25 April 2019

News Flash

अर्थसंकल्पातून अपेक्षापूर्ती की उपेक्षा?

या अंतरिम अर्थसंकल्पातून शेतकरी, सामान्य जनता, पगारदार वर्ग यांना आकर्षक सवलती देऊन जीवन जगण्यास सुसह्य़ केले गेले आहे.

|| आशीष ठाकूर

अर्थसंकल्प सादर झाल्यावरच्या सुखद वातावरणातही, गेला एक महिनाभर केंद्रबिंदू राहिलेला सेन्सेक्सवरील ३६,३०० व निफ्टीवरील १०,९०० च्या स्तराभोवतीच निर्देशांकाचा साप्ताहिक बंद झाला. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचे बंद भाव –

  • सेन्सेक्स : ३६,४६९.४३
  • निफ्टी : १०,८९३.७०

या अंतरिम अर्थसंकल्पातून शेतकरी, सामान्य जनता, पगारदार वर्ग यांना आकर्षक सवलती देऊन जीवन जगण्यास सुसह्य़ केले गेले आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपर्यंत आहे ते उत्पन्न करमुक्त तसेच बँक, पोस्टातील मुदत ठेवींवरील व्याजावरील उद्गम कराची मर्यादा (टीडीएस) ही १० हजारहून ४० हजारावर नेली. ग्रॅच्युइटीची करमुक्त मर्यादा ३० लाखावर नेली. अशा सवलतींमुळे सामान्यांची अपेक्षापूर्ती झाली असल्यामुळे  निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३६,८०० ते ३७,२०० आणि निफ्टीवर ११,००० ते ११,२०० असेल.

अर्थसंकल्प सादर झाल्यावर एकच प्रश्न विचारला जातो तो म्हणजे ‘वित्तीय तुटी’चे काय? या अर्थसंकल्पातदेखील वित्तीय तूट वाढू न देता ती ३.४ टक्के मर्यादेत राखू असे जरी आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले असले तरी यात सरकारने जे अनेक उत्पन्न गृहीत धरलेले आहे त्याचा वाटा आहे. जसे सरकारी कंपन्यांतील भागभांडवल विकून (निर्गुंतवणुकीतून) ८०,००० कोटी अपेक्षित होते. पण आजपर्यंत प्रत्यक्षात ३८,००० कोटीच साध्य झाले असताना, त्यात आणखी १० हजार कोटींची भर टाकत ९०,००० कोटींच्या उत्पन्नाचे लक्ष्य या अर्थसंकल्पात ठेवले आहे. निवडणूक वर्षांतील उरलेल्या तीन महिन्यात ते कसे काय गाठले जाणार हाच काय तो यक्षप्रश्न आहे. या प्रश्नांची उपेक्षा झाली तर मात्र निर्देशांकांत घसरणीचे परिणाम दिसतील. पुन्हा सेन्सेक्स ३५,७०० व निफ्टीवर १०,७०० पर्यंत खाली येऊ शकतो.

आता आपण तांत्रिक विश्लेषणातील प्रमेयांकडे वळू या.

कल निर्धारण रेषा (ट्रेंड लाईन) काढण्यासाठी दोन उच्चांकाचे / व दोन नीचांकाचे बिंदू ध्यानात घ्यावे लागतात. इथे प्रथम आपण उच्चांकाचे दोन बिंदू ध्यानात घेऊ . ज्यायोगे आपण सेन्सेक्सवरील ३६,३०० व निफ्टीवरील १०,९०० चा स्तर कसा काढला ते जाणून घेण्यास मदत होईल. त्यासाठी उच्चांकाचा एक बिंदू १९ डिसेंबर २०१८ चा सेन्सेक्सवरील उच्चांकाचा बिंदू ३६,५५४ व दुसरा उच्चांकाचा बिंदू १० जानेवारी २०१९ चा उच्चांक ३६,२६९ हे दोन उच्चांकाचे बिंदू जोडून जी कल निर्धारण रेषा काढली तीच त्या वेळचे मूल्य ही सेन्सेक्सवर ३६,३०० येत होती. त्याचप्रमाणे निफ्टीवर १९ डिसेंबर २०१८ चा उच्चांक १०,९८५ व दुसरा बिंदू १ जानेवारी २०१९ चा उच्चांक निफ्टीवर १०,९२३ असे हे दोन बिंदू जोडून जी कल निर्धारण रेषा काढली तीच ७ जानेवारीची किंमत ही १०,९०० येत होती.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on February 4, 2019 12:01 am

Web Title: union budget 2019 key points explained by loksatta economics expert part 32