|| जुईली बल्लाळ / डॉ. वरदराज बापट

भाऊबंदकी हा जणू मानवजातीला लागलेला शाप आहे. राजकारण असो वा उद्योगधंदा त्याची झळ जणू हमखास लागत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भाऊबंदकीच्या या मांदियाळीत काही वर्षांपूर्वी स्थान मिळवले होते ते अंबानी बंधूंनी. फरक इतकाच की धीरुभाई अंबानींच्या या वारसदारांवर भारतीय कुटुंब व्यवस्थेचे संस्कार असल्यामुळे भावांमधील वादाचा भडका तूर्तास शमला आहे. अलीकडेच मोठा भाऊ मुकेश अंबानी यांनी धाकटे बंधू अनिल यांची पावणेसहाशे कोटींची देणी भागविली. हे दोघेही अनुक्रमे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स कम्युनिकेशनचा कारभार हाकत आहेत. अंबानी बंधूंच्या तंटय़ामुळे कौटुंबिक व्यवसायात असे बखेडे कालौघात अपरिहार्यच की काय हा अभ्यासकांसाठी संशोधनाचा विषय बनलेला दिसत आहे.

या भांडणांचा अंत नेमका कसा होतो, त्यांचा व्यवसायावर कोणता परिणाम होतो आणि व्यावसायिक संबंधातील संस्था किंवा व्यक्ती किंवा अगदी ग्राहक ते सर्वसामान्य माणसे या झगडय़ांकडे कसे पाहतात हेही कुतूहलाचा विषय बनतात.

जगभरात इतरत्र या संबंधाने अनुभव काय तेही पाहू. आज आदिदास आणि पुमा हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ब्रॅण्ड असून यांची सुरुवात १९२४ मध्ये डॅसलर बंधूंनी त्यांची आई जर्मनीमधील एका छोटय़ा गावात चालवत असलेल्या लाँड्रीतून केली. अ‍ॅडॉल्फ आणि रुडॉल्फ ही ख्रिस्तोफर डॅसलर यांची अपत्ये. दोघांची व्यक्तिमत्त्व मात्र भिन्न. त्यामुळेच की काय त्यांचे व्यावसायिकदृष्टय़ा जुळले नाही. रक्ताच्या नात्यांतही वैचारिक असे सूक्ष्म फरक असू शकतात आणि त्याचे असे दूरगामी परिणाम होऊ शकतात. मूळ कंपनी रौप्यमहोत्सवात पदार्पण करण्याच्या बेतात असताना तिच्यात उभी फूट पडावी हा दुर्दैवी योगायोग. अर्थात या दोघांनी लगेचच आदिदास आणि पुमा असे दोन स्वतंत्र नाममुद्रा आणून कौटुंबिक उद्योगाचा वारसा पुढे सुरू ठेवला.

गुचीची स्थापना इटलीमध्ये १९०६ मध्ये गुसिओ गुची यांनी केली. त्यांना दोन मुले. अल्डो आणि रोडोल्फ. वडिलांकडून व्यवसायाची धुरा या दोघांनी स्वीकारली, कालांतराने त्यांच्यातही मतभेद झाले आणि पुढे समेटही झाला. कुटुंबाचा विस्तार होत गेला की रक्त एक असले तरी ते पातळ होत जात असावे. सख्खे भाऊही भिन्न स्वभावाचे असू शकतात. त्यांचा विचार करण्याची पद्धत, त्यांची व्यक्तिमत्त्व आदींचा निर्णयांवर परिणाम होऊ लागतो. गुचीच्या बाबतीत नेमके असेच घडले आणि आज आडनाव सोडल्यास कुटुंबातील एकही सदस्य व्यवसायाशी संबंधित नाही.

