18 July 2019

News Flash

उभरती निधी व्यवस्थापिका

उमा वेंकटरामण यांचा जन्म एका मधमवर्गीय कुटुंबात झाला.

उमा वेंकटरामन 

|| वसंत कुलकर्णी

पुलंनी एका ठिकाणी लिहून ठेवले आहे- ‘‘आम्ही मिजासीने सांगतो की, आम्ही फैयाज खाँना ऐकलंय, निवृत्तीबुवांना ऐकलंय, वझेबुवांना ऐकलंय, मल्लिकार्जुनना ऐकलंय. आज कुमारांना आणि व्यासांना ऐकतोय. इतकं साठवलेलं आहे आमच्या मनांमध्ये की कुठलं दार कधी उघडेल आणि आमची अंतरवीणा सुरू होईल, हे तुम्हाला कोणालाच सांगता येणार नाही.’’ न जाणो याच तालावर नक्कीच सांगता येईल की, भारतातील दिग्गज निधी व्यवस्थापकांना भेटलोय. एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे प्रशांत जैन, एसबीआय म्युच्युअल फंडाचे नवनीत मुनोत.. देशातील एकही फंड घराणे नसेल, त्या फंड घराण्यातील समभाग किंवा रोखे गुंतवणुकीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एका तरी निधी व्यवस्थापकाशी भेटायची संधी मिळाली नाही. म्युच्युअल फंड उद्योगात ज्या मोजक्या स्त्री निधी व्यवस्थापिका आहेत, त्यांमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाईल अशा आयडीबीआय म्युच्युअल फंडाच्या निधी व्यवस्थापिका उमा वेंकटरामन.

महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांचा कोर्टातील पट्टेवाल्यापासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंत आणि पुढे भारताच्या गृहमंत्र्यांपर्यंतचा प्रवास कसा झाला याची कथा मधूनमधून चर्चिली जाते. पदवीच्या शेवटच्या वर्षांत शिकत असताना कधीकाळी चेन्नईत एका शेअर दलालाच्या कार्यालयात साहाय्यक म्हणून काम करणारी एका होतकरू तरुणीचा निधी व्यवस्थापिकापदापर्यंतचा प्रवास रंजक आहे.

उमा वेंकटरामण यांचा जन्म एका मधमवर्गीय कुटुंबात झाला. वडील नौदलात तर आई शिक्षिका होती. दोन बहिणींतील त्या धाकटय़ा. मोठी बहीण शास्त्रज्ञ असून त्यांच्या बहिणीने नुकतेच एक स्टार्टअप सुरू केले आहे. वडिलांची नोकरी बदलीची असल्याने त्या जरी वेगवेगळ्या ठिकाणी शिकल्या तरी माध्यमिक आणि नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण चेन्नईत झाले. कॉलेजमध्ये शिकत असताना एका वर्षी उन्हाळी सुट्टीत त्यांनी एका सनदी लेखापालाकडे तर दुसऱ्या वर्षी एका शेअर दलालाच्या कार्यालयात साहाय्यक म्हणून काम केले.

या दोन कामांपैकी आयकराच्या रिटर्नसाठी आवश्यक असणाऱ्या उत्पनाची आकडेवारी तयार करून वरिष्ठांना देण्यापेक्षा बाजारातले चढ-उतार त्यांना भावले. पारंपरिक तमिळ कुटुंबातील असूनही तरुण वयात भांडवली बाजाराची आवड निर्माण झाल्याने त्यांनी सनदी लेखापाल होण्याऐवजी एमबीएची प्रवेश परीक्षा देणे पसंत केले. एक्सएलआरआय, जमशेदपूर यासारख्या नामांकित व्यवस्थापन संस्थेत प्रवेश मिळाल्यावर आयुष्यात पहिल्यांदाच त्या कुटुंबांपासून दूर राहायला लागल्या.

