|| कौस्तुभ जोशी

आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन देश व्यापार करत असताना एकमेकांच्या व्यापारात कसे मुद्दाम अडथळे निर्माण करतात हे मागच्या दोन लेखातून आपण पाहिले. या अडथळ्यांचे प्रमुख दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार जकात किंवा परदेशी मालावर जबरदस्त कर आकारणे आणि दुसरा कर न आकारता अशा अटी लादणे की ज्यायोगे व्यापार करणे कठीण होईल! अशा प्रकारे दोन देशातील व्यापाराच्या निमित्ताने घडून येणाऱ्या चढाओढ आणि कर लादण्याच्या स्पर्धेला व्यापार युद्ध असे म्हणतात.

प्रत्येक देश आपल्या व्यापाराची धोरणे आपल्या देशातील आर्थिक परिस्थिती आणि आयात-निर्यात यातून आपल्याला किती फायदा होतो याचा विचार करून ठरवत असतात. ही आर्थिक धोरणे ठरवताना धोरणकत्रे आणि व्यापारी अशा दोघांचाही समावेश असतो. आपल्या देशातून निर्यात होणारा माल अधिकाधिक प्रमाणात कसा विकला जाईल तसेच परकीय मालामुळे आपल्या देशाचे व देशातील तोच माल उत्पादन करणाऱ्या उद्योजकांचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीने व्यापार धोरणे आखली जातात. मात्र अति प्रमाणात  ‘संरक्षणात्मक’ स्वरूपाची धोरणे जेव्हा व्यापार करणारे दोन्ही देश अमलात आणायचा प्रयत्न करतात तेव्हा त्याचे रूपांतर कालांतराने व्यापार युद्धात होते. एक प्रकारे दुसऱ्या देशाची कोंडी करण्यासाठीच हे धोरण स्वीकारले जाते. याचे अल्पकाळात चांगले परिणाम दिसून आले तरीही मुक्त व्यापाराच्या दृष्टीने व्यापार युद्धे धोकादायकच!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या वर्षी चीनविरुद्ध व्यापार युद्धाला सुरुवात केली होती. चीन आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुचित व्यापार करत आहे अशी अमेरिकेने जागतिक व्यापार संघटनेत तक्रार नोंदवून, चीनमधून येणाऱ्या प्रामुख्याने पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियमवर कर लादण्याचा इशारा दिला. याला प्रतिसाद म्हणून चीननेसुद्धा अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर कर वाढविण्याची घोषणा केली. जुल-ऑगस्टपर्यंत हे व्यापार युद्ध असेच ताणले गेले व अल्पकाळात आर्थिक अस्थिरतेचे वातावरण जगाला अनुभवण्यास मिळाले.

नुकत्याच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील घडून येणाऱ्या आयात-निर्यात व्यापारामध्ये र्निबधांची गरज आहे अशा आशयाचे विधान करून भविष्यात अमेरिका भारतातून येणाऱ्या वस्तूंवर कर लादू शकते असा इशाराच दिला आहे.

व्यापार युद्धाला इतिहासातही परंपरा आहे आणि मागील शतकात अशी अनेक रोचक व्यापार युद्धे घडली आहेत. १९६०च्या सुरुवातीला फ्रान्स-जर्मनी यांनी अमेरिकेतून  येणाऱ्या कोंबडय़ांवर आयात कर आकारला, जे ‘चिकन वॉर’ म्हणून प्रसिद्ध पावले. कुक्कुटपालनाच्या व्यावसायिकांचे नुकसान होत असल्यामुळे अमेरिकेने फ्रान्सहून आयात केल्या जाणाऱ्या ब्रांडीवर आणि आणि जर्मनीहून आयात केल्या जाणाऱ्या गाडय़ांवर कर लादला. १९८५च्या सुमारास अमेरिकेतील वस्तूंना युरोपात मुक्त वाव मिळत नसल्याचे कारण सांगून अमेरिकेने युरोपमधून येणाऱ्या पास्तावर कर आकारला. या ‘पास्ता वॉर’ला प्रत्युत्तर म्हणून युरोपने अमेरिकेतून येणारी लिंब आणि सुकामेवा याच्यावर जबरदस्त कर आकारला. साधारण वर्षभरानंतर दोन्ही बाजूतील यशस्वी समेटानंतर हा वाद संपला. बनाना वॉर – नव्वदीच्या दशकात युरोपने दक्षिण अमेरिका खंडातून आयात होणाऱ्या केळ्यांवर जबरदस्त कर लावला.

joshikd28@gmail.com

(लेखक वित्तीय नियोजनकार आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक)