News Flash

रपेट बाजाराची : थोडी उसंत!

अमेरिकन फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर वाढविण्याच्या संकेताने जागतिक बाजारांबरोबर भारतीय बाजारही खाली आले.

stock-market
(संग्रहित छायाचित्र)

सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

गेल्या सप्ताहात काहीना काही निमित्ताने बाजाराच्या घसरणीला कारण मिळत होते. तीन परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची डिमॅट खाती एनएसडीएलने गोठवल्याची माहिती सोमवारी सकाळीच प्रसिद्ध झाली व अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागामध्ये मोठी घसरण झाली. परिणामी, बाजार मोठय़ा फरकाने खाली आला. नंतर अमेरिकन फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर वाढविण्याच्या संकेताने जागतिक बाजारांबरोबर भारतीय बाजारही खाली आले. सोबत चीनने पोलाद व अन्य धातूंच्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कारवाई सुरू केली व आपल्याकडील स्टील व अन्य धातू कंपन्यांना विक्रीच्या माऱ्याला तोंड द्यावे लागले. पण ही घसरण तात्पुरती आहे. गुंतवणूकदारांच्या उत्साहाने बाजाराच्या प्रमुख निर्देशांकानी या सप्ताहात एकदा नवीन उच्चांक गाठला पण तो टिकला नाही व साप्ताहिक तुलनेत बाजाराचे निर्देशांक थोडय़ाशा घसरणीने बंद झाले.

जगप्रसिद्ध डॉमिनो पिझ्झाची भारतातील फ्रँचाइझी असलेल्या ज्युबिलंट फूडवर्क्‍स या कंपनीच्या मार्चअखेरच्या तिमाही नफ्यामध्ये तीनपट वाढ झाली. वार्षिक तुलनेत कंपनीच्या विक्रीत १४ टक्के वाढ झाली, तर नफा जवळजवळ दुप्पट झाला. कंपनीने तोटय़ात असणारी ११० उपाहारगृहे बंद केली तर १३५ नव्याने उघडली. कंपनीच्या पार्सल सेवेत गेल्या वर्षांत ७६ टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीची भारतात १,३६० उपाहारगृहे आहेत व पिझ्झाच्या बाजारपेठेत ७० टक्के हिस्सा आहे. कंपनीने डॉमिनोच्या युरेशियामधील कंपनीत ३२ टक्के हिस्सा खरेदी केला आहे व पॉपायचे (Popeyes) खाद्यपदार्थ भारतात विकण्याचे हक्क खरेदी केले आहेत. करोनाच्या लाटांमुळे भारतात आतापर्यंत ४० टक्के लहान उपाहारगृहे बंद झाली आहेत. याही क्षेत्रात व्यवसाय मोठय़ा उद्योगांकडे एकवटतो आहे. कंपनीच्या समभागांनी निकाल जाहीर झाल्यावर वार्षिक उच्चांक गाठला आहे. पण नेहमीच महाग वाटणारे समभाग कधीतरी खरेदीची संधी देतात. तेव्हा घेण्यासारखी ही कंपनी आहे.

निओजेन केमिकल्स ही २७ वर्षे जुनी कंपनी. एका आयआयटी इंजिनीयरने स्थापलेली ही कंपनी ब्रोमाईन व लिथियमवर आधारित स्पेशालिटी केमिकल्स बनविते. या स्मॉल कॅप कंपनीने मार्चअखेर तिमाहीत विक्रीत १३ टक्के वाढ साध्य केली. संपूर्ण वर्षांत ही वाढ १० टक्के झाली. हे साध्य करताना नफाक्षमतेतदेखील वाढ झाली आहे. कंपनीच्या दहेज येथील कार्यविस्तार पूर्ण झाल्यावर कंपनीच्या विक्रीत आणखी ५० कोटींची भर पडेल. कंपनीचे ६५ टक्के भांडवल प्रवर्तकांकडे आहे व उरलेल्या ३५ टक्क्य़ांत निम्मा वाटा म्युच्युअल फंड व परदेशी गुंतवणूकदारांचा आहे. कंपनीच्या समभागाचा गेल्या तीन वर्षांतील बाजारातील आलेख कायम उंचावणारा आहे. सध्याच्या घसरलेल्या भावात यात सहभागी होण्याची संधी आहे.

जेके सिमेंटचे निकाल मागील वर्षांच्या करोनाकाळातील मंदीच्या पार्श्वभूमीवर चांगले आले आहेत. वाढत्या इंधन खर्चाला तोंड देऊनही कंपनीला नफाक्षमता राखून ठेवता आली. मध्य प्रदेशातील विस्तार कार्यक्रमाबरोबर कर्जाचे कमी झालेले प्रमाण कंपनीला भविष्यात चांगल्या व्यवसायाला पूरक ठरेल. सध्याच्या भावात दीर्घ मुदतीसाठी केलेली खरेदी फायद्याची ठरेल.

जीई टी अ‍ॅँड डी ही विजेचे पारेषण व वितरण उद्योगाच्या जगातील तीन मोठय़ा कंपन्यांपैकी एक आहे. ऊर्जा साखळीच्या सर्व टप्प्यांमध्ये कंपनी सेवा पुरविते. कंपनीची वित्तीय वर्ष २०२०-२१ ची कामगिरी समाधानकारक होती. नव्याने मिळविलेल्या ग्रीन एनर्जी कॉरिडॉरची कंत्राटे व पुढील वर्षी मिळू शकणाऱ्या हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट ट्रान्समिशन प्रकल्पांच्या मागण्यांमुळे भविष्यात कंपनी कर्जमुक्त बनून चांगला परतावा देऊ शकेल. कंपनीच्या हातात साधारण पुढील दीड वर्षांसाठी पुरतील अशा ४,६०० कोटींच्या मागण्या आहेत. सध्याच्या भावात दोन वर्षे मुदतीसाठी खरेदीची संधी आहे.

या सप्ताहात अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये झालेला विक्रीचा मारा, अमेरिकन फेडरलचा व्याजदर नजीकच्या काळात वाढविण्याचे संकेत अशा मोठा परिणाम करू शकणाऱ्या घटनांचे बाजारावरील परिणाम फारच सौम्य राहिले. इतके दिवस माहिती तंत्रज्ञान, औषध निर्मिती व रसायन क्षेत्रात प्रकर्षांने जाणवणारी तेजी आता पोलाद, सिमेंट, बांधकाम, ऊर्जा, पायाभूत विकास अशा क्षेत्रातही दिसू लागली आहे. महागाईत होणारी वाढ ही चिंतेची बाब असली तरी बाजाराने ती दुर्लक्षिली आहे. कारण काही प्रमाणात ही वाढ वाढत्या मागणीचे व परिणामी औद्योगिक वाढीची निदर्शक आहे. मान्सूनची सलग तिसऱ्या वर्षांतील अपेक्षित चांगली कामगिरी शेतकी उत्पादनाचाही भरवसा दर्शवीत आहे. त्यामुळे बाजारातील तेजीचे वारे पुढील काही महिने असेच वाहतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 12:02 am

Web Title: technical analysis of stocks market stock market technical analysis zws 70 2
Next Stories
1 बाजाराचा तंत्र-कल : क्षणिक विश्रांती 
2 गोष्ट रिझव्‍‌र्ह बँकेची : सुरुवातीलाच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
3 क..कमॉडिटीचा : हमीभाव  सोयाबीनच्या हातावर तुरी
Just Now!
X