* प्रश्न : मी एक गृहिणी असून शिवणकाम, मेहंदी वगरे काम करून मागील तीन चार वर्षांत जमा रक्कम रुपये दोन लाख  बँकेच्या मुदत ठेवीत १३ महिन्यासाठी गुंतविले होते. त्यावर मला २३ हजार  रुपये व्याज मिळाले आहे. बँकेने १५ जी फार्म भरून घेतला आहे. आता मला कर विवरण भरणे आवश्यक आहे का?

–  नीता रेड्डी, यवतमाळ

उत्तर : एका वर्षांचे करपात्र उत्पन्न हे कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर विवरणपत्र भरणे गरजेचे असते. आपले उत्पन्न २,५०,००० रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे आपल्याला विवरणपत्र भरणे गरजेचे नाही.

* प्रश्न :  मी अनिवासी भारतीय आहे मी पालघरमध्ये एक दुकान बिल्डरकडे जानेवरी २०१४ मध्ये बुक केले होते. यासाठी मी बिल्डरला ७,५०,००० रुपये माझ्या एनआरई खात्यातून दिले होते. हा प्रकल्प अजून सुरु न झाल्यामुळे बिल्डरने हे पसे व्याजासकट ९,५५,२३८ रुपये माझ्या बचत खात्यात परत जमा केले. मला या व्याजावर कर भरावा लागेल का? विवरणपत्र भरावे लागेल का? मला कोणती कागदपत्रे तयार ठेवावी लागतील?

सिद्धेश पाटील

उत्तर : आपल्याला मिळालेले २,०५,२३८ रुपये इतका व्याज लाभ (९,५५,२३८ – ७,५०,००० रुपये) करपात्र असेल. आपल्याला या व्यतिरिक्त दुसरे उत्पन्न नसेल तर या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. करपात्र उत्पन्न २,५०,००० रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे विवरणपत्र भरावे लागणार नाही. या रकमेवर बिल्डरने उद्गम कर (टीडीएस) कापला असेल तर एकूण रक्कम करपात्र म्हणून गणली जाईल. उदाहरणार्थ तुमची व्याजाची रक्कम ही २,२८,०४२ रुपये झाली असून, त्यावर १० टक्के उद्गम कर  म्हणजे २२,८०४ रुपये वजा करून तुम्हाला २,०५,२३८ रुपये दिले गेले असतील तर २,२८,०४२ रुपये करपात्र उत्पन्न म्हणून गणले जातील. इतर उत्पन्न नसेल तर या रकमेवर कर भरावा लागणार नाही. परंतु उद्गम कर (टीडीएस) कापला गेल्यामुळे विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. विवरणपत्र भरून उद्गम कराच्या परताव्याचा दावा करता येईल. बिल्डरला पसे देताना झालेला पत्रव्यवहार आणि पसे परत करतांना बिल्डरने दिलेले पत्र वगरे कागदपत्र जपून ठेवावी.

 

* प्रश्न : माझे वय २८ वष्रे आहे. मी लातूरला एका महाविद्यालयात प्राचार्य आहे. मला ८,१२,०४० रुपये वेतन मिळते या वेतनातून २,५०० रुपये व्यवसाय कर कापला जातो, मी कलम ८० सी नुसार १,६५,००२  रुपयांची गुंतवणूक केली आहे. मी डॉक्टरेट करणार आहे त्यासाठी मला संशोधनावर खर्च करावा लागणार आहे. मला काही कर सवलत मिळू शकेल का? माझा कर वाचविण्यासाठी मी अजून कुठे गुंतवणूक करू शकतो?

विश्व्ोश्वर धारेशिवे, लातूर

उत्तर : कलम ८० सी प्रमाणे मुलांच्या शिक्षणावर केलेल्या खर्चाची दीड लाख रुपयांपर्यंतची वजावट मिळते. परंतु, स्वतच्या शिक्षणासाठी केलेल्या खर्चाची वजावट कलम ८० सी नुसार मिळणार नाही.

