अजय वाळिंबे

गेल्या काही वर्षांत आरोग्य आणि आरोग्यविषयक सेवा यांचे महत्त्व मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. साहजिकच वैद्यकीय चाचण्या आणि इतर वैद्यकीय सेवा यांचेही महत्त्व वाढले आहे. भारताची लोकसंख्या तसेच आरोग्य व फिटनेसविषयक जनजागृती पाहता प्रिव्हेंटिव्ह डायग्नोसिसचे महत्त्व वाढले आहे. साहजिकच विविध पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीजची गरज मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. आज सुचविलेली ‘थायरोकेअर टेक्नॉलॉजीज’ ही भारताची पहिली पूर्णपणे स्वयंचलित निदान प्रयोगशाळा आहे. ज्यायोगे भारत आणि इतर देशांमधील प्रयोगशाळांना आणि रुग्णालयांना परवडणाऱ्या किमतीवर गुणवत्ता उपलब्ध करून दिली जाते.

मुंबईसारख्या मोठय़ा शहरांमध्ये मोठय़ा आणि गहन चाचण्यांसाठी थायरोकेअरची नवी मुंबई येथे पूर्ण स्वयंचलित सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग लॅबॉरेटरी (सीपीएल) कार्यरत आहे. तसेच भारतातील आठ प्रमुख शहरांत म्हणजे मुंबई, दिल्ली, कोइम्बतूर, हैदराबाद, भोपाल, कोलकाता, बंगळूरु आणि पाटणा येथे तसेच आशियाच्या इतर भागांत रिजनल प्रोसेसिंग लॅबॉरेटरीज आहेत (आरपीएल). प्रिव्हेंटिव्ह डायग्नोसिससाठी कंपनीकडे ६२० हून अधिक चाचण्या तसेच १३० प्रोफाइल टेस्ट्स आहेत. यात प्रामुख्याने थायरॉइड, मधुमेह, हृदयरोग, अ‍ॅनिमिया, वंध्यत्व, तसेच क्षय, इ. आजारांचा समावेश होतो. कंपनीच्या आरोग्यम् या प्रसिद्ध ब्रँडअंतर्गत पन्नासहून अधिक चाचण्या केल्या जातात. आपल्या सेवा आणि व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी कंपनीने अद्ययावत तंत्रज्ञान, ब्रँड आणि मजबूत प्रणालींवर लक्ष केंद्रित केले आहे. कंपनी आपल्या सेवा देशभरातील ६,३५० हून अधिक अधिकृत सेवा केंद्रातून पुरवत असून काही सेवा ऑनलाइनही पुरवत आहे. कंपनीची न्यूक्लिअर हेल्थकेर लिमिटेड ही १०० टक्के उपकंपनी असून त्याद्वारे कंपनी कर्करोगाशी संबंधित अनेक सेवा व चाचण्या पुरवते. न्यूक्लिअर सध्या १२ इमेजिंग सेंटर्सद्वारे १४ पेट सीटी स्कॅन ऑपरेट करीत आहे. आगामी कालावधीत थायरोकेअर टेक्नॉलॉजीज अनेक नव्या चाचण्या अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे पुरवणार असून त्याची सुरुवात चीनच्या तंत्रज्ञान साहाय्याने झाली आहे.

कंपनीचे डिसेंबर २०१९ साठीचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. मात्र सप्टेंबर २०१९ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने उलाढालीत १२.७६ टक्के वाढ साध्य करून ३७.४३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो तब्बल ४१.०१ टक्क्यांनी जास्त आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी कंपनीने ‘आयपीओ’द्वारे आपल्या शेअर्सची नोंदणी शेअर बाजारात केली. त्या वेळी ४४६ रुपयांना दिलेला हा शेअर सध्या ५२५ रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. कुठलेही कर्ज नसलेली आणि केवळ ०.४ बीटा असलेली थायरोकेअर टेक्नॉलॉजीज ही सद्य परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक आहेच. पण दोन-तीन वर्षांत उत्तम परतावाही देऊ शकेल.

थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लि. 

(बीएसई कोड – ५३९८७१)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ५२७.०५

स्मॉल कॅप समभाग

प्रवर्तक : डॉ. ए. वेलूमनी

व्यवसाय : हेल्थकेअर लॅबोरेटरी

बाजार भांडवल : रु. २,७५० कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :   रु.  ६०५/४०७

भागभांडवल : रु. ५२.८४ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक    ६६.०६

परदेशी गुंतवणूकदार  १०.७१

बँक/ म्यु. फंड/ सरकार    १४.८१

इतर/ जनता    ८.४२

पुस्तकी मूल्य : रु. ८६.३

दर्शनी मूल्य :   रु. १०/-

लाभांश :  २००%

प्रति समभाग उत्पन्न :    रु. २०.३५

पी/ई गुणोत्तर : २५.५

समग्र पी/ई गुणोत्तर :    २९.५

डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.०३

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : १५५

रिटर्न ऑन कॅपिटल : ३१.२५

बीटा :    ०.४

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.