News Flash

विवरण पत्र मुदतीत दाखल केले तरच ‘तोटा पूर्ती’ आणि सुधारणा शक्य!

आपलेही करविषयक प्रश्न असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर

| October 20, 2014 01:01 am

tax121आपलेही करविषयक प्रश्न असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर पाठवू शकता. अथवा ई-मेल: arthmanas@expressindia.com

प्रश्न: मी २००१ मध्ये एक घर विकत घेतले होते आणि २०१२ मध्ये दुसरे घर विकत घेतले. मी पहिले घर विकून दुसऱ्या घरावर घेतलेले गृहकर्ज फेडले तर मला भांडवली नफ्यावर कर भरावा लागेल का?
–  सदानंद कुलकर्णी
उत्तर: प्राप्तिकर कलम ५४ नुसार जर घर विक्रीवर झालेला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा दुसऱ्या घरामध्ये गुंतविला तर कर भरावा लागत नाही. यासाठी नवीन घर हे जुने घर विकण्यापूर्वी एक वर्ष आधी अथवा विकल्यानंतर दोन वर्षांआधी (जर विकत घेतले तर) किंवा तीन वर्षांआधी (जर बांधले तर) घेतले तर ही सवलत घेता येते. या कालावधीत आपण दुसरे घर विकत घेतले नसल्यामुळे कलम ५४ ची कर सवलत आपल्याला घेता येणार नाही.

प्रश्न: मी १३ जुल २०१४ रोजी संगणकाद्वारे प्राप्तीकर विवरण पत्र भरले होते. परंतु मला ITR V (पावती) मिळाली नाही. मला सुधारित विवरण पत्र भरण्यास सांगण्यात आले. परंतु सुधारित विवरण पत्र भरण्यासाठी मूळ विवरण पत्र भरल्याचा पावती क्रमांक भरावा लागतो. तो माझ्याकडे नाही. मी काय करू शकतो?
– विजय तगवले
उत्तर: जर आपण संगणकाद्वारे प्राप्तीकर विवरण पत्र भरले असेल आणि ते स्वीकृत झाले असेल तर ITR V (पावती) ही आपल्या खात्यावर लॉग इन करून मिळवू शकता. जर विवरण पत्र स्वीकृत झाले नसेल तर परत विवरण पत्र भरू शकता.

प्रश्न: मी एका खाजगी कंपनीत नोकरी करत आहे. मला कंपनीकडून मिळालेल्या फॉर्म १६ प्रमाणे मी माझे विवरण पत्र कर निर्धारण वर्ष २०१४-१५ साठीचे भरले. परंतु विवरण पत्र भरताना मी नवीन घर विकत घेताना भरलेले नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क आणि गृह कर्जावर भरलेले व्याज विचारात घेतले नव्हते. घराचा ताबा मी फेब्रुवारी २०१४ मध्ये घेतला होता. हे विचारात घेतले तर मला कर परतावा (REFUND) मिळू शकतो काय? तो कसा मिळवू?
– संदीप पाटील
उत्तर: आपण जर विवरण पत्र मुदतीपूर्वी (३१ जुल २०१४ आधी) भरले असेल तर आपण सुधारित विवरण पत्र भरू शकता. या सुधारित विवरण पत्रात आपण कलम २४ आणि कलम ८० क प्रमाणे वजावट दाखवून कर परतावा मिळवू शकता.

प्रश्न: मी एक निवृत्त ज्येष्ठ नागरिक आहे. माझी एक जागा मी एका कंपनीला २०,००० रुपये मासिक भाडय़ाने दिली आहे. कंपनी मला ही रक्कम देतांना १०% टीडीएस कपात करते. माझे इतर करपात्र उत्पन्न हे ४,७५,००० रुपये आणि मी ५०,००० रुपये कलम ८० क अन्वये गुंतवणूक केलेली आहे. मला आíथक वर्ष २०१४-१५ मध्ये किती कर भरावा लागेल?
– एक वाचक
उत्तर: आपले करपात्र उत्पन्न खालील प्रमाणे :
भाड्यापासून उत्पन्न     रु. २,४०,०००
वजा: मालमत्ता कर     रु. १०,०००
३०% प्रमाणित वजावट         रु. ६९,०००
भाड्याचे उत्पन्न           रु.१,६१,०००
इतर उत्पन्न             रु. ४,७५,०००
—————————————————-
एकूण उत्पन्न     रु. ६,३६,०००
वजा: कलम ‘८० क’ वजावट     रु. ५०,०००
—————————————————-
एकूण करपात्र उत्पन्न      रु. ५,८६,०००

