प्रवीण देशपांडे

आर्थिक वर्ष २०१९-२०चा (कर निर्धारण वर्ष २०२०-२१) अग्रिम कराचा तिसरा हप्ता भरण्याची वेळ आली आहे. हा हप्ता भरण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०१९ ही आहे.

अग्रिम कर कोणी भरावयाचा आहे :

ज्या करदात्यांचे अंदाजित करदायित्व १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात. ज्या करदात्याच्या उत्पन्नातून उद्गम कर (टीडीएस) कापला जातो अशा करदात्यांना अग्रिम कराच्या तरतुदीसाठी अंदाजित करदायित्व गणतांना उत्पन्नावरील उद्गम कर  अर्थात टीडीएस वजा केल्यानंतर देय कर १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर अग्रिम कर भरावा लागतो.

अग्रिम कराचा पहिला हप्ता कोणी भरावयाचा नाही :

१) निवासी ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नाही, अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होत नाहीत. (२) करदाता अनुमानित कराच्या योजनेचा लाभ घेणार असेल, म्हणजेच ‘कलम ४४ एडी किंवा ‘कलम ४४ एडीए’नुसार अनुमानित कर भरण्यासाठी पात्र असेल आणि या कलमांतर्गत कर भरत असेल तर अशा करदात्यांना १०० टक्के देय कर १५ मार्चपूर्वी भरावा लागेल, पहिल्या तीन हप्त्यात त्यांना अग्रिम कर भरावा लागत नाही.

अग्रिम कर कसा गणावा आणि किती भरावा :

करदात्याने २०१९-२० या आर्थिक वर्षांत अंदाजित उत्पन्नाचा आढावा घेऊन, त्या उत्पन्नातून प्राप्तिकर कायद्याप्रमाणे मिळणाऱ्या वजावटी (गृहकर्ज, कलम ८० सी वगैरे) विचारात घेऊन बाकी उत्पन्नावर एकूण किती कर भरावा लागेल याची गणना करावी या रकमेतून उद्गम कर वजा करावा आणि बाकी कर हा अग्रिम कराच्या रूपाने भरावा.

करदात्यांनी अग्रिम कराचे पहिले दोन हप्ते, [एकूण अंदाजित कराच्या (उद्गम कर वजा जाता) एकूण ४५ टक्के इतका कर] भरले असतीलच आणि आता हा तिसरा हप्ता १५ डिसेंबरपूर्वी एकूण अंदाजित कराच्या ७५ टक्के इतका कररूपाने भरावयाचा आहे.

उदाहरणार्थ, एखाद्या करदात्याचे अंदाजित करदायित्व (उद्गम कर वजा जाता) २०,००० रुपये आहे तर या करदात्याने १५ डिसेंबर २०१९ पूर्वी एकूण १५,००० रुपये इतका कर भरला पाहिजे. त्याने पहिले दोन हप्ते एकूण १०,००० रुपये भरले असतील तर आता १५ डिसेंबरपूर्वी त्याला ५,००० रुपये अग्रिम कर भरावा लागेल. करदात्याला नियमित उत्पन्नाव्यतिरिक्त काही उत्पन्न अग्रिम कराचा हा हफ्ता भरल्यानंतर मिळाले असेल, (उदाहरणार्थ, भांडवली नफा, करपात्र भेट वगैरे) तर असे उत्पन्न अग्रिम कराचा पुढील हप्ता भरताना विचारात घ्यावे.

अग्रिम कर कसा भरावा :

अग्रिम कर ऑनलाइन किंवा बँकेत चलन देऊन भरता येतो, यासाठी २८० क्रमांकाचे चलन वापरावे.

* अग्रिम कर न भरल्यास, कमी किंवा उशिरा भरल्यास : अग्रिम कर न भरल्यास, कमी भरल्यास किंवा मुदतीनंतर भरल्यास व्याज भरावे लागते.

* अग्रिम कर जास्त भरल्यास : अग्रिम कर जास्त भरल्यास विवरणपत्र भरून कर परताव्याचा (रिफंड) दावा करता येतो.

ल्ल लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेल pravin3966@rediffmail.com वर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.