सोन्यात गुंतवणुकीचे दिवस राहिलेले नाहीत; रुपयाच्या घसरणीचा ठाव लागत नाही, शेअर निर्देशांकाच्या दिशाही कमालीच्या भरकटलेल्या, भरीला रोखे बाजारातील गुंतवणुकीचाही अलीकडे बोऱ्या वाजला आहे. अर्थव्यवस्थेचा संकेतही व्याजाचे दर (अर्थातच कर्जावरील!) वाढत जातील असा आहे. गुंतवणुकीतून जे काही कमावले त्याचा घास घेणारी चलनवाढ आहेच.. अशा स्थितीत किमान १० टक्क्यांचा तरी परतावा देऊ शकेल अशा गुंतवणुकीचा काही पर्याय उरला आहे काय?
मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रातील दोन नामवंत तज्ज्ञांकडून हे दिशादर्शन..

एफएमपी
एफएमपी अर्थात स्थिर कालावधीच्या योजनांचा
हंगाम बहरला!
अनन्यसाधारण परिस्थिती आणि तिच्या मुकाबल्यासाठी असामान्य असे योजलेले उपाय, असेच वर्णन गेल्या तीनेक महिन्यांच्या (२२ मे नंतरच्या) परिस्थितीचे करता येईल. सामान्य गुंतवणूकदारांच्या नजरेतून पाहाल तर भांडवली बाजारातील अस्थिरतेने जीवघेणे रूप धारण केले आहे, भरीला रोखे बाजारातही खळबळ माजली आहे. अगदी सामान्य रोखे योजनांतही मुदलापेक्षा परतावा घटला आहे. अर्थातच धास्तावलेल्या गुंतवणूकदाराचा कल हा गुंतलेला पैसा काढून घेण्याकडेच आहे. त्यामुळेच या कल बदलेल्या गुंतवणूकदारांचा पैसा अन्यत्र जाऊ नये या हेतूने बऱ्याच म्युच्युअल फंडांचा होरा हा ‘एफएमपी’ योजनांकडे वळलेला दिसतो. परंतु प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेतील व्याजाचे दर वाढत असताना, या योजना गुंतवणुकीच्या दृष्टीने निश्चितच आकर्षक ठरतात.
अनेक मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांकडून स्थिर कालावधीच्या योजना अर्थात ‘फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स- एफएमपी’ वेळोवेळी गुंतवणुकीसाठी खुल्या होत असतात. एका अंदाजानुसार एकूण म्युच्युअल फंडांच्या साधारण साडेसात लाख कोटी मालमत्तेपकी ११% रक्कम म्हणजे सुमारे ८०,००० कोटी या प्रकारच्या गुंतवणुकीतून म्युच्युअल फंडांनी गोळा केले आहेत. ९१ दिवसांपासून ते वर्षांहून अधिक म्हणजे ३६७-३६९ दिवस मुदतीच्या या योजना असतात.
या योजना एक ते दोन दिवसांसाठी खुल्या होतात. श्रीमंत गुंतवणूकदार (High Networth Indivisuals), मोठी रोकड असलेल्या कंपन्या, बँका यात गुंतवणूक करतात. पुष्कळदा म्युच्युअल फंड एखाद्या मोठय़ा ग्राहकाच्या गरजा लक्षात घेऊनसुद्धा एखादी खास योजना सुरू करतात. एखादा ग्राहक (माहिती तंत्रज्ञानातील कंपन्या) एखाद्या योजनेत ५००-१००० कोटी गुंतवितो. मग त्याच्या गरजेनुसार योजनेचा कालावधी ठरविला जातो. परंतु बहुसंख्य योजना या ३६६ दिवसांहून थोडय़ा अधिक कालावधीच्या असतात. त्यामुळे या योजनांत लहान गुंतवणूकदारांचा सहभाग कमी असतो. एखाद्या विशिष्ट योजनेतून म्युच्युअल फंडांनी गोळा केलेल्या निधीपैकी ९०-९५% रक्कम योजनेच्या मुदतीशी जुळणाऱ्या रोख्यांत गुंतविले जातात. ४-५% रक्कम अल्प मुदतीसाठी कॉलमनीमध्ये गुंतविली जाते. गुंतवणुकीच्या वेळी परताव्याचा अंदाज त्या वेळच्या रोख्यांच्या परताव्याच्या दारावर ठरत असतो. बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा ही गुंतवणूक कर कार्यक्षम असते. आजच्या अंदाजानुसार एक वर्ष मुदतीच्या रोख्यांवर परताव्याचा दर ९.८-१०% दरम्यान आहे. ही गुंतवणूक एका वर्षांपेक्षा अधिक मुदतीची असल्यामुळे गुंतवणुकीवरच्या फायद्यावर भरावा लागणारा कर कमी होतो तसेच या योजनेची राष्ट्रीय शेअर बाजारात नोंद होते.

एफएमपी काय आहेत?
कोणत्याही गुंतवणुकीवर निश्चित स्वरूपाचा परतावा हवा असेल, तर आपल्यासमोर बँकांमधील ठेवी हाच एक पारंपरिक आणि अर्थात सहजसाध्य पर्याय पुढे येतो; परंतु सुरक्षितता आणि निश्चित परताव्याच्या दृष्टीने ‘फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स- एफएमपी’ हाही एक उत्तम पर्याय आहे. नावाप्रमाणे या स्थिर कालावधीच्या योजना आहेत. बँकांच्या ठेव योजनांशी मिळत्याजुळत्या परंतु म्युच्युअल फंडांनी सादर केलेल्या योजना आहेत; परंतु बँक ठेवींसारख्या निश्चित परतावा मात्र त्या देत नाहीत. म्युच्युअल फंडांच्या डेट योजनांचा हा एक मुदतबंद प्रकार आहे. म्हणजे एफएमपी योजनांतील परतावा हा योजनेच्या ठरलेल्या मुदतीपर्यंत कुलूपबंद असतो. परंतु बँक ठेवींच्या तुलनेत ‘एफएमपी’चे करविषयक फायद्यांचे पारडे निश्चितच सरस ठरते. म्हणूनच कौटुंबिक खर्च, कर्जाचे हप्ते आणि तातडीची आर्थिक उद्दिष्टे वगळता काही पुंजी शिल्लक असलेल्या आणि पुढील वर्षभराच्या कालावधीत तिची गरज पडणार नसल्यास ती रक्कम त्यांनी ‘एफएमपी’मध्ये गुंतविणे सद्यस्थितीत फायद्याचे ठरेल.