25 February 2021

News Flash

कर बोध : कर बचत गुंतवणुकीचे पुरावे वेळेत सादर करा

प्राप्तिकर कायद्यानुसार पगारावर टीडीएस कापण्याची संपूर्ण जबाबदारी पगार देणाऱ्यावर टाकली आहे

(संग्रहित छायाचित्र)

प्रवीण देशपांडे

आर्थिक वर्ष २०१९-२० संपण्यास आता फक्त दोन महिने शिल्लक राहिले आहेत. करसवलतीच्या गुंतवणुका ३१ मार्च २०२० पूर्वी केल्यास या गुंतवणुकीच्या वजावटी उत्पन्नातून घेता येतात. पगारदार करदात्यांना या गुंतवणुकीचे पुरावे त्यांच्या कंपन्यांना (नियोक्त्यांना) वेळेत सादर करणे गरजेचे आहे. हे पुरावे वेळेत सादर न केल्यास जास्त उद्गम कर (टीडीएस) कापला जाऊ शकतो.

प्राप्तिकर कायद्यानुसार पगारावर टीडीएस कापण्याची संपूर्ण जबाबदारी पगार देणाऱ्यावर टाकली आहे. हा टीडीएस कर्मचाऱ्याने वर्षांच्या सुरुवातीला दिलेल्या गुंतवणुकीच्या किंवा खर्चाच्या घोषणापत्रानुसार कापला जातो. या घोषणापत्रानुसार वर्षांच्या सुरुवातीपासून, म्हणजे एप्रिल महिन्यापासून, टीडीएस कापला जातो. वर्ष संपण्यापूर्वी या घोषणापत्रानुसार गुंतवणूक किंवा खर्च झाला आहे की नाही हे तपासून बघण्याची जबाबदारीसुद्धा पगार देणाऱ्याचीच आहे. यासाठी गुंतवणूक आणि खर्चाचे पुरावे तपासून त्यानुसार करपात्र उत्पन्नाची गणना आणि करदात्याच्या करदायित्वाची पुनर्गणना वर्ष संपण्यापूर्वी करून त्यानुसार योग्य टीडीएस मार्च २०२० पूर्वी कापणे अपेक्षित आहे. गुंतवणूक आणि खर्चाचे पुरावे सादर करण्यासाठी कंपनी एक ठरावीक तारीख निश्चित करते, त्या तारखेपर्यंत कर्मचाऱ्याने हे पुरावे सादर केले तरच ती गुंतवणूक किंवा खर्च, वजावटीसाठी विचारात घेतला जातो. ही तारीख सर्वस्वी कंपनीच्या धोरणानुसार ठरविली जाते. कर्मचाऱ्यांनी पुरावे वेळेत सादर न केल्यास त्याची वजावट ग्राह्य़ न धरता टीडीएस कापला जातो.

कोणत्या वजावटीसाठी कोणते पुरावे सादर करावे यासाठी प्राप्तिकर कायद्यात नियम आखून दिलेले आहेत. या वजावटी घेण्यासाठी कर्मचाऱ्याने फॉर्म १२ बीबी कंपनीला पुराव्यासोबत सादर करावा लागतो. काही प्रमुख वजावटीसाठीचे पुरावे खालीलप्रमाणे :

* घर भाडे भत्ता (एचआरए) : करदात्याला पगारातून घरभाडे भत्ता मिळत असेल आणि तो भाडय़ाच्या घरात राहात असेल तर या कलमाद्वारे घरभाडे भत्त्याची (इतर अटींची पूर्तता केल्यास) वजावट घेता येते. ही वजावट घ्यावयाची असल्यास करदात्याने कंपनीला भाडे करार, भाडे पावत्या, घरमालकाचा ढअठ (घरभाडे एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर) इत्यादी पुरावे सादर करावेत.

* रजा प्रवास सवलत (एलटीसी) : ज्या करदात्यांना ‘एलटीसी’ची सवलत घ्यावयाची आहे, त्यांनी प्रवासाची बिले आणि पावत्या कंपनीला द्याव्या.

* गृह कर्जावरील सवलत : यामध्ये ‘कलम २४’नुसार गृह कर्जावरील व्याजाची वजावट आणि ‘कलम ८० सी’नुसार मुद्दल परतफेडीच्या वजावटीचा समावेश होतो. ज्या बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले आहे त्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडून व्याज आणि मुद्दल परतफेडीचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. हे प्रमाणपत्र ३१ मार्चपर्यंतच्या व्याजाचे आणि मुद्दल परतफेडीचे असले पाहिजे. परंतु असे प्रमाणपत्र ३१ मार्चपूर्वी देता येत नसल्यामुळे, अशा संस्थांकडून अस्थायी (प्रोव्हिजनल) प्रमाणपत्र घेऊन कंपनीला सादर करता येते. या दोन्ही कलमानुसार वजावटी घराचा ताबा घेतल्यानंतरच घेता येतात.

*  मेडिक्लेम आणि वैद्यकीय खर्च (कलम ८० डी): या कलमानुसार मेडिक्लेम विमा हप्त्याची पावती आणि वैद्यकीय खर्च आणि तपासणीची बिले आणि पावत्या कंपनीला सादर कराव्यात.

* ‘कलम ८० सी’ खालील गुंतवणुका आणि खर्च : या कलमानुसार केलेल्या गुंतवणुका आणि खर्चाच्या पावत्या जमा करून कंपनीला सादर कराव्या. प्रत्यक्ष गुंतवणूक किंवा खर्च केल्यावरच या कलमानुसार वजावट घेता येते. या कलमानुसार प्रामुख्याने गृह कर्जाची मुद्दल परतफेड, शाळेची फी, विमा हफ्ता, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम, पोस्टाच्या योजनांमधील गुंतवणूक आदींचा समावेश होतो.

* राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) : करदाता ज्या कंपनीत नोकरी करतो अशा कंपनीने कॉर्पोरेट राष्ट्रीय पेन्शन योजना घेतली असेल तर या योजनेत कंपनी करदात्याच्या वतीने पैसे भरते. त्याची माहिती कंपनीकडे असते, परंतु, करदात्याने या व्यतिरिक्त ‘एनपीएस’मध्ये पैसे भरले असल्यास त्याची माहिती करदात्याने कंपनीला द्यावी.

* घर भाडे (कलम ८० जीजी): ज्या करदात्यांना घरभाडे भत्ता मिळत नाही, ज्यांचे स्वतचे घर नाही आणि जे भाडय़ाच्या घरात राहतात अशांना दरमहा ५,००० रुपयांपर्यंत वजावट उत्पन्नातून मिळू शकते. अशांनी ‘फॉर्म १० बीए’नुसार घोषणापत्र सादर केले पाहिजे.

जे कर्मचारी या आर्थिक वर्षांत एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत रुजू झाले असतील म्हणजेच वर्षभरात एका पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरी केली असेल तर त्या कर्मचाऱ्यांनी, पूर्वीच्या किंवा दुसऱ्या कंपनीकडून मिळालेला पगार आणि त्यावर कापलेला टीडीएस याची माहिती वर्तमान (किंवा कर्मचाऱ्याने निवडलेल्या) कंपनीकडे लिखित स्वरूपात ‘फॉर्म १२ बी’मध्ये सादर करावी. या माहितीच्या आधारे वर्तमान (किंवा कर्मचाऱ्याने निवडलेल्या) कंपनीला एकूण उत्पन्नावर टीडीएस कापावा लागेल.

जे कर्मचारी कंपनीने निश्चित केलेल्या मुदतीत गुंतवणूक आणि खर्चाचे पुरावे सादर करू शकणार नाहीत किंवा त्या वेळेत गुंतवणूक करू शकणार नाहीत त्यांनी ३१ मार्चपूर्वी गुंतवणूक किंवा खर्च करून ती वजावट विवरणपत्र भरताना विचारात घेऊन कर परताव्याचा (रिफंड) दावा करावा. परंतु ‘एलटीसी’सारखी वजावट फक्त कंपनीलाच विचारात घेता येते.

जे करदाते पगारदार नाहीत त्यांनी गुंतवणूक आणि खर्च ३१ मार्चपूर्वी करणे गरजेचे आहे. अगदी शेवटच्या घटकेपर्यंत न थांबता त्या आधीच गुंतवणूक करावी जेणेकरून योग्य त्या प्रकारातच गुंतवणूक होइल. बऱ्याचदा असे घडते गुंतवणुकीचा शेवटचा दिवस आलेला असतो आणि करदात्यासाठी अयोग्य असणाऱ्या विमा योजनेत किंवा ‘ईएलएसएस’मध्ये पैसे गुंतविले जातात. त्यामुळे ज्या करदात्यांनी अद्याप गुंतवणूक केलेली नाही त्यांनी त्याचा अभ्यास करून योग्य प्रकारात गुंतवणूक करावी.

अर्थसंकल्पातून सवलती की वाढीव करभार?

अर्थसंकल्प दहा दिवसावर येऊन ठेपला आहे. घटता वृद्धीदर, वाढता महागाई दर या पाश्र्वभूमीवरचा हा अर्थसंकल्प सरकारसाठी एक आव्हान आहे. मागील वर्षांत कंपन्यांचा प्रत्यक्ष कर कमी करण्यात आला आणि अप्रत्यक्ष कररचनेमध्ये सुसूत्रीकरण करण्यात आले, जेणे करून करदात्यांना होणारा त्रास कमी करण्याचा दृष्टीने पावले उचलण्यात आली. करचोरीवर आळा घालण्यासाठी कायद्यात विविध तरतुदींचा समावेश झाला. वैयक्तिक करदात्यांसाठी कराचा स्लॅब मागील सहा वर्षांपासून बदललेला नाही. कमी उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना सवलती देण्यात आल्या आणि अति-श्रीमंत करदात्याचा अधिभार वाढविला. त्यामुळे त्यांना सात टक्क्य़ांपर्यंत जास्त कर भरावा लागत आहे. येत्या अर्थसंकल्पाकडून वैयक्तिक करदात्यांच्या अनेक अपेक्षा आहेत. यामध्ये कराचा स्लॅब वाढविणे, वजावटींमध्ये वाढ करणे, करमुक्त भत्त्यांमध्ये वाढ करणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

यंदाचा १ फेब्रुवारी २०२० हा दिवस शनिवार आहे. शेअर बाजार शनिवारी बंद असतो. परंतु अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवार असून तो चालू असणार आहे. शेअर बाजाराला उत्तेजन देण्यासाठी दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर, लाभांश वितरण कर यावर काही सवलती मिळण्याची अपेक्षा आहे. तरी या अर्थसंकल्पात कोणते नवीन कर आणतील, कोणत्या सवलती जाहीर होतील, कोणत्या सवलती कमी होतील हे   १ तारखेला समजेलच.

* लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.

pravin3966@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 4:08 am

Web Title: timely submit proof of tax savings investment abn 97
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : ‘वायु’वेगाने विस्तार दृष्टिक्षेपात
2 बंदा रुपया : ‘सह्य़ाद्री’ची उंची!
3 अर्थ वल्लभ : आजवर ज्यांची वाहिली पालखी..
Just Now!
X