तथापि स्वतच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेतल्यास कर्जावरील व्याजाची वजावट मिळू शकते. यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. आपण कलम ८० सी नुसार १,६५,००२  रुपयांची गुंतवणूक केली आहे. यावर  दीड लाख रुपयांची वजावट उत्पन्नातून मिळेल. या शिवाय कलम ८० डी नुसार मेडिक्लेम पोलिसी घेऊन कर वाचवता येऊ शकतो.

* प्रश्न : माझ्या वडिलांची एक एचयूएफ (िहदू अविभक्त कुटुंब) आहे. त्या ‘एचयूएफट’मधून मला ते पाच लाख रुपये देऊ इच्छितात. मी एका कंपनीत नोकरी करतो. माझा प्रश्न असा आहे की, मला या पाच लाख रुपयांवर कर भरावा लागेल का? हे पाच लाख रुपये मी बँकेत मुदत ठेवीत गुंतविले तर मला यावर मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागेल का? मला माझी ‘एचयूएफ’ स्थापन करता येईल का?

विश्रुत कुलकर्णी, पुणे

उत्तर : आपल्याला वडिलांच्या ‘एचयूएफ’मधून पाच लाख रुपये मिळणार आहेत. त्यावर आपणाला कर भरावा लागणार नाही. हे पसे आपल्या ‘एचयूएफ’मध्ये दाखविता येतील. यासाठी आपले लग्न होणे महत्वाचे आहे. आपले लग्न झाले असेल तर आपल्याला ‘एचयूएफ’स्थापन करता येईल. कारण एक माणूस म्हणजे कुटुंब होत नाही.

आपले लग्न झाले असेल तर हे पाच लाख रुपये आपल्या ‘एचयूएफ’मध्ये दाखवून त्यावरील व्याज सुद्धा ‘एचयूएफ’मध्ये दाखविता येईल आणि याची कर आकारणी ‘एचयूएफ’मध्ये होईल. ‘एचयूएफ’साठी सुद्धा आपल्याला २,५०,००० रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त असेल. आपले लग्न झाले नसले तर या पाच लाख रुपयांवर मिळणाऱ्या व्याजावर आपणाला कर भरावा लागेल.

* प्रश्न : मी काही वर्षांपूर्वी एक दुकान विकत घेतले होते. ते मी एका कंपनीला भाडय़ाने दिले आहे. मला महिन्याला १८,००० रुपये इतके भाडे मिळते. या भाडय़ावर कंपनी १०% उद्गम कर (टीडीएस) कापते. मागील वर्षांपर्यंत मी नोकरी करीत होतो त्यामुळे माझे करपात्र उत्पन्न होते. या वर्षांपासून माझे उत्पन्न २,५०,०००  रुपयांपेक्षा कमी असेल. मी कंपनीला उद्गम कर न कापण्याची विनंती करू शकतो का?

सुधाकर माने, सोलापूर

उत्तर : करपात्र उत्पन्न नसेल आणि उद्गम कर कापला जात असेल तर आपल्याला प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून तसे प्रमाणपत्र मिळवावे लागते. आपल्या उत्पन्नानुसार प्राप्तिकर अधिकारी उद्गम कर न कापण्याचा किंवा कमी दराने कापण्याचे आदेश कंपनीला देऊ शकतो. या आदेशाद्वारे कंपनी उद्गम कर कापणार नाही. व्याजाचे उत्पन्न असेल आणि करपात्र उत्पन्न नसेल तर करदात्याला प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र मिळवावे लागत नाही. यासाठी स्वयंघोषित १५ जी  किंवा १५ एच हा फॉर्म उद्गम कर कापणाऱ्याला सादर केला तर तो उद्गम कर कापत नाही.

नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात स्वयंघोषित फॉर्म १५ जी  किंवा १५ एच कर कापणाऱ्याला सादर करून उद्गम कर न कापण्याची विनंती करू शकता. यासाठी प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ही तरतूद १ जून २०१६ पासून लागू आहे.

लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार आहेत. वाचकांनी त्यांना आपले प्रश्न ई-मेल : pravin3966@rediffmail.com वर पाठवावेत.