07 July 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : धडकी की धकधक..

भविष्यात भारताचा अर्थव्यवस्था वाढीचा दर हा शून्याखाली- म्हणजे उणे विकास दर असेल.

आशीष ठाकूर

चीनने सैन्याची जमवाजमव करत, भारताची सीमेवर कोंडी केली, तर आधीच करोनामुळे विस्कळीत झालेले आर्थिक चक्र कसे आणि केव्हा सुधारणार? या विवंचनेत असतानाच आणखी एक बातमी येऊन धडकते. भविष्यात भारताचा अर्थव्यवस्था वाढीचा दर हा शून्याखाली- म्हणजे उणे विकास दर असेल.

अशा निराशाजनक बातम्यांनी हृदयात धडकी भरते, तर बरोबर उलट हे सर्व घडत असताना, निफ्टी तेजीची मोहक गिरकी घेते. निर्देशांकाची ही ‘दिल धकधक करने लगा’सारखी अदा लाजवाबच! अशा परस्परविरोधी, गोंधळलेल्या बाजाराच्या वर्तनाचा सरलेल्या सप्ताहात आपण अनुभव घेतला. त्याचा अर्थ लावतच, या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३२,४२४.१०

निफ्टी : ९,५८०.३० 

तर्कसंगत विचारसरणीप्रमाणे, युद्ध ज्वर, अर्थव्यवस्थेवर मळभ असताना शांत बसणे,बाजारापासून दूर राहणे ही काळाची गरज असते. पण बाजाराचे वर्तन हे नेहमी तर्कसंगत विचारसरणीच्या विरोधात असल्याने, जेव्हा युद्धज्वराची परिस्थिती निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदारांच्या हृदयात धडकी भरते, पण बाजाराला चार हत्तींचे बळ येते. किंबहुना प्रत्येक युद्ध प्रसंगात निर्देशांक नीचांकापासून दुप्पट होतो अथवा निर्देशांक नवीन उच्चांकाला गवसणी घालतो. हे गृहीतक मनाला पटणार नाही, पण इतिहासात डोकावून पाहता त्याची खात्रीही पटते.

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या काळात १९९९ साली कारगिल युद्धाच्या वेळेला मे १९९९ साली सेन्सेक्स ३,३६३ आणि निफ्टी निर्देशांक अवघा ९६८ वर होता. अवघ्या नऊ  महिन्यांत २५ फेब्रुवारी २०००ला सेन्सेक्स ६,१५० आणि निफ्टीने १,८१८ चा उच्चांक नोंदवला. (डॉट कॉम बूमचा उच्चांक)

पाकिस्ताननी केलेले छुपं युद्ध, जे इतिहासात २६/११चा मुंबईवरील हल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. २६ नोव्हेंबर २००८ ला सेन्सेक्स ८,३०० आणि निफ्टी निर्देशांक २,५०० वर होता. वर्षभरात निर्देशांक नीचांकापासून दुप्पट, म्हणजे २७ नोव्हेंबर २००९ला सेन्सेक्स १७,२९० आणि निफ्टी निर्देशांक ५,१३८ झाला.

गेल्या वर्षीचा बालाकोटचा सर्जिकल स्ट्राइकच्या वेळेला १९ फेब्रुवारी २०१९ ला सेन्सेक्स ३५,२८७ आणि निफ्टी १०,५८५ होता. अवघ्या साडेतीन महिन्यांत ४ जूनला सेन्सेक्सने ४०,३१२ आणि निफ्टीने १२,०९५ त्या वेळचा नवीन उच्चांक नोंदवला.

हे सगळं घडत असताना शेअर बाजार का डगमगत नाही? याचं कारण मुंबई शेअर बाजार हा १४० वर्षे जुना आहे. पहिलं व दुसरं जागतिक महायुद्ध, भारताचा स्वातंत्र्य लढा, १९६२चे भारत-चीन युद्ध, पाकिस्तानबरोबरची दोन युद्धे, मुंबई शेअर बाजाराच्या वास्तूत झालेला १९९३ चा बॉम्बस्फोट या सर्वातून बाजार तावूनसुलाखून बाहेर आला आहे, अनुभव संपन्न झाला आहे. आता युद्धाची हाकाटी का पिटली जाते? तर..

