04 December 2020

News Flash

कर बोध : दीर्घमुदतीच्या शेअरच्या विक्रीवर करआकारणी

गुंतवणूकदाराला या बदललेल्या तरतुदींचा विचार करून नियोजनामध्ये योग्य तो बदल करणे गरजेचे आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रवीण देशपांडे

शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांचे शेअर आणि इक्विटी फंडातील युनिटच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा हा मागील वर्षांपर्यंत करमुक्त होता. २०१८-१९ या आर्थिक वर्षांपासून तो करपात्र करण्यात आला. याशिवाय शेअर बाजारात नोंदणीकृत कंपनी असलेल्या कंपन्यांनी शेअर पुनर्खरेदी (बायबॅक) केले तर त्यावर गुंतवणूकदाराला कर भरावा लागत होता. आता असे ‘बायबॅक’ केलेल्या शेअरवर झालेला भांडवली नफा करमुक्त असेल. हा कर आता शेअर ‘बायबॅक’ करणाऱ्या कंपनीला भरावा लागणार आहे. मागील एका वर्षांत या कररचनेत बराच बदल झाला आहे.

गुंतवणूकदाराला या बदललेल्या तरतुदींचा विचार करून नियोजनामध्ये योग्य तो बदल करणे गरजेचे आहे. अल्पमुदतीच्या भांडवली नफ्याच्या तरतुदीत बदल झाला नसला तरी दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्याच्या तरतुदीत मात्र मोठे बदल झाले आहेत. ज्या कंपन्यांच्या शेअरच्या विक्रीवर एसटीटी भरला गेला आहे आणि ते शेअर विक्रीच्या १२ महिन्यांपूर्वी खरेदी केले असतील (म्हणजेच दीर्घमुदतीची संपत्ती असेल) तर त्यावर होणारा भांडवली नफा, जो ३१ मार्च २०१८ पूर्वी करमुक्त होता. त्यावर १ एप्रिल २०१८ नंतर १० टक्के इतका कर आकारण्यात आला. हे करदायित्व गणताना प्रथम १ लाख रुपयांपर्यंतच्या नफ्यावर कर भरावा लागणार नाही आणि १ लाख रुपयांवर असणाऱ्या भांडवली नफ्यावर १०% कर भरावा लागेल. भांडवली नफा गणताना शेअरची खरेदी किंमत कोणती घ्यावयाची, हे शेअर कधी खरेदी केले यावर अवलंबून आहे. शेअर १ फेब्रुवारी २०१८ नंतर खरेदी केले असतील तर प्रत्यक्ष खरेदी किंमत विचारात घेऊन भांडवली नफा किती झाला हे ठरते. शेअर १ फेब्रुवारी २०१८ पूर्वी खरेदी केले असतील तर त्या शेअरची खरेदी किंमत ही पुढील १ आणि २ मधील जास्तीत जास्त रक्कम

१. प्रत्यक्ष खरेदी किंमत

२. ३१ जानेवारी २०१८ रोजीचे जास्तीत जास्त बाजारी मूल्य आणि विक्री किंमत यातील जी कमी आहे

ही खरेदी किंमत म्हणून विचारात घेतली जाते. ३१ जानेवारी २०१८ रोजी शेअरचे सौदे झालेले नसल्यास त्याच्या आधीच्या दिवसाची किंमत विचारात घेतली जाते. या कलमानुसार ‘महागाई निर्देशांकाचा’ फायदा करदात्याला मिळत नाही.

या ‘ग्रँडफादरिंग’ तरतुदीमुळे ३१ जानेवारी २०१८ नंतर झालेला नफा करपात्र आहे. काही गुंतवणूकदारांनी अनेक वर्षांपूर्वी अगदी अल्प किमतीत म्हणजे १० रुपयांत खरेदी केलेल्या शेअरची आताची किंमत काही हजार रुपयांमध्ये आहे, त्यानी ते शेअर विकल्यास ३१ जानेवारी २०१८ नंतर जी किंमत वाढली त्यावरच कर भरावा लागतो. उदा. एका करदात्याने वर्ष १९८० मध्ये रोजी एका कंपनीचे १,००० शेअर १० रुपये किमतीत खरेदी केले आणि आता ते शेअर ३,००० रुपयांना विकले. या शेअरचे ३१ जानेवारी २०१८ रोजी मूल्य २,७०० रुपये असल्यास या नवीन तरतुदीनुसार खरेदी किंमत खालील १ आणि २ मधील जास्तीत जास्त रक्कम

१. प्रत्यक्ष खरेदी किंमत – १० रुपये

२. ३१ जानेवारी २०१८ रोजीचे जास्तीत जास्त बाजारी मूल्य रु. २,७०० रुपये आणि विक्री किंमत ३,००० रुपये यामधील जी कमी आहे – म्हणजे २,७०० रुपये

या १ व २ मधील जास्त रक्कम म्हणजे २,७०० रुपये ही खरेदी किंमत असेल आणि दीर्घमुदतीचा भांडवली नफा विक्री किंमत ३,००० रुपये वजा वरीलप्रमाणे खरेदी किंमत २,७०० रुपये असा ३०० रुपये, प्रत्येकी एकूण ३,००,००० रुपये (नफा ३०० रुपये १,००० शेअर) झाला. या नफ्यावर करदात्याला २०,००० रुपये कर भरावा लागेल (प्रथम १ लाख रुपयांवर कर नाही बाकी २ लाख रुपयांवर १०% म्हणजेच २०,००० रुपये कर)

या तरतुदीचा फायदासुद्धा गुंतवणूकदारांना झाला. ३१ मार्च २०१८ पूर्वी दीर्घमुदतीचा भांडवली नफा करमुक्त होता. त्यामुळे दीर्घमुदतीचा भांडवली तोटा इतर दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येत नव्हता किंवा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’सुद्धा करता येत नव्हता. आता हा नफा करपात्र झाल्यामुळे शेअरच्या विक्रीतून झालेला दीर्घमुदतीचा भांडवली तोटा इतर भांडवली नफ्यातून वजा करता येतो किंवा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’सुद्धा करता येतो.

करदात्याला ‘बोनस शेअर’ मिळाले असतील तर त्यासाठीसुद्धा वरील तरतूद लागू होते. बोनस शेअरसाठी खरेदी मूल्य शून्य समजले जाते. परंतु कंपनीने बोनस ३१ जानेवारी २०१८ पूर्वी जाहीर केला असेल तर त्याचे खरेदी मूल्य वर सांगितल्याप्रमाणे गणले जाते. उदा. वर दिलेल्या उदाहरणात १,००० शेअर वर्ष २००१ मध्ये बोनस मिळाले असल्यास भांडवली नफ्यासाठी खरेदी किंमत खालील १ आणि २ मधील जास्तीत जास्त रक्कम :

१. प्रत्यक्ष खरेदी किंमत – शून्य रुपये

२. ३१ जानेवारी २०१८ रोजीचे जास्तीत जास्त बाजारी मूल्य रु. २,७०० रुपये आणि विक्री किंमत ३,००० रुपये या मधील जी कमी आहे – म्हणजे २,७०० रुपये

या १ व २ मधील जास्त रक्कम म्हणजे २,७०० रुपये ही खरेदी किंमत असेल आणि दीर्घमुदतीचा भांडवली नफा विक्री किंमत ३,००० रुपये वजा वरीलप्रमाणे खरेदी किंमत २,७०० रुपये असा ३०० रुपये प्रत्येकी असा एकूण ३,००,००० रुपये (नफा ३०० रुपये १,००० शेअर) दीर्घमुदतीचा भांडवली नफा झाला. ३१ जानेवारी २०१८ नंतर जाहीर झालेल्या बोनस शेअरसाठी मात्र खरेदी मूल्य शून्यच समजले जाते.

या तरतुदी फक्त खालील अटींची पूर्तता केल्यासच लागू :

१. शेअर ही दीर्घमुदतीची संपत्ती असली पाहिजे (म्हणजे शेअर विक्रीच्या १२ महिन्यांपूर्वी खरेदी केले असले पाहिजेत.

२. शेअर्सच्या खरेदी आणि विक्रीवर एसटीटी भरला असला पाहिजे. परंतु काही प्रकारच्या खरेदी पद्धतीवर एसटीटी भरला नसला तरी या कलमानुसार सवलत मिळू शकते. उदा. बोनस शेअर २००४ पूर्वी खरेदी केलेले शेअर (जेव्हा एसटीटी अस्तित्वात नव्हता) इत्यादी.

ल्ल लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी pravin3966@ rediffmail.com या ई-मेलवर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 1:38 am

Web Title: taxation on the sale of long term shares abn 97
Next Stories
1 अर्थ वल्लभ : दिवाळी विशेष
2 बाजाराचा तंत्र कल : लक्ष्यपूर्ती आणि सावधगिरी
3 अर्थचक्र : प्रकल्प गुंतवणुकीचं दुर्भिक्ष कधी संपेल?
Just Now!
X