|| वसंत माधव कुळकर्णी

युनियन व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड

यू  नियन फंड घराण्याने युनियन व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड हा व्हॅल्यु फंड गटातील फंड गुंतवणुकीस १४ नोव्हेंबरपासून खुला केला. युनियन फंड घराण्याचा कायम खुला असलेला पाचवा आणि विनय पहारीया हे युनियन म्युच्युअल फंडात मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून दाखल झाल्यापासून या फंड घराण्याचा हा कायम खुला असलेला तिसरा फंड असल्याने या फंडाची दखल घेणे गरजेचे वाटते. विनय पहारीया युनियन म्युच्युअल फंड घराण्यात मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून दाखल होण्यापूर्वी इंव्हेस्को आणि चोलामंडलम या दोन फंड घराण्यात कार्यरत होते. भारतीय अर्थव्यवस्थेविषयी त्यांची मते आणि विचार करण्याची पद्धत कळपाने वावरणाऱ्या निधी व्यवस्थापकांपेक्षा वेगळी आहे. जानेवारी २००८ पासून समभागांच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. ही घसरण ज्या वेगवेगळ्या कारणांमुळे झाली त्या दिशादर्शकांची स्थिती कोशातक क्रमांक १ मध्ये दाखविली आहे.

परिणामी बीएसई ५०० निर्देशांकाचे उत्सर्जन (पीई) २८ डिसेंबर २०१७ रोजी २४.८५ पटीवरून ३१ ऑक्टोबर रोजी २५.१६ पट झाले. निर्देशांकाने दिलेल्या परताव्याच्या दरातदेखील मोठी घसरण झाल्याने गुंतवणूक असलेल्या फंडाचा परतावा घसरला.

बीएसई ५०० निर्देशांकातील  समभागांची २८ डिसेंबर २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०१८ दरम्यान ८८ समभाग (१९%) वधारले. १७३ समभागांची (३७%) २५ टक्यांहून अधिक घसरण झाली. १६५ समभागांची (३५%) २५ ते ५० टक्के दरम्यान घसरण झाली. ४१ समभाग (९%) ५० ते ७५ टक्के दरम्यान घसरले. ५ समभागांची (५%) समभागांची ७५ टक्केपेक्षा अधिक घसरण झाली.

समभागांच्या किंमतीतील विस्तृत घसरणीमुळे ‘ग्रोथ’ संकल्पनेवर आधारित समभागांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा ‘व्हॅल्यू’ संकल्पनेवर आधारित गुंतवणूक करावी अशी परिस्थिती आहे.

साहजिकच निधी व्यवस्थापकांना योग्य समभागांची निवड करण्यास वाव असलेली परिस्थिती असल्याने नवीन गुंतवणूक करावी अशी आहे. या फंडाचा पोर्टफोलिओ मल्टी कॅप फंड प्रकारचा परंतु लार्ज कॅपकडे झुकलेला असेल. आर्थिक वर्ष २०१९ च्या उत्सर्जनावर आधारित सध्याचे निफ्टीचे मुल्यांकन १९ पट आहे. हे मुल्यांकन मध्यम स्वरूपाचे असून नवीन गुंतवणूक टाळावी अशा धोकादायक पातळीवर नक्कीच नाही.

विनय पहारीया यांची निधी व्यवस्थापक म्हणून कामगिरी समाधानकारक आहे. या फंडाच्या गुंतवणुकीचे सक्रीय व्यवस्थापन केले जाणार असून समभाग नेमक्या कुठल्या मुल्यांकनाला विकायचे याची निश्चिती समभाग खरेदी करण्याआधी केली जाईल फंडाचे निर्गुंतवणूकधोरण स्पष्ट असणे ही जमेची बाजू आहे.

या फंडाच्या पाच वर्षांतील नियोजनबद्ध गुंतवणुकीतून ९ ते १० टक्के वार्षिक परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. या पाश्र्वभूमीवर यूनियन बँकेसारख्या आघाडीच्या राष्ट्रीयकृत बँक पुरस्कृत युनियन म्युच्युअल फंडाकडून सदर झालेल्या या योजनेचा गुंतवणूकदरांनी आपल्या जोखीमांकानुसार एसआयपी पद्धतीनेच किमान पाच वर्षांसाठी गुंतवणुकीचा विचार करावा.

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)