शेजारी राष्ट्रातील देशांतर्गत प्रश्न चिघळले की त्यावरच लक्ष हटवण्यासाठी युद्धाची हाकाटी पिटली जाते. आज चीन हेच करत आहे. करोनाचे जनकत्व मिळाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम झालेली प्रतिमा, त्यात हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची जनविरोधाला न जुमानता अंमलबजावणी करण्याचा चीनचा आटापिटा, व या सर्वावरून लक्ष विचलित करण्यासाठीचा हा लुटुपुटू लढाईचा प्रयत्न आहे.

भविष्यातील युद्ध टाळण्यासाठी, आपली आंतरराष्ट्रीय धोरणे जेवढी पुरोगामी, परदेशी भांडवलाबाबतीत उदारमतवादी तेवढी युद्धाची शक्यता कमी व देशाचा विकासदेखील साध्य होतो कसा ते पाहूया.

देशांतर्गत परदेशी भांडवलामुळे देशाला उच्च विकसित तंत्रज्ञान मिळते, स्थानिक रोजगार उपलब्ध होतो.व काही वर्षांत त्या विभागाचा आर्थिक विकास होतो. आता या कंपन्या बहुराष्ट्रीय त्या देशांच्या सरकारदरबारी वजन असलेल्या असे हे विशाल महाकाय उद्योगसमूह असतात. आता या देशोदेशींच्या विशाल उद्योग समूहांचे भारत व चीन या दोन्ही देशांमध्ये उद्योग स्थापनेत भरीव गुंतवणूक आहे. समजा युद्ध झालेच, ते चिघळले तर या दोन देशांपेक्षा या परकीय उद्योग समूहांना परवडण्यासारखे नसते त्यामुळे हे उद्योग समूह आपले सरकारदरबारी वजन वापरून त्या सरकारांना युद्ध मिटवण्यासाठी प्रवृत्त करतात. हा मुद्दा समजून घेण्यासाठी सरलेल्या सप्ताहातीलच उदाहरण घेऊया.

या वेळेला, गेल्या वेळेसारखी डोकलामला घडलेली दोन सैन्यांमधील धक्काबुक्कीदेखील घडली नाही. चीनच्या सैन्याने त्यांच्या हद्दीत राहून संचलन केले, भारतानेदेखील हल्ला झालाच तर प्रत्युत्तरासाठी आपल्या हद्दीत सैन्याची जमवाजमव केली. आता प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटण्याअगोदरच ट्रम्प साहेब शांतिदूत म्हणून हजर. (ट्वीटरवरून मध्यस्थाचा प्रस्ताव) शेवटी भारत-चीन तणावाच्या घटना चहाच्या पेल्यातील वादळ ठरल्या. आता ज्याला १४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेला बाजार या घटनांची पत्रास तरी ठेवणार का? जी तरुण मुले आहेत, नुकतीच बाजारात पाऊल ठेवत आहेत, त्यांच्या हृदयात धडकी भरते व निफ्टीचा ९,६०० चा पदन्यास, युद्धाला घाबरून, तेजी घालवून बसल्यावर, हृदयात धकधक होते. शेवटी हृदयच ते, धडकी तरी भरणार अथवा धकधक तरी करणार!

भविष्यात युद्ध हा शब्द आला की, घाबरून न जाता ती समभाग खरेदी करण्याची सुवर्णसंधी असेल, हे वरील विवेचनावरून स्पष्ट होईल.

आता बाजाराच्या वाटचालीकडे वळूया.

गेल्या दोन लेखांत सूतोवाच केलेले सेन्सेक्सवरील ३४,४०० आणि निफ्टीवरील १०,००० चे लक्ष्य हे आता हाकेच्या अंतरावरच वाटत आहे. आता एक हलकीशी घसरण अपेक्षित असून तिचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३१,८०० आणि निफ्टीवर ९,३०० असेल. निर्देशांकांनी ही पडझड या स्तरापर्यंत राखायला हवी. तसे झाल्यास प्रलंबित असलेले सेन्सेक्सवरील ३४,४०० आणि निफ्टीवरील १०,००० चे वरचे लक्ष्य दृष्टिपथात येईल.

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ashishthakur1966@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 12:48 am

Web Title: technical analysis of stock market technical analysis of indian stock marke zws 70
Next Stories
1 बंदा रुपया : उद्यमशीलतेचे जाळे विणताना..!
2 माझा पोर्टफोलियो : आव्हानांना पेलणारी बहुराष्ट्रीय कंपनी
3 नावात काय ? स्टरलायझेशन
Just Now!
X