या रकमे वर भरावा लागणारा कर
प्रथम ३,००,०००                 शून्य
३ ते ५ लाख रु. (१०%)         रु. २०,०००
बाकी ८६,००० (२०%)    रु. १७,२००
—————————————————-
एकूण कर              रु. ३७,२००
शैक्षणिक कर     रु. १,११६
एकूण कर                   रु. ३८,३१६ वजा टीडीएस     रु. २४,०००
 बाकी देय कर     रु. १४,३१६
मालमत्ता कर हा १०,००० रुपये भरला असल्याचे गृहीत धरले आहे. इतर वजावटी माहिती अभावी विचारात घेतलेल्या नाहीत.
                         
प्रश्न: मी दहा वर्षांपूर्वी ऑगस्ट २००४ मध्ये एक निवासी प्लॉट १.२५ लाख रुपयांना विकत घेतला होता. काही कारणाने मी त्यावर घर बांधू शकलो नाही. आता हा प्लॉट मी १५ लाख रुपयांना विकू इच्छितो. त्यावर मला कर भरावा लागेल का?  हा कर वाचविण्यासाठी मला काय करावे लागेल?
–  प्रकाश काळे
उत्तर : हा प्लॉट आपण ३६ महिन्यांपेक्षा जास्त काळापूर्वी घेतला असल्यामुळे त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा आहे. हा भांडवली नफा महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य विचारात घेऊन काढावा लागेल. या भांडवली नफ्यावर २०% दराने कर (त्यावर अधिक ३% शैक्षणिक कर) भरावा लागेल. या भांडवली नफ्यावरचा कर वाचविण्यासाठी कलम ‘५४ एफ’ नुसार मिळालेली विक्री रक्कम (विक्रीचा खर्च वजा जाता) इतक्या किमतीची नवीन घरामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आपण प्लॉट जर १५ लाख रुपयांना विकला असेल आणि त्यासाठी ५० हजार रुपयांचा खर्च झाला असेल तर आपल्याला १४.५० लाख रुपये नवीन घरामध्ये गुंतवावे लागतील. या शिवाय या कलमाप्रमाणे इतर अटींची पूर्तता करावी लागेल. या अटी म्हणजे, नवीन घर हे जुने घर विकण्यापूर्वी एक वर्ष आधी अथवा विकल्यानंतर दोन वर्षांआधी (जर विकत घेतले तर) किंवा तीन वर्षांआधी (जर बांधले तर) घेतले पाहिजे; हे नवीन घर तीन वर्षांपर्यंत विकले नाही पाहिजे; आपल्याकडे या नवीन घराव्यतिरिक्त एकापेक्षा जास्त घर नसावे किंवा नवीन घराव्यतिरिक्त दोन वर्ष (जर विकत घेतले तर) किंवा तीन वर्ष (जर बांधले तर) या कालावधी मध्ये अजून घर विकत घेता किंवा बांधता येत नाही. या शिवाय कलम ‘५४ ईसी’नुसार भांडवली नफा हा तीन वर्षांसाठी बाँड्स अर्थात सरकारी रोख्यांमध्ये गुंतविला तर त्यावर कर भरावा लागणार नाही.

प्रश्न: मी कर निर्धारण वर्ष २०१४-१५ चे विवरण पत्र ५ ऑक्टोबर २०१४ ला संगणकाद्वारे दाखल केले. या विवरण पत्रात लघु मुदतीचा भांडवली तोटा दर्शविण्यात आला नव्हता. मी सुधारित विवरण पत्र दाखल करू शकतो का? या तोटय़ाची पूर्तता मी पुढील वर्षांच्या विवरणात (कॅरी फॉरवर्ड) करू शकतो काय?
– रमेश चव्हाण
उत्तर: विवरण पत्र मुदतीपूर्वी दाखल केले तरच सुधारित विवरण पत्र दाखल करता येते. आपण विवरण पत्र मुदतीनंतर दाखल केल्यामुळे सुधारित विवरण पत्र दाखल करू शकत नाही. तोटा हा कॅरी फॉरवर्ड करण्यासाठीही विवरण पत्र मुदतीपूर्वी दाखल करणे गरजेचे असते. त्यामुळे या तोटय़ाची पुढील वर्षांत पूर्तताही करता येणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2014 1:01 am

Web Title: tax solution
Next Stories
1 नवीन पेन्शन योजना
2 निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन
3 उठा उठा दिवाळी आली, योग्य गुंतवणुकीची वेळ झाली..
Just Now!
X