19 September 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : दे धक्का

प्रथम आपण, निर्देशांकावर जी अपेक्षित घसरण चालू आहे तिचा तळ / निर्देशांकाचा नीचांक जाणून घेऊया. 

आशीष ठाकूर

या स्तंभातील जुलैपासून काल-परवाच्या लेखापर्यंत, मग त्यात ‘बस एक बार मेरा कहा मान लीजिये पासून’ ते ‘लबाडाघरचे आवतन’पर्यंतच्या प्रत्येक लेखात अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय चिंताजनक व शोचनीय आहे हे विविध उदाहरणे देऊन अधोरेखित केले गेले होते. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीने याचा भरभक्कम पुरावा देखील दिला. सरलेल्या सप्ताहातील सोमवारी सकल राष्ट्रीय उत्पादन हे जवळपास उणे चोवीस अंशापर्यंत घसरले. या बातमीचा..दे धक्का बाजाराला बसला.

सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारपर्यंत बाजार काही या धक्क्यातून सावरला नाही. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव:

सेन्सेक्स : ३८,३५७.१८ / निफ्टी : ११,३३३.८५

अंतर्मनात अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून अर्थव्यवस्थेबद्दल चिंता वाटते. साशंकता तर आहेच, पण बहिर्मनात तांत्रिक विश्लेषणातील आश्वासक भाकितेही खुणावत असतात. त्या भाकितांनुसार, निफ्टी निर्देशांक ११,८०० पर्यंत जाणार होते. आणि त्या स्तरावरून निफ्टी निर्देशांकात घसरण होईल हे भाकीत देखील ३१ ऑगस्टला अचूक ठरले. या प्रक्रियेतील मानसिक अवस्थतेला, कुतरओढीला बीबीसीवरील ‘येस मिनिस्टर’ मालिकेतील गाजलेला प्रसंग चपखल बसतो.. एक अर्थतज्ज्ञ राजकारणात येतो, पुढे मंत्री होऊन राजकारणात रुळतो. एकदा त्याच्या खात्याअंतर्गंत डबघाईला आलेल्या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कठोर आर्थिक निर्णय घेण्याची गरज असते. तेव्हा या व्यक्तीमधील राजकारण्यांनी पूर्वाश्रमीच्या अर्थतज्ज्ञावर कशी मात केली त्याचा हा खुमासदार किस्सा.. हा प्रकल्प सुधारण्यासाठी ज्या आर्थिक कठोर उपाययोजना सुचवल्या आहेत त्याबद्दल अर्थतज्ज्ञ म्हणून माझा संपूर्ण पाठिंबा आहे, पण राजकारणी म्हणून या उपाय योजनांना माझा विरोध आहे. या गोष्टीचा मथितार्थ हाच की, जे गुंतवणूकदार तर्कसंगत विचाराने गुंतवणूक करतात, अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत ते आता चालू असलेल्या तेजीबद्दल साशंकच आहेत,पण तांत्रिक विश्लेषणाच्या अंगाने विचार केल्यास, निर्देशांकावर तेजी कायम असेल, कस ते पाहूया.

प्रथम आपण, निर्देशांकावर जी अपेक्षित घसरण चालू आहे तिचा तळ / निर्देशांकाचा नीचांक जाणून घेऊया.

येणाऱ्या दिवसातील ज्ञात, अज्ञात निराशाजनक घटना, ज्यात भारत-चीन सीमावादाची चिघळण, भारतात करोनाची वाढणारी लक्षणीय रुग्णसंख्या, या सर्व निराशाजनक, दाहक घटनांच्या व्याप्तीत देखील निर्देशांकांनी सेन्सेक्सवर ३६,७०० आणि निफ्टीवर १०,८०० चा स्तर सातत्याने राखल्यास निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४०,००० ते ४१,००० आणि निफ्टीवर ११,८०० ते १२,००० असे असेल. त्यानंतर सेन्सेक्स ४४,००० आणि निफ्टी १२,६०० च्या नवीन उच्चांकाला डिसेंबरपर्यंत गवसणी घालतील.

कंपन्यांचे वित्तीय जाहीर झालेले निकाल आणि त्यांचे विश्लेषण..

> फायझर लिमिटेड : या स्तंभातील २७ जुलैच्या लेखात फायझर लिमिटेडचे निकालपूर्व विश्लेषण केले होते. त्यानुसार, तिमाही निकालाची नियोजित तारीख ७ जुलै होती. २४ जुलैचा बंद भाव ४,३४१ रुपये होता. निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर ४,००० रुपये होता. तिमाही वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर, समभागाचा बाजारभाव महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तरावर टिकला, तर तिमाही निकाल चांगला, अन्यथा वाईट, असे त्या विश्लेषणाने नमूद केले होते. जर निकाल उत्कृष्ट असेल तर ४,००० रुपयांचा महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तर राखत ४,७०० रुपयांचे वरचे लक्ष्य लेखाने सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होते. फायझर लिमिटेडने निकालापश्चात ४,००० रुपयांचा स्तर राखत २७ ऑगस्टला ४,९३० रुपयांचा उच्चांक नोंदवला. ज्या गुंतवणूकदारांकडे फायझर दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणेअंतर्गत आहेत त्यांनी ते राखून ठेवले व अल्पमुदतीच्या गुंतवणूकदारांनी अल्पावधीत आठ टक्कय़ांचा परतावा मिळविला. गेल्या सप्ताहातील घातक उतारात देखील फायझरने ४,००० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तर राखलाच, पण सरलेल्या सप्ताहातील, शुक्रवारचा साप्ताहिक बंद हा बरोबर लेखात नमूद केलेल्या वरच्या लक्ष्यावरच ४,७७४ आहे. घडले ते नवलच म्हणायचं!

> कोटक महिंद्र बँक : २७ जुलैच्या लेखातील दुसरा समभाग होता कोटक बँकेचा. समभागाचा २४ जुलैचा बंद भाव त्यासमयी १,३४९ रुपये होता, निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर १,३०० रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे, जर वित्तीय निकाल उत्कृष्ट असेल तर १,३००  रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य १,४८० रुपयांचे असेल. कोटक बँकेने निकालापश्चात १,३०० रुपयांचा स्तर राखत, ३१ ऑगस्टला १,५०० रुपयांचा उच्चांक मारून वरचे लक्ष्य साध्य केले. अल्पमुदतीच्या गुंतवणूकदारांनी अल्पावधीत नऊ टक्क्यांचा परतावा मिळविला. आजही कोटक बँक १,३०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखून आहे आणि ४ सप्टेंबरचा समभागाचा बंद भाव हा १,३७८ रुपये आहे.

ashishthakur1966@gmail.com / लेखक भांडवली बाजार विश्लेषक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2020 1:10 am

Web Title: technical analysis of stock market review of stock market zws 70
Next Stories
1 कर बोध : चेहरा-विरहित मूल्यांकन
2 अर्थ वल्लभ : विविधतेत एकता
3 क.. कमॉडिटीचा : बुलडेक्स – सोने-चांदीमधील व्यवहारांची सुसंधी
Just Now!
X