News Flash

फंडाचा  ‘फंडा’.. : अन्य देशिं चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू

दीर्घकालीन दृष्टिकोनातून जागतिक नाममुद्रांत गुंतवणूक करणे ही एक अत्यंत धोरणी रणनीती आहे

अतुल कोतकर : atul@sampannanivesh.com

नाममुद्रांकित उत्पादनांचा उपभोग घेण्याची उपभोगत्यांची आस दिवसेंदिवस वाढत आहे. माध्यमांचा आवाका वाढल्याने महानगरांत आणि खेडय़ात राहणाऱ्यांच्या जीवनशैलीतील अंतर कमी झाले आहे. साहजिकच आधुनिक जीवनावर जागतिक नाममुद्रांचा प्रभाव वाढत आहे. एखाद्या दशकापूर्वी नाममुद्रा या विलासी जीवनाशी निगडित होत्या. उदाहरणार्थ रेबॅनचा गॉगल. परंतु वर्तमानात वस्त्र, घरगुती उपकरणे, रोजच्या वापरातील वस्तू या सर्वावर जागतिक नाममुद्रांचा प्रभाव आहे. सकाळी उठल्यापासून रात्री अंथरुणावर झोपण्यापर्यंत हा प्रभाव कायम असतो. आपण सर्वच या नाममुद्रांचे गुलाम आहोत. सकाळी उठल्यावर कोलगेट किंवा युनिलिव्हरच्या एखाद्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी वापरावयाच्या उत्पादनाने आपली सुरुवात होते. ‘केलॉग्ज’ किंवा ‘ड्रमस्टिक’ची न्याहरी, ‘ह्य़ुंदाई’ किंवा ‘टोयोटा’ची चारचाकी, ‘सुझुकी’ किंवा ‘होंडा’ची दुचाकी कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी वापरतो. कार्यालयात ‘डेल’ किंवा ‘एचपी’चा वैयक्तिक संगणक, ज्यावर चालते ती ‘मायक्रोसॉफ्ट’ची संगणकीय कार्यप्रणाली, ‘अ‍ॅपल’चा आयफोन किंवा ‘सॅमसंग’चा हँडसेट हे सर्व खरेदी करण्यासाठी मास्टरकार्ड किंवा व्हिसाचे क्रेडिट / डेबिट कार्ड, संध्याकाळी ‘मॅकडी’ किंवा ‘डॉमिनो’ अशा नाममुद्रा (ज्या भारतात गुंतवणुकीसाठी उपलब्ध नाहीत) आपल्या दैनंदिन जीवनाच्या अविभाज्य भाग आहेत.

‘सुंदरम ग्लोबल ब्रँड फंड’ हा फंड जगप्रसिद्ध नाममुद्रा ज्यांच्या मालकीच्या आहेत अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा फंड आहे. हा एक फंड ऑफ फंड असून या फंडाची ६०.०९ टक्के गुंतवणूक अमेरिकेतील कंपन्यांत, तर ३०.०७ टक्के गुंतवणूक जगाच्या उर्वरित भागात स्थापन झालेल्या कंपन्यांतून आहे. ‘सुंदरम ग्लोबल ब्रँड फंडा’च्या गुंतवणुकीत डेम्लर एजी (मर्सिडीज), वॉल्ट डिस्ने, अल्फाबेट (गुगल), अ‍ॅमेझॉन डॉटकॉम, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन, कोका-कोला, फेसबुक, नाइके, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, आयबीएम, होंडा मोटर्स, पेप्सिको या व अन्य कंपन्यांचा समावेश आहे. सुंदरम ग्लोबल अ‍ॅडव्हान्टेज फंडाची २१ नोव्हेंबर २०१९ पासून फेररचना करण्यात आली. रोहित सेक्सारिया आणि रतीश बी वॅरियर हे या फंडाचे निधी व्यावस्थापक असून ‘डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अ‍ॅव्हरेज टीआरआय’ हा या फंडाचा मानदंड म्हणून निश्चित करण्यात आला. सुंदरम ग्लोबल अ‍ॅडव्हान्टेज फंड प्रामुख्याने उदयोन्मुख बाजारपेठा, स्थावर मालमत्ता आणि जिन्नस यात गुंतवणूक करणारा फंड होता. पुनर्रचनेनंतर हा फंड जागतिक नाममुद्रांतून गुंतवणूक करतो. फंडाच्या बहुसंख्य गुंतवणुका विकसित बाजारपेठांशी निगडित कंपन्यांमध्ये आहे. कारण बहुतेक जागतिक नाममुद्रांची मालकी असलेल्या कंपन्या या अमेरिका, जर्मनी, जपान इत्यादी विकसित बाजारपेठेत उदयाला आल्या आहेत.