एक्सएलआरआय, जमशेदपूर येथे शिकत असतानाचा काळ अतिशय सुखाचा होता. वेगवेगळ्या विषयांचे प्रोजेक्ट्स, त्या प्रोजेक्ट्सच्या डेडलाइन्स यांनी टीमवर्क आणि डेडलाइन पाळण्याच्या शिस्तीचा धडा शिकविला. प्रत्येक वेळेला डेडलाइन गाठता यायचीच असे नाही; परंतु डेडलाइन गाठण्यासाठी नेमके काय करावे लागते हे नक्कीच शिकता आले. त्यांचा समर प्रोजेक्ट मुंबईत त्यांनी मॉसेन्टोमध्ये केला. बहुराष्ट्रीय कंपन्या व्यवसायाकडे कशा पाहतात, वेगवेगळ्या उत्पादनांची नफाक्षमता कशी ठरते, पुरेशी नफाक्षमता नसल्यास उत्पादन थांबविण्याचा निर्णय कुठल्या आधारावर घेतात, या गोष्टी त्यांना समर प्रोजेक्टमध्ये शिकता आल्या. मॉसेन्टोचे ऑफिस त्या वेळी बीकेसीत होते. बीकेसी त्या वेळी विकसित झाले नव्हते. कुटुंब न्यायालयाची इमारत, रिझव्‍‌र्ह बँकेच्या इमारती इतपतच व्याप्ती होती. दुपारी जेमतेम एक विक्रेता खाण्याचे पदार्थ विकायला यायचा. एखाद्या दिवशी डबा आला नाही तर आणि त्या विक्रेत्याकडे पोहोचायला उशीर झाला तर तेथेही काही तरी खायला मिळेलच याची खात्री नसायची. बसची वारंवारिता बेताचीच होती. संध्याकाळी सात वाजल्यानंतर सगळीकडे शुकशुकाट असायचा.

त्यांना एक्सएलआरआय, जमशेदपूरमधील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये पहिली नोकरी युनिट ट्रस्ट ऑफ इंडियामध्ये मिळाले. तत्कालीन यूटीआयमध्ये त्या क्रेडिट अ‍ॅनालिस्ट होत्या. सध्या यूटीआयच्या स्थिर उत्पन्न गुंतवणुकांचे प्रमुख असलेले अमनदीप चोप्रा त्यांचे वरिष्ठ सहकारी होते. त्यांचे पती आणि त्या एकमेकांना यूटीआयमध्ये भेटले. यूटीआयमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून एकाच तुकडीत ते दाखल झाले होते. त्यांचे पती सध्या एचएसबीसी म्युच्युअल फंडात कार्यरत आहेत. यूटीआयमधील तीन वर्षांच्या अनुभवानंतर त्यांनी अमेरिकेतील विद्यापीठात नोकरी सोडून प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिथे दोन वर्षे समभाग विश्लेषक म्हणून नोकरीही केली. दरम्यान त्यांच्या पतीने प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतल्याने त्या लंडनमध्ये आल्या व त्यांनी समभाग संशोधक म्हणून नोकरी पत्करली. पतीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या व त्यांचे पती भारतात परत आले. भारतात परत आल्यावर आयडीबीआय म्युच्युअल फंडात हेड रिसर्च म्हणून दाखल होण्यापूर्वी त्यांनी दोन दलाली पेढय़ांतून काम केले. सप्टेंबर २०१७ पासून त्यांची निधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली. मागील आठ वर्षांपासून त्या आयडीबीआय म्युच्युअल फंडात कार्यरत असल्या, तरी निधी व्यवस्थापक म्हणून त्या गेल्या १८ महिन्यांपासून काम करीत आहेत. आशिया, अमेरिका, युरोप या तीन खंडांतील अनुभवाचा त्यांना आयडीबीआय म्युच्युअल फंडात निधी व्यवस्थापन करताना नक्कीच फायदा होत आहे. जगाच्या तीन खंडांत काम केलेल्या त्या एकमेव निधी व्यवस्थापक असाव्यात. त्यांनी आयडीबीआयच्या फंडांची धुरा स्वीकारल्यापासून फंडांच्या कामगिरीतील फरक जाणकारांच्या लक्षात येऊ लागला आहे. म्युच्युअल फंडांचे पत निर्धारण करणाऱ्या व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइन आणि मॉर्निगस्टारने त्यांच्या कामगिरीची दाखल घेत त्या निधी व्यवस्थापक असलेल्या फंडांची पत उंचावत आणली आहे.

निधी व्यवस्थापक या नात्याने फंडातील गुंतवणूकदारांच्या वित्तीय उद्दिष्टांची पूर्ती होत असल्याबद्दल त्यांना समाधान वाटतेच. म्युच्युअल फंड उद्योग हा उभरता उद्योग असल्याने नियंत्रक सुधारणा करतात.

अजून हा उद्योग प्रगल्भ होण्यास नक्कीच थोडा कालावधी लागेल. त्यामुळे या उद्योगाला नवीन बदलांना सतत सामोरे जावे लागते. दुर्दैवाने गुंतवणूकदारांना हे कोणी समजावून सांगत नसल्याबद्दल त्या खंतदेखील व्यक्त करतात. जगाच्या तीन खंडांतील भांडवली बाजारांचा अनुभव घेतल्याचा फायदा त्यांना समभागांच्या गुंतवणुकीसाठी निवड करताना होतो. भविष्यात त्या निधी व्यवस्थापक असलेल्या फंडाच्या कामगिरीतून त्या आपली ओळख नक्कीच प्रस्थापित करतील.

shreeyachebaba@gmail.com

First Published on February 17, 2019 11:25 pm

Web Title: the investment success story of uma venkataraman