आशिष ठाकूर

ऑक्टोबर महिन्याच्या सरतेशेवटीची निफ्टी निर्देशांकांची ११,६०० पर्यंत घसरणीची स्थिती ही तेजीची धारणा असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ‘नाकावर सूत असल्यागत होती’ त्या वेळेला सर्व गुंतवणूकदार चिंताग्रस्त होते. अशा वेळेला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला आपल्या बाजारात तेजी अवतरल्याने गुंतवणूकदारांच्या मनावरील ताण हलका होऊन, जी प्रसन्नता आली त्या भावना ‘फुलले रे क्षण माझे फुलले’ या हलक्या फुलक्या काव्यपंक्तीतून व्यक्त झाल्या. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४१,८९३.०६

निफ्टी : १२,२६३.५०

आता चालू असलेल्या तेजीला तीन टप्प्यांत विभागून, तिच्याबाबत गुंतवणूकदारांची मानसिक व आर्थिक तयारी या स्तंभातून अगोदरच करून घेतली गेली आहे. गेल्या दोन महिन्यांचा आढावा घेता- जेव्हा जेव्हा बाजारात मंदीचे घातक उतार येत होते, तेव्हा गुंतवणूकदारांना धीर दिला गेला आहे. उदाहरणच द्यायचं तर, ३१ ऑगस्टच्या ११,८०० वरून घरंगळत २४ सप्टेंबरला निफ्टी निर्देशांकांचा १०,८००चा नीचांक, तर काल परवाचा ११,६००चा नीचांक, या प्रत्येक घसरणीतही मंदी क्षणिक असून बाजारात पुन्हा सुधारणा होऊन, तेजीचं वरच लक्ष्य साध्य होईल, असे या स्तंभातील गेल्या दोन महिन्यांतील प्रत्येक लेखाचे सूत्र होतं. आता घडलंही तसंच. सरलेल्या सप्ताहात निर्देशांकांनी आपला पहिला व दुसरा टप्पा, सेन्सेक्सवर ४१,१०० ते ४१,७०० आणि निफ्टीवर १२,०५० ते १२,२५०चा टप्पा लीलया पार केला. आता निर्देशांकाचा तिसरा टप्पा हा हाकेच्या अंतरावर असून ते लक्ष्य म्हणजे सेन्सेक्सवर ४३,००० आणि निफ्टीवर १२,६०० असे असेल. हे लक्ष्य साध्य झाल्यास ठीक, अन्यथा अल्पमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी सावध होऊन या तेजीच्या प्रत्येक वाढीव टप्प्यावर, नफारूपी विक्री करणे श्रेयस्कर. डिसेंबर ते जानेवारीमध्ये बाजारात घातक उतार संभवतात आणि निर्देशांकाचं खालचं किमान लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३७,३०० ते ३६,५०० आणि निफ्टीवर ११,००० ते १०,८०० असे असेल.

वाचकांनी विचारणा केलेल्या समभागांच्या निकालपूर्व तिमाही विश्लेषणाकडे वळू या.

१) नोसिल लिमिटेड

> तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, ९ नोव्हेंबर

> ६ नोव्हेंबरचा भाव- १३७.४० रु.

>  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १३० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १३० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १४५, द्वितीय लक्ष्य १६०

ब) निराशादायक निकाल : १३० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ११५ रुपयांपर्यंत घसरण.

(समभागासंदर्भातील विचारणा- सक्षम सरोदे, प्रभाकर बांदोडकर यांच्याकडून)

२) इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

> तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, ११ नोव्हेंबर

> ६ नोव्हेंबरचा भाव- १५२.३५ रु.

>  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १४० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १४० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १६०, द्वितीय लक्ष्य १९०

ब) निराशादायक निकाल : १४० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १२५ रुपयांपर्यंत घसरण.

(समभागासंदर्भातील विचारणा- राजेंद्र कंकारिया, सचिन मुळे यांच्याकडून)

३) एनबीसीसी इंडिया लि.

> तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, ११ नोव्हेंबर

> ६ नोव्हेंबरचा भाव – २२.९० रु.

> निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २२ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २२ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २४.५०,द्वितीय लक्ष्य २८.

ब) निराशादायक निकाल : २२ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २० रुपयांपर्यंत घसरण.

(समभागासंदर्भातील विचारणा- विश्वास रिसबूड, गडकरी, भंपलवार यांच्याकडून)

ashishthakur1966 @gmail.com

लेखक भांडवली बाजार विश्लेषक