तृप्ती राणे

गेले अनेक दिवस आपण मंदीबाबत वाचतोय किंवा समविचारी मंडळींशी चर्चासुद्धा करतोय. आजूबाजूला कशा पद्धतीने उद्योगांची दैना होतेय हे आपण उघडय़ा डोळ्यांनी बघतोय. त्यात महागाईने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. महागाईचे उदाहरण द्यायला कांदा पुरे पडतोय असे म्हणायला हरकत नाही. शिवाय, बेरोजगारीचे जे आकडे ऑक्टोबर महिन्यासाठी प्रकाशित झाले आहेत, ते मागील तीन वर्षातील सर्वात जास्त आहेत – ८.५ टक्के. शिवाय प्रमुख पायाभूत क्षेत्रांमध्येसुद्धा वाढ न होता आकुंचन झाल्याचे निदर्शनास येत आहे. कंपन्यांनी वाढीव गुंतवणूक थांबवलेली आहे आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. कारण काय? येणारा काळ हा खडतर असल्याचे स्पष्ट दर्शविणारी ही चिन्हे आहेत. शिवाय ज्या उद्योगांनी कर्ज घेऊन मागच्या काळात पसारा वाढवायचा निर्णय घेतला, त्यांच्यासाठी तर हा काळ अजून वेदनादायी ठरणार असे वाटते. एकीकडे कमी होणारी मागणी, दुसरीकडे कर्जाचा डोंगर आणि तिसरीकडे वसुलीमध्ये अडकलेला पसा, अशा तिहेरी संकटात बरेच उद्योग सापडलेले आहेत. देशाची अर्थव्यवस्था काही सुस्थितीत आहे असे अजिबात म्हणता येणार नाही. कारण सरकारकडे करवसुली कमी झाली आहे त्यामुळे वित्तीय तूट मागील अंदाजांपेक्षा नक्कीच बऱ्यापैकी जास्त असणार. वार्षिक अंदाजाच्या ९३ टक्के तूट ही ऑक्टोबपर्यंत झाली आहे! आणि असे असूनसुद्धा शेअर बाजार मात्र वर चालला आहे. हे एक कोडेच आहे आणि त्याची उकल काय, याचा विचार प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात येत असेल. तर या मागचे कारण एकच परकीय गुंतवणूक! मागील दोन महिन्यांमध्ये देशामध्ये अशा तऱ्हेने आलेला पसा जरी भरपूर वाटत असला तरी त्याचा कल बऱ्यापैकी कमी जोखीम असणाऱ्या लार्ज कॅप शेअर्समध्ये आहे. गेले काही दिवस मिड आणि स्मॉल कॅपचे दिवस पालटायला लागले असे आज जरी वाटले, तरी हा आनंद फार दिवस टिकेल असे वाटत नाही.

एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून जेव्हा मी म्युच्युअल फंड किंवा थेट समभाग गुंतवणूक करते, तेव्हा माझ्या दोन अपेक्षा असतात. पहिली अशी की, या गुंतवणुकीतून मला दीर्घकालीन संपत्तीची निर्मिती करायची आहे, जेणेकरून माझ्या हयातीत मला ती पुरली पाहिजे. पुरून उरली तर अजून आनंद होईल. आणि दुसरी अशी की, माझे परतावे आणि संभावित नुकसानीच्या कक्षा मर्यादेत असाव्यात. भले छप्पर फाडून परतावे नाही मिळाले तरी चालतील पण नुकसानाची परिसीमा गाठली नाही तर जास्त बरे. पण आजच्या घडीला जेव्हा मी शेअर बाजाराशी निगडित एकरकमी गुंतवणूक करायचा विचार करते, तेव्हा या संभ्रमात पडते की, आज घातलेले पैसे पुढच्या एक वर्षभरात किती कमी होतील. याचा अर्थ असा मुळीच नाही की, माझी जोखीम घ्यायची क्षमता कमी आहे. परंतु एका गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे आणि ती म्हणजे माझ्या गुंतवणुकीची वेळ जर चुकीची ठरली आणि गरजेपेक्षा जास्त किंमत जर मी तिला दिली, तर शेअर बाजार पडल्यावर मला आधी त्या नुकसानाची भरपाई आणि मग पुढे फायदा होण्यासाठी खूप वाट बघावी लागेल.