भारतात भाऊबंदकीची असंख्य उदाहरणे सापडतील. परंतु धीरजलाल हिराचंद अंबानी, ऊर्फ धीरुभाई अंबानी यांच्या कुटुंबातील भांडण चच्रेचा विषय बनले. धीरुभाईंनी १९६६ मध्ये रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली आणि पॉलिएस्टर धाग्याची निर्मिती सुरू केली. कालांतराने त्यांच्या धडाडीला बरेच धुमारे फुटले आणि रिलायन्सने पेट्रोलियम रिफायनरी, पॉवर, वित्तीय सेवा आदी क्षेत्रांत पदार्पण केले. १९७७ साली रिलायन्सचा समभाग बाजारात आला आणि भागधारकांनी अंबानींना अक्षरश: डोक्यावर घेतले. पुढील २५ वर्षे प्रचंड भरभराट अनुभवणाऱ्या रिलायन्सचे ब्रीदवाक्य होते, ‘ग्रोथ इज लाइफ’ आणि ते धीरुभाईंनी सार्थक करून दाखवले होते. २००२ साली त्यांचे निधन झाले आणि साहजिकच मुकेश आणि अनिल यांच्या हाती रिलायन्स साम्राज्याची धुरा आली. एकत्र निर्णय घेण्यासाठी लागणारे एकमत त्यांच्यापाशी नसावे. अवघ्या तीन वर्षांत रिलायन्सचे विभाजन झाले.

मुकेश आणि अनिल अंबानी यांच्याकडे प्रत्येकी तीस टक्के हिस्सा, तर मातोश्री कोकिलाबेन यांच्याकडे ४० टक्के हिस्सा असे रिलायन्स समूहाचे आर्थिक वाटप होते. विभागणीनंतर मुकेश यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि इंडियन पेट्रोकेमिकल कार्पोरेशन लि. हे पारंपरिक उद्योग आले तर अनिल यांच्या वाटय़ाला रिलायन्स इन्फोकॉम, रिलायन्स कॅपिटल आणि रिलायन्स एनर्जी हे अपारंपरिक उद्योग आले. मुकेश यांची भरभराट सुरू होती पण अनिल यांच्या ताब्यातील उद्योगांना अपेक्षित यश लाभले नाही आणि ते आर्थिक संकटात अडकू लागले. एकाच घरात जन्माला आलेल्या दोघा भावांना नियतीच्या दुजाभावाचा कटू अनुभव आला.

विभागणीच्या जेमतेम वर्ष दीड वर्षांत मुकेश आणि अनिल अंबानी हे फोर्ब्स इंडियाच्या सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत (२००७) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. ११ वर्षांनंतर म्हणजेच २०१८च्या फोर्ब्सच्या यादीत मुकेश पहिल्या क्रमांकावर तर अनिल यांचा क्रमांक ६८ वर घसरला.

अत्यंत सुस्थितीत असलेल्या इमारतीची अचानक धोकादायक म्हणून घोषणा होणे हे जसे आश्चर्यकारक असते तसाच काहीसा प्रकार धीरुभाईंनी बांधलेल्या भरभक्कम रिलायन्सच्या वास्तूबद्दल झाले. अनिल अंबानी यांची अधोगती नेमक्या कोणत्या टप्प्यावर झाली, याबाबत अनेक कारणे पुढे केली जात आहेत. त्यापकी सर्वात मोठे कारण हे आरकॉम अर्थात रिलायन्स कम्युनिकेशनची अधोगती मानले जाते. अनिल यांनी त्यांच्या वाटय़ाला आलेल्या संपत्तीपकी ६६ टक्के गुंतवणूक काहीशी नव्या आणि अपारंपरिक क्षेत्रात घातली. या क्षेत्राच्या प्रगतीचा अंदाज चुकला आणि सारी स्वप्ने कालांतराने धुळीस मिळू लागली. जी आरकॉम २०१० मध्ये देशातील १७ टक्के दूरसंचार धंद्यावर हक्क सांगून दुसऱ्या क्रमांकावर होती तिचाच २०१७ साली बाजारहिस्सा जेमतेम ५.२० टक्क्यांवर आला. याच काळात मुकेश अंबानी यांच्या जिओचे धुमधडाक्यात पदार्पण झाले आणि दोघा भावांचा प्रवास उलटय़ा दिशेने सुरू झाल्याचे आपण पाहिले.

