आशीष ठाकूर

निर्देशांकाच्या खेळपट्टीवर सेन्सेक्स ३८,२५० ते ३९,३५० आणि निफ्टी ११,२०० ते ११,६००च्या मर्यादित धावसंख्येतच राहील, हे आधी व्यक्त केलेले भाकीत सरलेल्या सप्ताहात प्रत्यक्षात आले. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या समालोचनाकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३८,८४५.८२

निफ्टी : ११,५०४.९५ 

चालू सप्ताहात जर सेन्सेक्सने ३९,३५० आणि निफ्टीने ११,६००च्या पातळीवर चौकार, षटकारांची आतिषबाजी केली, तर सेन्सेक्स ४०,००० आणि निफ्टी ११,८०० चा टप्पा गाठू शकेल. अन्यथा चीन-पाकिस्तानच्या कागाळ्यांचा, उदासीन अर्थव्यवस्थेचा जड रोलर खेळपट्टीवर फिरवून, खेळपट्टी फिरकी, गुगली गोलंदाजीला अनुकूल बनेल. अशा गोलंदाजीला मजबूत क्षेत्ररक्षणाची साथ मिळाल्यास धावगती (रन रेट) मर्यादित राहून निर्देशांक पुन्हा, सेन्सेक्सवर ३८,८०० ते ३८,१०० आणि निफ्टीवर ११,४५० ते ११,२५० या दरम्यान घुटमळताना दिसतील.

आता क्रिकेटचा ज्वर चढू लागल्याने ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ही संकल्पनादेखील क्रिकेटच्या परिभाषेत समजून घेऊ या. क्रिकेटमध्ये फलंदाजाला जलदगती, मध्यमगती अथवा फिरकी / गुगली गोलंदाजीला झेलत, बाद न होता, जलद धावा काढून आपली फलंदाजी सिद्ध करावी लागते. तसेच काहीसे ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ या संकल्पनेला लागू पडते. गुंतवणूकदारांची तिमाही निकाल जाहीर होण्याअगोदर मानसिक तयारीची ही प्रक्रिया आहे. निकालोत्तर समभागाच्या भांडवली बाजारातील किमतीच्या चढ-उतारासाठी मानसिक व आर्थिक तयारी करून घेणे हा मुख्य उद्देश ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ या संकल्पनेचा आहे. आता जलदगती गोलंदाजीवर, जलद धावा काढणारे फलंदाज म्हणजे टाटा पॉवर (निकालापश्चात १८ टक्के परतावा), तर ग्रासिम, गोदरेज इंडस्ट्रीज, फायझर, कोटक महिंद्र बँक, आयसीआयसीआय बँक  या फलंदाजांनी अल्पावधीत सात ते दहा टक्क्यांचा परतावा दिला आहे.

या स्तंभातील २० जुलैच्या लेखातील लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो लिमिटेडचा जाहीर झालेल्या वित्तीय निकालाचे विश्लेषण जाणून घेऊ या.

एखादा फलंदाज त्याच्या शास्त्रशुद्ध खेळासाठी, तंत्रासाठी प्रसिद्ध असल्यास क्रिकेट शौकीन त्याच्याकडून विलोभनीय अशा चौकार, षटकारांच्या वर्षांवासह मोठय़ा खेळीची अपेक्षा ठेवतात. तसेच काहीसे लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोच्या बाबतीत आहे. एकदा का लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोला तेजीचा सूर गवसला की, त्या दिवशी शतकी, द्विशतकी खेळी हमखास. पण कधी कधी जलद गतीने धावा रचणाऱ्या फलंदाजाला एखाद-दिवशी सूर गवसत नाही. हेच नेमके निकालापश्चात लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे झाले. धावसंख्येची गती ही ९०० ते ९५० या सर्वसाधारण निकालाच्या धावपट्टीवरच रेंगाळत राहिल्याने १,०५० च्या वरच्या लक्ष्यासाठी धावगती कमी पडायला लागली. आता बाद न होता (अर्थात, ९०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर न तोडता) सामना अनिर्णित राखणे हेच काय ते हातात होते. झालेही तसेच. सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचा बंद भाव हा बरोबर ९०० रुपयावरच स्थिरावला. सामना अनिर्णित राखण्याची त्याची जणू ही अविस्मरणीय खेळीच!

करू या तुमच्याकडील समभागांचे विश्लेषण!

अनेकांगाने उपयुक्त ठरलेल्या ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ या संकल्पनेचा वाचकांनाही जास्तीत जास्त फायदा मिळायला हवा. यासाठी, वाचकांकडून आलेल्या शिफारसीनुरूप, त्यांच्या समभागांच्या निकालपूर्व विश्लेषणाचा उपक्रम ‘लोकसत्ता – अर्थ वृत्तान्त’ने हाती घेतला आहे. आपण इतकेच करायचे आहे की, आपल्या समभागाचे नाव आम्हाला या ई-मेल – arthmanas@expressindia.com वर कळवावा. ज्यायोगे ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कंपन्यांच्या त्रमासिक निकालांच्या हंगामात या समभागाचे विश्लेषण, किमतीचा चढ-उतार आदींशी प्रत्यक्ष निकालाअगोदरच अवगत होता येईल.

ashishthakur1966 @gmail.com

लेखक भांडवली बाजार विश्लेषक