विद्याधर अनास्कर

जेम्स टेलर जरी रिझव्‍‌र्ह बँकेचे दुसरे गव्हर्नर होते तरी भारतीय चलन म्हणजे  नोटांवर गव्हर्नर म्हणून त्यांचीच पहिल्यांदा स्वाक्षरी होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिझव्‍‌र्ह बँकेतील भारतीय अधिकाऱ्यांवर व त्यांच्या कार्यक्षमतेवर टेलर यांचा अधिक विश्वास होता. भारतीय स्वातंत्र्याची चाहूल लागल्याने असेल पण रिझव्‍‌र्ह बँकेमधील महत्त्वाच्या पदांवर भारतीयांची शिफारस करत त्यांचीच वर्णी कशी लागेल हेही त्यांनी पाहिले.

Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
dubai five year multiple entry visa
विश्लेषण : दुबईने भारतीय पर्यटकांना पाच वर्षांसाठी ‘मल्टीपल एंट्री व्हिजा’ देण्याची घोषणा का केली? याचा भारतीयांना कसा फायदा होईल?
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?
devendra fadnavis veer savarkar
स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर ‘बॅरिस्टर’ पदवी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस करणार केंद्राला विनंती!

ओसबर्न स्मिथ यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी नेमावयाच्या दुसऱ्या गव्हर्नरांसाठी ब्रिटिश सरकारला जास्त त्रास पडला नाही. कारण ओसबर्न यांच्या रजेच्या काळात ज्यांनी अनेक वेळा प्रभारी गव्हर्नरपदाची जबाबदारी सांभळली होती, ज्यांनी सरकारमध्ये बरीच वर्षे काम केले होते व रिझव्‍‌र्ह बँक विधेयक तयार करण्यात ज्यांनी मोलाची भूमिका बजावली होती ते डेप्युटी गव्हर्नर जेम्स टेलर हे गव्हर्नर पदासाठी नैसर्गिक दावेदार असल्यानेच सरकारने १ जुलै १९३७ रोजी त्यांची रिझव्‍‌र्ह बँकेचे दुसरे गव्हर्नर म्हणून नेमणूक केली. जेम्स टेलर यांची कागदोपत्री नेमणूक जरी १ जुलै १९३७ रोजी झाली असली तरी ओसबर्न यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना दिलेल्या आठ महिन्यांच्या रजेच्या काळात म्हणजे नोव्हेंबर १९३६ पासूनच जेम्स टेलर यांनी प्रभारी गव्हर्नर या नात्याने रिझव्‍‌र्ह बँकेचा कारभार पाहण्यास सुरुवात केली होती. जेम्स टेलर यांच्या नेमणुकीने सरकारसह सर्वानीच सुटकेचा नि:श्वास टाकला होता. ओसबर्न यांच्या काळात, पदाधिकाऱ्यांमधील टोकाच्या भांडणामुळे रिझव्‍‌र्ह बँकेचे तत्कालीन कामकाज अत्यंत तणावपूर्ण वातावरणात होत होते. हा वाद किती टोकाचा होता याचे उदाहरण द्यायचे झाल्यास, ओसबर्न यांच्या रजेच्या काळात प्रभारी म्हणून काम पाहणाऱ्या जेम्स टेलर यांनी, ओसबर्न पुनश्च पदावर रुजू होण्यासाठी आल्यास, राजीनामा देण्याची धमकी दिली होती. जर जेम्स टेलर यांनी राजीनामा दिल्यास वित्त सदस्य ग्रिग यांनीही राजीनामा देण्याची धमकी दिली होती. ओसबर्न यांनी या द्वयींविरुद्धचा राग व्यक्त करताना एका पत्रामध्ये ‘या दोघांच्या थोबाडीत मारलेले मला खूप आवडेल’ असे लिहून आपल्या रागाला मोकळी वाट करून दिली होती.

