25 April 2019

News Flash

स्वागताचा जोश टिकेल काय?

निवडणूकपूर्व २०१९-२० चा अंतरिम अर्थसंकल्प अखेर हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी जाहीर केला.

|| अजय वाळिंबे

निवडणूकपूर्व २०१९-२० चा अंतरिम अर्थसंकल्प अखेर हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी जाहीर केला. अर्थसंकल्प अपेक्षेप्रमाणे वाटल्याने शेअर बाजाराने २१२.७४ अंशांची उसळी घेऊन या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. मात्र शेअर बाजाराचा हा जोश अजून किती दिवस कायम राहतो आहे हे तपासणे महत्त्वाचे ठरेल. शेतकरी, कामगार आणि मध्यवर्गीयांना दिलासा देतानाच भरीव संरक्षण तरतूद, वन रँक – वन पेन्शन आणि असंघटित कामगारांना किमान निवृत्ती वेतन जाहीर झाले आहे खरे, मात्र या घोषणांची अंमलबजावणी किती आणि कशी होते हे बघायला हवे. तसेच कुठलाही वाढीव कराचा बोजा नसल्याने किंवा कर रचनेत बदल नसल्याने आणि वस्तू सेवा करातील उत्पन्न घटल्याने जमा खर्चाचा मेळ जमवणे सरकारला कठीण जाणार आहे.

स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी मात्र या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. घर भत्त्यावरील वाढीव कर सवलत, ‘सेकंड होम’वरील भांडवली नफा करात सवलत तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या रिकाम्या सदनिकांवरील गृहीत भाडय़ाचे उत्पन्न अजून एक वर्ष स्थगित केले गेल्यामुळे बिल्डर लॉबी नक्कीच खूश झाली असणार. परंतु स्थावर मालमत्ता कंपन्या आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना सध्या भेडसावत असलेला रोख तरलतेचा (लिक्विडिटी) प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.

शिक्षण, तंत्रज्ञान आणि बेरोजगार युवकांसाठी विशेष काही नसले तरीही नाही म्हणायला या अर्थसंकल्पामुळे पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आणि प्रमाणित वजावटीत १०,००० रुपयांची वाढ मिळाल्याने मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला असल्याचे आभासी चित्र निर्माण करण्यात अंतरिम अर्थसंकल्पाचे अंतरिम अर्थमंत्री यशस्वी झाले आहेत.

गुंतवणूकदारांनी अशा अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व न देता कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीवर लक्ष ठेवावे. तसेच आगामी निवडणुका होईपर्यंत शेअर बाजारात खरेदी करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक ठरणार आहे.

दीर्घकालीन स्मॉल कॅप गुंतवणूक

सुमारे ३३ वर्षांपूर्वी जयंती पटेल आणि आशीष सोपारकर यांनी भागीदारीत गुजरात इंडस्ट्रीजची स्थापना केली. त्या वेळी गुजरातमधील वाटवा येथे पिग्मेंट ग्रीन ७ (पीजी ७) चे उत्पादन करण्यासाठी पहिला प्रकल्प त्यांनी उभारला. त्या वेळी वार्षिक २४० टन उत्पादन क्षमता असलेल्या या प्रकल्पाची क्षमता आज वार्षिक १२०० टन आहे. त्यानंतर कंपनीने गुजरातेत छरोडी, पानोली तसेच अंकलेश्वर येथे प्रकल्प उभारून विस्तारीकरण आणि उत्पादन क्षमता वाढविली. पैकी अंकलेश्नर आणि छरोडी येथे अ‍ॅग्रो केमिकल्सचे उत्पादन केले जाते, तर पानोली येथे सीपीसी ब्ल्यू या पिगमेंटचे उत्पादन केले जाते. पिगमेंट हे शाई, रंग, पेपर, प्लास्टिक, चामडे तसेच वस्त्रोद्योग अशा अनेक व्यवसायांत वापरले जात असल्याने कंपनीच्या उत्पादनांना मोठी मागणी असून तिची उत्पादने देशांत तसेच परदेशांत वापरली जातात. युरोप, उत्तर तसेच मध्य अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि आशिया इ. खंडातील सुमारे २० देशात कंपनी आपल्या उत्पादनांची निर्यात करते. कंपनीचीच काही उत्पादने इतर उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून वापरता येत असल्याने कच्च्या मालाचा योग्य अखंडित पुरवठा तसेच खर्चावर प्रभावी नियंत्रण शक्य होते. मेघमणीचे अनेक ब्रँड विकसित झाले असून त्यापैकी मेगा स्टार, मेगासायपर आणि मेगाफास्ट या ब्रँड्सना विशेष मागणी आहे. कंपनीचे डिसेंबर २०१८ अखेर समाप्त तिमाहीचे आर्थिक निष्कर्ष अजून जाहीर झालेले नाहीत. मात्र सप्टेंबर २०१८ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ३५३.८९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३१.२६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. हा नफा गेल्या आर्थिक वर्षांतील तिमाहीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी अधिक आहे.

हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत हंगामी अर्थसंकल्प जाहीर झालेला असेल. मात्र शेअर निवडताना अर्थसंकल्प कसाही असला तरी आपल्या गुंतवणुकीला नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावीच लागते. मेघमणी कंपनीचे वैशिष्टय़ म्हणजे ही कंपनी केवळ कीटकनाशक उद्योगात नसून पिगमेंटसारख्या रसायनाचेदेखील उत्पादन करते. त्यामुळेच अन्य कीटकनाशक कंपन्यांच्या तुलनेत तो आकर्षक वाटतो. सध्या ५२ आठवडय़ांच्या नीचांकावर असलेला हा शेअर अजूनही खालच्या भावात मिळू शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून हा स्मॉल कॅप शेअर तुम्हाला पोर्टफोलियोमध्ये ठेवायला काहीच हरकत नाही.

First Published on February 4, 2019 12:08 am

Web Title: union budget 2019 key points explained by loksatta economics expert part 28 2