आरकॉमच्या पडझडीचे विश्लेषण करताना प्रामुख्याने पाच मुद्दे त्यास कारणीभूत असल्याचे दिसून येते- १) दूरसंचार बाजारपेठेतील घटता प्रभाव २) कालानुरूप तंत्रज्ञानात बदल न करणे ३) खेळत्या भांडवलाची कमतरता ४) वाढणारे कर्ज आणि दायित्व तसेच ५) रिलायन्स जिओचे पदार्पण. दूरसंचार क्षेत्रात स्थान टिकवायचे तर दुहेरी व्यूहरचनेचा अवलंब करावा लागतो. ग्राहकांना अपेक्षित वेगवान आणि आधुनिक सुविधायुक्त सेवा पुरवणे आणि दुसरे म्हणजे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कल्पकतेचे प्रयोग करणे. मोठे बंधू मुकेश यांनी ४जी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. मात्र अनिल काळाची पावले ओळखू शकले नाहीत. परंतु दोघा भावांचे रक्त एक असले तरी त्यांच्या दृष्टीतले हे अंतर स्पष्ट झाले होते. वाढती स्पर्धा, नवीन तंत्रज्ञानासाठी लागणारी गुंतवणूक आणि बाजारात मिळवलेले अव्वल स्थान टिकवण्याचे दडपण या सर्व बाबींमुळे अनिल यांना मोठय़ा प्रमाणात कर्जाची उभारणी करावी लागली. नेमका इथेच त्यांचा कणा मोडायला सुरुवात झाली. कारण निगेटिव्ह कॅश-फ्लो आणि गुंतवणूक यांचे गणित जमणे शक्यच नव्हते. १२ वर्षांत कर्जाचा डोंगर ४५ हजार कोटींचा झाला. धंद्यातले प्राथमिक सिद्धांत पाळण्याचे धीरुभाईंच्या धाकटय़ा पातीस सुचले नाही. नफ्यातील काही भाग धंद्यात आणून पुढे जाण्याचा मार्ग निवडण्याऐवजी कर्जाचे साहाय्य घेणे त्यांनी पसंत केले आणि एका प्रकारे स्वत:साठी एक मोठा खड्डाच त्यांनी खणून ठेवला!

बघता बघता २५ हजार कोटींचे कर्ज (२००९-१०) हे ४५ हजार कोटी (२०१८-१९) झाले. घटता नफा आणि वाढणारे कर्ज यामुळे अनिल हे कर्ज सापळ्यात अडकले. अनिल यांच्यावर पूर्ण खापर फोडणे हेही अन्यायकारक ठरू शकते. मुळातच जिथे नफ्याचे प्रमाण रिलायन्स समूहाच्या अन्य उद्योगांपेक्षा कमी असताना त्यांच्याकडून मुकेश यांच्यासारखी कामगिरी अपेक्षिणे चुकीचे होते. पुढे त्यांच्या कुवतीबाबत उपस्थित असलेले प्रश्न ही त्यांची शोकांतिका ठरू शकते. धीरुभाईंच्या निधनानंतर जेव्हा दोन भावांमध्ये संपत्तीचे आणि उद्योगधंद्याचे वाटप झाले. तेव्हा हे दोघे पुढील दहा वर्षे एकमेकांशी स्पर्धा करणार नाहीत अशी अट घालण्यात आली होती. हा कालावधी संपताच मुकेश समूहाकडून जिओच्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्र काबीज केले गेले.

आज धाकटय़ा भावाच्या मदतीला जाऊन मुकेश यांनी व्यवसायातील परिपक्वता सिद्ध केली आहे. राजकारणात कोण मोठा भाऊ, कोण छोटा यावरून वाद रंगत असल्याचे आपण पहिले. परंतु अर्थकारणात राजकारणाप्रमाणे भांडणांना फारसे स्थान मिळत नाही. मुकेश आणि अनिल अंबानी यापुढे काय पावले उचलतात याकडे सर्वाचे लक्ष असेल. अनिल अंबानी समूहाकडे, रिलायन्स डिफेन्ससारखे डार्क हॉर्स आहेत त्यामुळे अनिल पुन्हा उसळी मारू शकतात.