आशीष ठाकूर

गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या तेजीच्या वातावरणात सेन्सेक्सवर ३८,६०० आणि निफ्टीवर ११,३५० हा अडथळा असेल. या स्तरावर तेजीला अटकाव होइल. या वाक्याचे प्रत्यंतर सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी आले. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: ३७,८७७.३४

निफ्टी : ११,१७८.४०

येणाऱ्या दिवसात सेन्सेक्सचा भरभक्कम आधार हा ३७,००० ते ३७,३५० आणि निफ्टीवर १०,९०० ते ११,००० असा असेल. या स्तरावर निर्देशांकाची पायाभरणी होऊन निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३८,६०० आणि निफ्टीवर ११,३५० असेल. भविष्यात निर्देशांक सेन्सेक्सवर ३८,६०० आणि निफ्टीवर ११,३५० चा स्तर पार करण्यास यशस्वी ठरल्यास निर्देशांकावरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३९,५०० आणि निफ्टीवर ११,६०० असे असेल.

गुंतवणूकदारांची अस्वस्थता     

बाजारात उभे आयुष्य वेचलेल्या तांत्रिक,मूलभूत विश्लेषणाची कास धरलेले गुंतवणूकदार हे आज बाजारात चालू असलेल्या तेजीबद्दल साशंक, अस्वस्थ आहेत.

मूलभूत विश्लेषणाच्या अभ्यासकांच्या मते आज बाजाराचे पी/ई (किंमत/उत्पन्न) गुणोत्तर हे ३० च्या पल्याड झेपावल्यामुळे आताची तेजी ही शाश्वत नसून हा तेजीचा फुगा आहे. गेल्या तीस वर्षांच्या मंदीच्या इतिहासाचा आधार घेता.. १९९२, २०००, २००८, २०१५, २०२० साली बाजाराचे मूल्यांकन हे जेव्हा जेव्हा २८ ते ३०च्या पी/ई दरम्यान झेपावल्यावर बाजार कोसळतो. १९९२ ते २०१५ या कालावधीतील प्रत्येक मंदीतून तावूनसुलाखून बाहेर आलेल्या व आता पन्नाशीच्या घरात असलेल्या मध्यमवयीन गुंतवणूकदारांच्या मते १९९२ ते २०१५ च्या दाहक मंदीत, निदान प्रत्येकाचे रोजगार तरी शाबूत होते. पण २०२०सालच्या मंदीत तर नोकरीवरच गदा आली आहे. विविध आर्थिक अहवाल हे रुतलेल्या अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर येण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल असे सुचविणारे आहेत. हे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मंदीच्या कॅनव्हासवर बाजार जे तेजीचे रंग उधळतो आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांची मन:स्थिती गोंधळलेली आहे. गुंतवणूकदारांसाठी भविष्यकालीन बाजाराची वाटचाल कशी असेल त्याचा आज आढावा घेऊया.

तांत्रिक विश्लेषणातील ‘डो’ संकल्पनेप्रमाणे तेजीची अथवा मंदीची धारणा विकसित झाल्यावर ती किमान एक वर्ष चालते.

तेजी अथवा मंदीला वर्षभरात अटकाव न झाल्यास त्या तेजी अथवा मंदीचा विस्तार हा आणखी दोन वर्ष असतो. या डो संकल्पनेचे अचूक उदाहरण हे १९९२-१९९३ आणि २०१५-२०१६ मध्ये दिसेल. एप्रिल १९९२ साली सेन्सेक्सवर ४,५४६ आणि निफ्टी निर्देशांकावर १,२८० चा उच्चांक नोंदवत बाजारात मंदी सुरू झाली आणि बरोबर एप्रिल १९९३ ला सेन्सेक्सवर १,९८० आणि निफ्टी निर्देशांकावर ६०० चा नीचांक नोंदवला गेला. बरोबर एक वर्ष बाजारात मंदी चालली. या मंदीला हर्षद मेहताची मंदी असे संबोधले जाते.

दुसरे उदाहरण हे २०१५-२०१६ सालचे. मार्च २०१५ साली सेन्सेक्सवर ३०,०२४ आणि निफ्टी निर्देशांकावर ९,११९ चा उच्चांक नोंदवत बाजारात मंदी सुरू झाली. बरोबर २९ फेब्रुवारी २०१६ ला सेन्सेक्सवर २२,४९४ आणि निफ्टी निर्देशांकावर ६,८२५ चा नीचांक नोंदवला गेला.

आताच्या घडीला २० जानेवारी २०२० ला सेन्सेक्सवर ४२,२७३ आणि निफ्टीवर १२,४३० चा उच्चांक नोंदवत मंदी सुरू झाली. अवघ्या दोन महिन्यात ४० टक्क्यांची घसरण झाली. १९९२ पासून २०२० पर्यंतच्या सर्व अवास्तव, अतर्किक तेजीला २८ ते ३० च्या पी/ई गुणोत्तराने भानावर आणले आहे.

तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेता ऑसिलेटर्समधील विलियम आर, आरओसी, आरएसआय हे १९९२ ते २०२० च्या प्रत्येक तेजीत खरेदीच्या उच्चतम पातळीवर होते, जे त्या वेळेला मंदीचे दिशादर्शक होते. मूलभूत विश्लेषणामध्ये बाजार कोसळण्याचे संकेत जसे पी/ई रेशो देतात तेच काम तांत्रिक विश्लेषणामध्ये ऑसिलेटर्स करतात.

पुढील लेखात मंदीचा कालावधी, निर्देशांकाचे खालचे लक्ष्य काय असेल हे विस्तृतपणे जाणून घेऊ. (क्रमश:)