परंतु जेम्स टेलर यांच्या काळातील परिस्थिती नेमकी उलटी होती. जेम्स टेलर व वित्त सदस्य यांच्यामधील गाढ मत्रीमुळे उभयतांमध्ये सामंजस्य होते. रिझव्‍‌र्ह बँकेत येण्यापूर्वी त्यांनी सरकारच्या अनेक विभागांमधून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. त्यामध्ये चलन विभागात डेप्युटी कंट्रोलर, त्यानंतर त्याच विभागाचे कंट्रोलर, वित्त विभागामध्ये अ‍ॅडिशनल सेक्रेटरी, यामुळे सरकारमधील सर्वच अधिकाऱ्यांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. ब्रिटिश मुलकी परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले टेलर हे मुळातच हुशार होते. ते जरी रिझव्‍‌र्ह बँकेचे दुसरे गव्हर्नर होते तरी भारतीय चलनातील रुपयांवर गव्हर्नर म्हणून त्यांचीच स्वाक्षरी प्रथम होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिझव्‍‌र्ह बँकेतील भारतीय अधिकाऱ्यांवर व त्यांच्या कार्यक्षमतेवर जेम्स टेलर यांचा अधिक विश्वास होता. भारतीय स्वातंत्र्याची चाहूल लागलेल्या जेम्स टेलर यांनी रिझव्‍‌र्ह बँकेमधील महत्त्वाच्या पदांवर भारतीयांची शिफारस करत त्यांचीच वर्णी कशी लागेल हे पाहिल्याने त्यावेळी रिझव्‍‌र्ह बँकेत भारतीयांचाच बोलबाला होता. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यपूर्व काळातच रिझव्‍‌र्ह बँकेचे भारतीयीकरण करण्यात जेम्स टेलर यांचा महत्त्वाचा वाटा होता.

जेम्स टेलर यांची गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यामुळे रिकाम्या झालेल्या डेप्युटी गव्हर्नरच्या जागेवर पूर्वी ठरल्याप्रमाणे युरोपीयन व्यक्तीची निवड होणे आवश्यक होते. त्यानुसार ब्रिटिश सरकारकडून युरोपीयन व्यक्तीचा शोधही सुरू करण्यात आला. परंतु जेम्स टेलर यांना युरोपीयन डेप्युटी गव्हर्नर नको होता. त्यासाठी वरकरणी युरोपीयन व्यक्तीची निवड करण्यासाठी प्रयत्न करत आहोत अशी वातावरणनिर्मिती जरी केली तरी प्रत्यक्षात मात्र अशी निवड होणार नाही याचीच खबरदारी त्यांनी घेतल्याचे दिसून येते. ब्रिटिश व्हॉइसरॉय यांनी या पदासाठी योग्य अशा युरोपीयन व्यक्तीची शिफारस करण्याची विनंती बँक ऑफ स्कॉटलंडच्या अध्यक्षांना केली. सरकारच्या अपेक्षेनुसार या पदासाठी त्यांना ३५ ते ४० या वयोगटातील बँकिंगचे पूर्णत: ज्ञान असलेली व उच्च शिक्षण प्राप्त केलेली युरोपीयन व्यक्ती हवी होती. परंतु स्कॉटलंड बँकेच्या अध्यक्षांनाही अशी व्यक्ती सुचविण्यात अपयश आल्याने १९३७ मध्ये केंद्रीय समितीला जेम्स टेलर यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांच्या लंडन भेटीमध्ये या पदासाठी सुचविलेल्या पाच युरोपीयन व्यक्तींपैकी त्यांना कोणीही योग्य आढळला नसल्याचे नमूद केले. यामुळे पुढील तब्बल चार वर्षे त्यांनी दुसऱ्या डेप्युटी गव्हर्नरची जागा रिक्त ठेवत केवळ एकाच भारतीय डेप्युटी गव्हर्नरांसोबत म्हणजेच मणिलाल नानावटी यांच्यावरच विश्वास दाखवत कामकाज चालविले. नानावटी यांनी देखील आपल्या कर्तृत्वाने त्यांच्यावरील विश्वास सार्थ ठरविला.

अशा प्रकारे दुसऱ्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी युरोपीयन व्यक्तीचा शोध सुरू असतानाच तोपर्यंत स्वत:च्या मदतीसाठी काही साहाय्यकांची गरज असल्याचे जेम्स टेलर यांनी सरकारला कळविले. त्यानुसार प्रथम त्यांनी पंजाब सरकारचे आर्थिक सल्लागार आर. के मदन या भारतीय अधिकाऱ्याची रिसर्च विभागाचे संचालक म्हणून नेमणूक केली. त्यानंतर या विभागाची व्याप्ती वाढवत त्यांनी जे. व्ही. जोशी या भारतीय अधिकाऱ्याची पूर्णवेळ आर्थिक सल्लागार म्हणून वर्णी लावली. मदन व जोशी हे दोघेही पुढे स्वातंत्र्योत्तर काळात रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर झाले. मदन व जोशी यांच्या पाठोपाठ नानावटी यांचे सहकारी जे. जे. अंजारिया (जे पुढे १९६७ मध्ये डेप्युटी गव्हर्नर झाले) यांनाही रिझव्‍‌र्ह बँकेच्या सेवेत घेत, जेम्स टेलर यांनी रिझव्‍‌र्ह बँकेचे भारतीयीकरण स्वातंत्र्यपूर्व काळातच करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली हे मान्य करावे लागेल.