शिवाय एका अजून महत्त्वाच्या गोष्टीकडे मला लक्ष ठेवावे लागते आणि ते म्हणजे माझे अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन, म्हणजेच कोणत्या गुंतवणुकीला पोर्टफोलिओमध्ये किती महत्त्व द्यायचे. जिथे मला नियमित मासिक मिळकत हवी आहे, तिथे मला सात ते आठ टक्के दर साल मिळकत देणारे गुंतवणूक पर्याय पोर्टफोलिओमध्ये ठेवणे हे आलेच. आणि काळानुसार पोर्टफोलिओ वाढावा यासाठी केलेली समभाग गुंतवणूक याच्यातून जरी प्रत्येक वर्षी नियमित वाढ अपेक्षित नसली तरीसुद्धा ४० ते ५० टक्के नुकसान बघताना मला नक्कीच थोडा त्रास होईल. अशातच जेव्हा माझ्याकडे असलेले पैसे हे मला पुरणार की नाही असा जेव्हा संभ्रम मनात येतो, तेव्हा नुकसान होऊ नये ही भावना तीव्र होते. मग अशा वेळी प्रश्न पडतो तो म्हणजे किती पैसे कुठे ठेवू? मार्केट पडेल या भीतीने सगळेच सुरक्षित ठेवू, तर पुढे नुकसान होईल. आणि जर समभाग निगडित गुंतवणूक करू तर नजीकच्या काळात तिथेसुद्धा धोक्याची घंटा वाजायला लागली आहे असे वाटते.

हा गुंता सोडविण्यासाठी मग मी माझ्या गरजा आणि त्यावर होणाऱ्या खर्चाकडे वळते. आजकाल आपण सगळेच ढीगभर जाहिरातींचे शिकार झालो आहोत असे म्हटले तर ती अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही. सकाळच्या पेपरपासून, मोबाइलमधील मेसेजेस, व्हॉट्सअ‍ॅपमधील चॅट्स आणि मेल उघडताच दिसणारे ‘सेल- सेल – सेल’ हे सर्व आपल्या पशाच्या मागे हात धुवून लागल्याची जाणीव करून देतात. ऑनलाइन व्यवहार आणि क्रेडिट कार्ड यांची सुविधा आज सर्वाकडे असताना जाणवते आणि त्यामुळेच गरज नसतानासुद्धा खरेदी केली जाते. काही बाबतीत तर ऐपत नसतानासुद्धा कर्ज घेऊन गाडी, महागडे मोबाइल, क्लबची मेंबरशिप हे सगळे इतके सहजपणे होते की, आपण त्याच्या विळख्यात आत ओढले जातोय हे समजेस्तोवर वेळ निघून गेलेली असते.

तेव्हा येणाऱ्या आव्हानात्मक काळामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदाराने चौकस राहणे जास्त गरजेचे आहे. तुमच्या पोर्टफोलियोमधील समभाग निगडित गुंतवणुकीच्या परताव्यावर आणि जोखमीवर नियमित लक्ष ठेवा. २८ चा पी/ई खूप जास्त आहे, तेव्हा नवीन एकहाती गुंतवणूक करताना नीट विचार करा. शिवाय ज्या पोर्टफोलिओमध्ये चांगला फायदा झालेला असेल तिथे टप्प्याटप्प्याने फायदा कमावून बाजूला ठेवावा. ज्या गुंतवणूकदाराने ‘एसडब्ल्यूपी’चा अवलंब केला आहे, त्याने तर मार्केटमध्ये होणाऱ्या पडझडीकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. ‘एसआयपी’मार्फत गुंतवणूकदारांना जमेल तितकी जास्त बचत करून नियमित गुंतवणुकीमध्ये चिकाटीचा नक्की फायदा करून घेता येईल. रोखेसंलग्न गुंतवणूक करताना जास्त परताव्यामागे न धावता मुद्दल सुरक्षितता आणि मिळकत नियमितता यांच्यावर लक्ष असू द्या. ‘सेल- सेल – सेल’च्या मागे वेडे न होता, हातचा पसा राखून येणाऱ्या कठीण काळात मिळणाऱ्या गुंतवणूक संधीचा चांगला फायदा करून घेता येईल.

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार )

trupti_vrane@yahoo.com