीये. आणि मुळात लक्ष मिळकतवाढीकडे असावे असे तूच तर सगळीकडे सांगत फिरतेस. तर मग माझ्यामागे का पिरपिरत राहतेस की कर नियोजन मे महिन्यात कर? काय फरक पडतो त्याने?’’

तर आजचा लेख अशा प्रकारे कर वाचवणाऱ्यांसाठी.

संपूर्ण आर्थिक नियोजनामध्ये कर नियोजन हा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु बऱ्याचदा असे लक्षात येते की आपण कर वाचतो म्हणून एखादी गुंतवणूक करतो. मला अनेक कुटुंबे अशी भेटली आहेत ज्यांनी कर वाचवण्यासाठी आपल्या आर्थिक गरजा न समजून घेता किंवा घाईघाईमधे चुकीच्या गुंतवणूक पर्यायांमधे गुंतवणूक केली आणि मग पस्तावले. प्रत्येक गुंतवणूक पर्यायाचा सर्वांगीण विचार न करता फक्त कर कुशलता पाहून त्यात गुंतवणूक करणे म्हणजे आपल्या मुलाला चुकीच्या इयत्तेत बसवण्यासारखं आहे. कधी तरी पास होईल या अपेक्षेने आपण मुलाला पुढच्या इयत्तेत घालतो का? तिथे आपण त्याच्या क्षमतेचा, त्या बोर्डाच्या अभ्यासामुळे भविष्यात होणाऱ्या फायद्याचा आणि आपल्याला झेपणाऱ्या खर्चाचा विचार करतोच. तर मग कर वाचवतानासुद्धा आपल्याला नक्की काय हवंय हे तपासल्याशिवाय गुंतवणूक का करायची? म्हणून या काही टिप्स :

खर्च : आपले काही खर्च कर वाचवायला मदत करतात, त्यांची नोंद सर्वप्रथम घ्या. उदा. मुलांची शाळा-कॉलेजची फी, गृहकर्जाची मुद्दल, विम्याचे हप्ते, नवीन घराची स्टॅम्प डय़ुटी व रजिस्ट्रेशन फी, आरोग्य विमा हप्ते, हेल्थ चेक-अप खर्च, आर्थिकरीत्या निर्भर असणारे दिव्यांग कुटुंबीयांचा आरोग्य खर्च किंवा विशिष्ट विमा योजनेत केलेलं योगदान, घर भाडे, काही ठराविक आजारांवर होणारा आरोग्य खर्च (कॅन्सर, एड्स, डिमेन्शिया इ.), शैक्षणिक कर्जाचे व्याज, आर्थिक मदत.

गुंतवणूक : कर्ज वाचवणारे गुंतवणूक पर्याय निवडताना त्यांची रोकड सुलभता, जोखीम, परतावे आणि कर कार्यक्षमता समजून घ्या. उदाहरण म्हणून वरील तक्ता पाहा.

वरील तक्त्यात नमूद पर्यायांबद्दल सगळ्या बाबी जागेच्या मर्यादेमुळे सांगितल्या गेलेल्या नाहीत. वाचकांनी सगळी माहिती मिळवून मग निर्णय घ्यावा.

गुंतवणूक करायच्या आधी तुमच्या नजीकच्या काळातील आर्थिक ध्येयांचा आढावा घ्या. कदाचित गुंतवणूक केल्यास तुम्हाला पैसे कमी पडायची शक्यता असेल. उदा. – शिक्षणाचा मोठा खर्च, कुटुंबात एखादा मोठा आरोग्य खर्च, घर घेण्यासाठी स्वत:चं योगदान वगैरे.

गुंतवणूक करताना तुमचं आर्थिक ध्येय काय हे लक्षात ठेवा. कर बचत हे गुंतवणुकीचं ध्येय नसून एक महत्वाचा भाग आहे.

गुंतवणूक पोर्टफोलिओ बनवताना कर कार्यक्षमतेचा आढावा नक्की घ्या. वेगवेगळे कॉम्बिनेशन करून बघा आणि मग तुमच्या जोखीम क्षमतेनुसार गुंतवणूक पर्याय आणि त्याचे तुमच्या पोर्टफोलिओमधे स्थान व महत्त्व निश्चित करा.

तरुण करदात्यांसाठी ज्यांची जोखीम घ्यायची क्षमता जास्त आहे त्यांनी ईएलएसएस पर्याय निवडून एसआयपीच्या आधाराने दीर्घकालीन संपत्ती तयार करावी.

प्राप्तीकर कायद्याच्या तरतुदी दर वर्षी बदलतात. त्यांची वेळोवेळी नोंद घ्यावी.

trupti_vrane@yahoo.com

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

First Published on December 17, 2018 12:57 am

Web Title: tax saving investments