|| अनुराधा सहस्रबुद्धे

अनुराधा परांजपे (४२) यांची आणि माझी ओळख ‘लोकसत्ता अर्थ वृत्तांत’मुळे झाली. या वर्षांच्या सुरुवातीचे दोन लेख प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी संपर्क साधला. नंतर फोनवर बोलणे झाले आणि शेवटी भेट झाली.

पदवी प्राप्त केल्यानंतर दापोलीच्या शाळेत त्यांना अस्थायी स्वरूपाची साहाय्यक शिक्षिका म्हणून नोकरीची संधी मिळाली. जेमतेम सहा महिने शाळेत शिकविले नाही तोच लग्न ठरले. लग्नानंतर मुंबईत आल्यावर बीएडला प्रवेश घेण्याआधीच दिवस गेले. पुढील काही वर्षे मुलाचे संगोपन करण्यात गेली. दरम्यानच्या काळात मुलांचे संगोपन सांभाळून राष्ट्रीयीकृत विमा कंपनीसाठी वितरक म्हणून काही दिवस काम केले. मुले मोठी झाल्यावर अर्थार्जनासाठी खाद्य पदार्थाचे दुकान, दुधाचे वितरण इत्यादी पर्याय अजमावून पाहिले. मागील चार वर्षांपासून पोळी-भाजीचा डबा, नाश्ता, संध्याकाळी खाण्याचे पदार्थ, रात्रीचे जेवण इत्यादींचा पुरवठा महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या करीत आहेत. सध्या चार पैसे शिल्लक पडत आहेत. या शिल्लक रकमेचे नेमके काय करावे असा प्रश्न त्यांना पडला होता. या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यांनी वित्तीय नियोजकाचे साहाय्य घेण्याचे ठरविले.

वित्तीय नियोजकाचा सल्ला : मृत्यूइतकी शाश्वत घटना मनुष्याच्या जीवनात नसते. म्हणून या जगाला मृत्युलोक म्हणतात. सामान्य माणूस सहजासहजी मृत्यूला विसरत नाही. तरीसुद्धा माणूस अहंपणा आयुष्यभर सोडत नाही. समर्थ रामदास १५व्या मनाच्या श्लोकात म्हणतात,

चिरंजीव हे सर्वही मानिताती।

अकस्मात सांडूनिया सर्व जाती।।

मृत्यू निश्चित असला तरी मृत्यूची वेळ अनिश्चित असल्याने हयात असेपर्यंत सध्याच्या जीवनशैलीशी तडजोड करावी न लागता पुरेल इतपत पशाची तजवीज करणे आवश्यक आहे. अनुराधा परांजपे यांच्या सर्व दृश्य वित्तीय ध्येयांच्या पूर्ततेसाठी तजवीज झाली असल्याने त्यांना त्यांच्या जवळच्या शिल्लक रकमेचे नेमके काय करावे हा प्रश्न पडला आहे. ज्यावेळेला असा प्रश्न पडतो त्यावेळी रोकड सुलभता आणि गुंतवणुकीसाठी अशा साधनांची निवड करावी ज्यांचा परताव्याचा दर महागाईपेक्षा अधिक असेल.

  • अपघाती विमा : अपघातामुळे मृत्यू किंवा कायम अपंगत्व आल्यास वैयक्तिक अपघाती विमा पॉलिसीधारकास त्याच्या विमा छत्राइतकी नुकसान भरपाई मिळू शकते. विमाधारकास दुर्घटनेपासून कुटुंबास आर्थिक संरक्षण देण्याचा हा पर्याय आहे. वैयक्तिक अपघाती विमा पॉलीसीधारकास विमा हप्त्यात कुटुंबाला संरक्षण देण्याचा हा पर्याय असल्याने तुम्हाला एका विश्वासू विमा कंपनीकडून वैयक्तिक अपघाती विमा पॉलिसी खरेदी करण्याची शिफारस करीत आहे.
  • आरोग्य विमा : सध्याचा तुमचा आरोग्य विमा पुरेसा नाही किमान १० लाखाचे विमा छत्र असलेला आरोग्य विमा खरेदी करावा.
  • गुंतवणूक : सध्याची तुमची जीवनशैली पाहता एका माणसाचा महिन्याचा खर्च १० हजार गृहीत धरला आहे. सोबत दिलेल्या तपशिलानुसार तुमच्या वयाच्या ६०व्या वर्षी हाच खर्च महिन्याला ४० हजार झालेला असेल. पुढील १८ वर्षांत महागाई आणि व्याजाचे दर कमी झाल्याने गुंतवणुकीवरील परताव्याचा दरसुद्धा कमी होईल.

वित्तीय नियोजनात रोकड सुलभता महत्त्वाची असते. तुम्ही आजपर्यंत पीपीएफ, विमा पॉलिसी ही निवडलेली गुंतवणूक साधने रोकडसुलभ नाहीत. कोणत्याही मालमत्तेत तिची किंमत प्रभावित केल्याशिवाय त्वरित रोकडीत रूपांतर करण्याच्या क्षमतेवरून त्या गुंतवणूक साधनाची रोकडसुलभता ठरते. बचत खात्यातील रोख रक्कम बँकेच्या मुदत ठेवी, या सर्वाधिक रोकडसुलभ असलेल्या तर विमा पॉलिसी, स्थावर मालमत्ता ही सर्वात कमी रोकडसुलभ गुंतवणूक साधने आहेत. भौतिक साधनांपेक्षा अभौतिक वित्तीय साधने अधिक रोकडसुलभ असतात. तुमच्या एकत्रित पोर्टफोलिओचा विचार केल्यास तुमची रोकडसुलभता केवळ १५ टक्के आहे. एखादी मालमत्ता खरेदी करण्यासाठी किंवा एखाद्या मनाजोगत्या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी किंवा अनपेक्षित खर्चाची निकड भागविण्यासाठी तुमच्या मालमत्तेचे रोकडीत रूपांतर करण्याची क्षमता अतिशय कमी आहे. अशा परिस्थितीत भविष्यातील नवीन गुंतवणुका या रोकडसुलभ असायलाच हव्यात. भविष्यातील गुंतवणुकीसाठी ५० टक्के रोखे गुंतवणूक करणारे आणि ५० टक्के समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडाची निवड करण्याची शिफारस करीत आहे.

(लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आहेत, akswealth@gmail.com ई-मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल)