श्रीकांत कुवळेकर

मागील पंधरवडय़ामध्ये आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कमॉडिटी बाजारामध्ये जोरदार चढ-उतार अनुभवायला मिळाले. नेहमीप्रमाणे कारण होते ‘आले ट्रम्पजीच्या मना’! अमेरिकेने बगदाद विमानतळावर हल्ला करून इराण आणि इराकमधील लष्करीदृष्टय़ा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना ठार केल्यावर आखातामध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे कच्च्या तेलाने अनेक महिन्यांमधील उच्चतम पातळी गाठली, तर सोन्याचा भाव विक्रमी ४१,५०० रुपयांपार जाऊन आला. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधील संघर्ष संपला नसला तरी दोघांमधील तणाव गेल्या आठवडय़ामध्ये चांगलाच निवळला आहे.

तर दुसरीकडे गेल्या एक वर्षांहून अधिक काळ चाललेल्या चीन आणि अमेरिकेमधील व्यापारयुद्धदेखील शमण्याची चिन्हे आहेत. भारतातील बहुतेक मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर या आठवडय़ात दोन्ही देश पहिल्या टप्प्याच्या व्यापार करारावर सही करतील असे संकेत ट्रम्प महाशयांनी दिले आहेत. याही घटनेवरून या दोन देशांमधील तणाव संपला असे म्हणता येणार नाही आणि यापुढील काळात दोन्ही प्रश्नांबाबत खटके उडतच राहणार असून त्याचा परिणाम कमॉडिटी बाजारांवर होतच राहणार आहे.

पहिल्या घटनेचा भारतासंदर्भात विचार करता दोन्ही देशांमधील युद्धात भारताचे खूप मोठे नुकसान होणार हे नक्की. एक तर इराण कच्च्या तेलाचा प्रमुख उत्पादक देश असून आपल्या आधिपत्याखालील होर्मूझच्या सामुद्रधुनीमधून ३५-४० टक्के तेलाची वाहतूक होत असल्यामुळे युद्धामुळे किंवा युद्धसदृश स्थितीमध्ये तेलाचे भाव चांगलेच वधारतील. सध्या आर्थिक संकटात असलेल्या भारताची अर्थव्यवस्था यामुळे अधिक खोल गत्रेत जाईल. शिवाय आधीच महागाईने त्रासलेल्या जनतेला पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायूबरोबर इतर वस्तूंच्या भाववाढीचे चटके बसून त्याचा सर्वच क्षेत्रांवर विपरीत परिणाम होईल.

याव्यतिरिक्त भारत इराणला साधा आणि बासमती तांदूळ, चहा, मसाले, सोयामिल आणि इतर अनेक प्रकारचा कृषी माल पुरवतो. इराणवर पाश्चिमात्य देशांनी टाकलेल्या र्निबधांचा बऱ्यापैकी फायदा भारताला व्यापारात होत होता. अमेरिकेशी युद्ध झाल्यास इराणशी या वस्तूंच्या व्यापारावर मोठा परिणाम होईल. मागील आठवडय़ामध्ये सोयाबीनच्या भावात पाच टक्क्यांची घसरण झाली होती. त्याचे मुख्य कारण होते इराणला सोयामिलच्या निर्यातीवर होऊ शकणारा विपरीत परिणाम. एकंदरीतच भारतात सोयाबीनचे भाव जागतिक पातळीपेक्षा खूप अधिक असून त्यामुळे त्यापासून निर्माण होणाऱ्या सोयामिलचे भावदेखील सुमारे सव्वाशे डॉलरने अधिक असल्यामुळे निर्यात सुमारे ७०-८० टक्के कमी झाली आहे. त्यातच इराण हा भारतीय सोयामिलचा प्रमुख आयातक असल्यामुळे युद्धाच्या भीतीने सोयाबीन वायदा नरम झाला.

परंतु, सोयाबीनसाठी जागतिक बाजारात सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये आफ्रिकन स्वाइन फ्लू रोगामुळे कोटय़वधी वराहांचा चीनमध्ये मृत्यू झाला होता. त्यामुळे पशुखाद्यासाठी सोयाबीनची मागणी चांगलीच कमी झाली होती; परंतु या संकटामधून चीन सावरत असून तेथील वराहपालन उद्योग परत एकदा वाढीस लागत असल्याच्या बातम्या आहेत. यामुळे चीन परत एकटा वार्षिक ९०-९२ दशलक्ष टन सोयाबीनची आयात करण्याचे संकेत देईल, असा बाजारात बोलबाला असून याचा फायदा सोयाबीनच्या किमतीला होईल. भारतात सोयाबीनचे भाव आधीच चढे असल्यामुळे या घटनेचा फार परिणाम झाला नाही तरी बाजाराचा कल तेजीचाच राहील असे वाटते.

याशिवाय केंद्र सरकारने मागील आठवडय़ात रिफाइंड तेलाच्या आयातीवर बंदी घातल्यामुळेदेखील बाजाराचा मूड सुधारला आहे. या निर्णयामुळे खाद्यतेले किंवा तेलबिया बाजारात मोठी उलथापालथ होणार नसली तरी आता येथील खाद्यतेल रिफायनरींना त्याचा मोठा फायदा होईल. याशिवाय स्थानिक पातळीवर तेलबिया क्रिशग वाढले तर सोयाबीनला मागणी वाढेल. या वर्षीच्या उत्पादनात मोठी घट आल्यामुळे जर थोडी जरी मागणी वाढली तर सोयाबीनच्या किमतीत चांगली वाढ होऊ शकते. मात्र अन्नपदार्थाच्या महागाईच्या भीतीपोटी सरकारने आयात शुल्कात घट केली तर सोयाबीनची किंमत नरम होऊ शकेल अन्यथा एप्रिल-मेपर्यंत विक्रमी ५,००० रुपये प्रतिक्विंटल अशक्य नाही.

गुंतवणुकीचा विचार केला तर वेलचीच्या वायद्यामध्ये नजीकच्या काळात चांगली वाढ संभवते. २०१८ मधील दुष्काळ, अतिवृष्टी यांसारख्या विविध समस्यांमुळे वेलचीचे उत्पादन मागील वर्षांत दोन दशकांतील नीचांकावर, म्हणजे ७,००० टनांपर्यंत पडल्यामुळे सप्टेंबरमध्ये वेलची वायदा प्रति किलो ४,२०० रुपये असा विक्रमी पातळीला पोहोचला होता. त्यानंतर भाव ३,७०० रुपयांवर येऊन आता परत ते ४,८००-५,००० रुपयांकडे मुसंडी मारेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या हाच भाव ३,९५० रुपयांवर आहे. थोडी जोखीम घेऊन यात चांगला नफा होऊ शकतो.

सरकारी सूत्रानुसार २०१९ मधील एप्रिल-नोव्हेंबरमध्ये कडधान्यांची आयात मागील वर्षांपेक्षा ४६ टक्क्यांनी वाढून ती २३ लाख टन एवढी झाली असल्यामुळे उडीद सोडता सर्व कडधान्यांच्या किमती नरम राहतील, तर कडधान्ये आयात संघटनेने उडीद आणि पिवळा वाटाणा यांच्या आयात कोटय़ामध्ये वाढ करण्यास सांगितले आहे. यामुळेदेखील तूर, मूग, हरभरा आणि मसूर किमती स्थिर किंवा थोडय़ा नरम राहतील.

शेवटी सराफ बाजाराचा मूड पाहू या. अमेरिका आणि आखाती देश यामधील संघर्षांचा परिणाम सोन्याची मागणी वाढण्यात होत असल्याने गेल्या आठवडय़ात सोन्याने प्रति तोळा ४१,५०० रुपयांचा विक्रम केला असला तरी नंतर भाव सुमारे १,५०० रुपयांनी घसरले आहेत. चांदीदेखील अशाच प्रकारचे चढउतार दाखवत आहे. या पाश्र्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीपासून दूर राहणे योग्य. सोने वायदा ३८,८०० रुपये प्रति १० ग्राम एवढा खाली आल्यास अल्पकाळासाठी गुंतवणूकयोग्य वाटत आहे.

पुढील दिवस हे अर्थसंकल्पापूर्वीचा शेवटच्या पंधरवडय़ाचे असल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून सकारात्मक बातम्या आल्यामुळे कमॉडिटी बाजाराला चांगले जातील अशी अपेक्षा आहे. तर अर्थसंकल्पातदेखील इंडेक्स वायदा परवानगी, कमॉडिटी व्यवहारांवरील करामध्ये मोठी घट अशा बाजारासाठी चांगल्या घोषणा होण्याची अपेक्षा आहे. बघू या, १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री बाजाराला काय भेट देतात ते.

लेखक वस्तू बाजार विश्लेषक आहेत.

ksrikant10@gmail.com