या पार्श्वभूमीवर सरकारकडून अशी शंका उपस्थित करण्यात आली की, भविष्यात जर जेम्स टेलर आजारी पडले अथवा काही कारणास्तव त्यांना दीर्घ रजेवर जावे लागले तर त्यांची जागा कोण घेणार?

अशा परिस्थितीत युरोपीयन डेप्युटी गव्हर्नरचा शोध लागेपर्यंत सरकारतर्फे एखाद्या संपर्क अधिकाऱ्याची (Liaison Officer) नेमणूक करण्याचा प्रस्ताव पुढे आला. अशा अधिकाऱ्याच्या नेमणुकीमुळे भारत सरकार, ब्रिटिश सरकार, बँक ऑफ इंग्लंड व रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक मंडळात योग्य तो समन्वय राखला जाऊन रिझव्‍‌र्ह बँकेच्या घडामोडींवर सरकारला लक्ष ठेवणे सोपे जाईल. या पदासाठी ब्रिटिश सरकारच्या मते इम्पिरीयल बँकेतील अनुभवी व्यक्ती ही सर्वात योग्य निवड ठरली असती.

परंतु भारतीयत्वाकडे झुकलेल्या जेम्स टेलर यांच्या मनात दुसरेच होते. भारतीय मुलकी सेवेतील (आयसीएस) परीक्षेमध्ये १९१८ मध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या चिंतामणराव देशमुख यांची शिफारस त्यांनी संपर्क अधिकारी या पदासाठी केली. जुलै १९३९ मध्ये प्रथम देशमुख यांची नेमणूक केंद्रीय संचालक मंडळात सरकारी प्रतिनिधी म्हणून झाली. तत्पूर्वी देशमुख यांनी सरकारमध्ये अवर सचिव, उपायुक्त, तडजोड आयुक्त, पहिल्या गोलमेज परिषदेचे सेक्रेटरी जनरल, वित्त विभागाचे सचिव, भारत सरकारचे शिक्षण व आरोग्य विभागाचे जॉइंट सेक्रेटरी इ. महत्त्वाच्या पदांवर उत्तम कामगिरी केल्याने रिझव्‍‌र्ह बँक व सरकार यांच्यामधील दुवा म्हणून चिंतामणराव देशमुख यांच्या नावाला जेम्स टेलर यांनी पसंती दिली. अशा प्रकारे चिंतामणराव देशमुख यांचा प्रवेश रिझव्‍‌र्ह बँकेत झाला. प्रत्यक्षात जरी त्यांची नेमणूक डेप्युटी गव्हर्नर म्हणून झालेली नसली तरी त्या रिक्त जागेवर पर्याय म्हणूनच सदर नेमणूक असल्याने नानावटी निवृत्त झाल्यावर त्यांच्याजागी डेप्युटी गव्हर्नर म्हणून अधिकृतपणे नेमणूक होईपर्यंत चिंतामणराव देशमुख हे डेप्युटी गव्हर्नर पदाचा सर्व कारभार सांभाळत होते. बँकेच्या कृषी पतपुरवठा विभागाचे प्रमुख म्हणून आंबेगावकर काम पाहत होतेच.

अशा प्रकारे रिझव्‍‌र्ह बँकेचे स्वातंत्र्यपूर्व काळातच भारतीयीकरण करणाऱ्या जेम्स टेलर यांच्याबद्दल सर्वच भारतीयांमध्ये कमालीची आस्था असल्याने ३० जून १९४२ रोजी त्यांची पाच वर्षांची मुदत संपल्यानंतरही त्यांना पुनश्च पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात ब्रिटिश सरकारला कोणतीही अडचण आली नाही. जेम्स टेलर व देशमुख यांचे संबंध इतके सौहार्दपूर्ण होते की, देशमुख यांना राष्ट्रीय बँकिंगचा अनुभव मिळावा म्हणून सतत त्यांचा संबंध बँक ऑफ इंग्लंडशी कसा येईल याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले. अशा प्रकारे रिझव्‍‌र्ह बँकेच्या भारतीयकरणाचा पाया नानावटी यांनी रचला तर मार्ग जेम्स टेलर यांनी तयार केला असे नमूद केल्यास वावगे होणार नाही.  (क्रमश:)