फंड-विश्लेषण
ज्या कंपन्यांचे कारखाने अथवा कार्यालये एकापेक्षा अधिक देशात आहेत, अशा कंपन्यांना बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा एमएनसी (Multi National Corporation) म्हटले जाते. मुळची इंग्लंड मधील युनिलिव्हर, ग्लॅक्सो, जर्मनीतील सिमेन्स, स्वीडनची एसकेएफ, अमेरिकेतील सिटी बँक वगैरेंचे व्यवसाय आपल्या देशात आहेत, तर मुळात आपल्या देशातील आयटीसी, टीसीएस, इन्फोसिस, टाटा स्टील्स, यांचे कारखाने कार्यालये एकापेक्षा अनेक देशात आहेत. गमतीचा भाग असा की मुळची भारतीय परंतु मालकी बदलल्यामुळे दाईची या जपानी कंपनीची भारतातील उपकंपनी म्हणजे रॅनबक्सी लॅबॉरेटरीज.
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात या कंपन्यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. जी वस्तू ज्या ठिकाणी किफायतशीररित्या तयार करता येते त्या ठिकाणी ती बनवून व कंपनीच्या ब्रॅन्डचा उपयोग करून जगात विकता येते. इंग्रज, फ्रेंच,पोर्तुगीज व्यापारी म्हणून भारतात आले याचे आधुनिक रूप म्हणजे एमएनसी कंपन्या. ईस्ट इंडिया कंपनी ही देखील बहुराष्ट्रीय कंपनी होती.
एमएनसी कंपन्यात गुंतवणूक करण्यामागची कारणे म्हणजे या कंपन्याचा आकार अवाढव्य असतो. कित्येक तेल कंपन्यांची विक्री भारताच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. अनेक देशात पसरलेला कारभार, त्यांनी वापरलेले तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन, कार्यक्षम कररचना व कंपनीची त्या त्या उद्योगक्षेत्रातली ब्रॅन्ड व्हॅल्यू या त्यांच्या उजव्या बाजू होय.
भारतातील पहिल्या दहा एमएनसी कंपन्या : मायक्रोसॉफ्ट – अमेरिका, आयबीएम-अमेरिका, नोकिया-फिनलंड, पेप्सीको-अमेरिका, रॅनबक्सी-जपान, नेस्ले-स्विर्झलड, कोकाकोला-अमेरिका, प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल-अमेरिका, सोनी कॉर्पोरेशन-जपान, सिटीग्रुप-अमेरिका.
आजच्या भागात आपण यूटीआय एमएनसी या फंडाबद्दल माहिती घेणार आहोत. ही योजना कायम गुंतवणुकीसाठी खुली असलेली (ओपन एंडेड) योजना आहे. अभियांत्रिकी, औषध निर्माण, ग्राहक उपयोगी वस्तू आदी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यात गुंतवणूक करून भांडवल वृद्धी कमावणे हा उद्देश आहे. लाभांश व भांडवल वृद्धी असे दोन प्रकारे या गुंतवणुकीतून फायदा करून घेता येतो. स्वाती कुलकर्णी या योजनेच्या निधी व्यवस्थापक आहेत. गुतंवणूक केल्यापासून एका वर्षांच्या आत गुतंवणूक काढून घेतल्यास १% अधिभार लागू होतो. या फंडाचा गुंतवणूक निधी जून २०१३ प्रमाणे २५६.३० कोटी रु. आहे. फंडाच्या परताव्यासाठी ‘सीएनएक्स एमएनसी’ हा निर्देशांक मानदंड स्वरूपात ठेवण्यात आला आहे. किमान रु. ५,००० भरून या योजनेत गुंतवणुकीस सुरुवात करता येते. बाजाराला सध्या उतरती कळा लागली आहे. त्यामुळे या फंडात आतापासून ‘एसआयपी’ करण्यास हरकत नाही.