जागतिक गुंतवणुकीचे बरेच फायदे आहेत. तुम्हाला जागतिक विकासाच्या संधींचा फायदा होतो. जो भारतीय भांडवली बाजारामध्ये उपलब्ध नाही. भारतीय कंपन्यांकडे जागतिक स्तरावरील उत्पादन क्षमता, ग्राहक आणि वितरण व्यवस्था उपलब्ध नाही. जर आपण आपली गुंतवणूक भारतीय बाजारपेठांपुरती सीमित केली तर आपण वैश्विक पातळीवर गुंतवणुकीच्या संधींना मुकतो. यापैकी बऱ्याच कंपन्या जसे की इंटरनेटशी निगडित (अल्फाबेट, फेसबुक), ई-कॉमर्स मंच (अ‍ॅमेझॉन) यासारख्या उदयोन्मुख व्यवसायातील असून, अशा गुंतवणुकीच्या संधी भारतात उपलब्ध नाहीत. जागतिक शेअर बाजारात गुंतवणूक करून आपल्याला गुंतवणुकीत वैविध्य आणता येते. ज्यामुळे आपल्या पोर्टफोलिओला स्थैर्य लाभते. भारतीय रुपयाच्या अमेरिकी डॉलरबरोबर विनिमय दरातील घसरणीचा फायदा तुम्हाला मिळू शकेल. गेल्या १० वर्षांत रुपया डॉलरच्या तुलनेत वार्षिक ३.६७ टक्क्यांनी घसरला आहे. भारतात महागाईचा दर अधिक असल्याने ही घसरण निरंतर सुरूच राहील. दीर्घकालीन दृष्टिकोनातून जागतिक नाममुद्रांत गुंतवणूक करणे ही एक अत्यंत धोरणी रणनीती आहे. या जगातील सर्वात सुदृढ कंपन्या असून आपण ज्या समस्यांचा सामना करत आहोत त्यासारख्या आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरदेखील या कंपन्यांची कामगिरी अधिकच चमकदार होण्याची शक्यता आहे. हा फंड ‘फंड्स ऑफ फंड’ प्रकारातील असल्याने या फंडातील तीन वर्षांनंतरचा लाभ ‘दीर्घकालीन भांडवली लाभ’ प्रकारात मोडतो.

सुंदरम ग्लोबल ब्रॅण्ड फंड

* फंड गट फंड ऑफ फंड्स

* फंडाची सुरुवात २४ ऑगस्ट २००७

* फंड मालमत्ता ५८ कोटी (३१ मार्च २०२१)

* मानदंड डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अ‍ॅव्हरेज टीआरआय

ज्या जागतिक नाममुद्रांची उत्पादने तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवून स्वीकारली आहेत अशा ‘ब्रॅण्ड्स’मध्ये गुंतवणुकीचा लाभ मिळवण्याची ही लहान वैयक्तिक गुंतवणूकदारांना संधी आहे.

सुनील सुब्रमणियम, मुख्य कार्यकारी अधिकारी, सुंदरम म्युच्युअल फंड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 12:03 am

Web Title: tips to invest in mutual funds sundaram global brand fund zws 70
Next Stories
1 रपेट बाजाराची : ‘बूस्टर डोस’
2 बाजाराचा तंत्र-कल : ही घडी अशीच राहू दे!
3 गोष्ट  रिझव्‍‌र्ह बँकेची :  दक्षिणेकडील बँकांवरील संकट; बँकिंग कायद्याची नांदी
Just Now!
X