नियंत्रित जोखीम, मध्यम परतावा
महागाई वाढतच राहणार हे शहाण्या गुंतवणूकदाराला वेगळे सांगावयाला नको. त्यामुळे पुढील एका वर्षांच्या गुंतवणुकीतून ८.७५ ते ९.०० टक्के दरम्यान म्हणजे महागाई दरापेक्षा सरस परतावा मिळणे आवश्यक आहे. या दृष्टीने नियंत्रित जोखीम, मध्यम परताव्याचा ‘शॉर्ट टर्म इन्कम फंड’ वर्षभरासाठी गुंतवणूक पर्याय असू शकतो.
पतधोरणात व्याजदर स्थिर राहणार की वाढणार अशा गोंधळलेल्या स्थितीत असलेल्या बाजाराला रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी पुन्हा धक्का देत यंदाच्या पतधोरणात, पाव टक्क्याने वाढवून रेपो दर ८ टक्क्यापर्यंत नेला. रिझव्र्ह बँकेच्या मते, भविष्यात महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाव टक्क्याची व्याजदरात वाढ गरजेची होती. चालू आíथक वर्षांत एकूण देशांतर्गत उत्पादनाचा दर ५% पेक्षाही कमी राहील, अशी शक्यता रिझव्र्ह बँकेने वर्तविली आहे. उत्पादन कमी म्हणजे खप कमी म्हणजे उत्पन्नही कमी. याचाच अर्थ महागाई वाढतच राहणार हे शहाण्या गुंतवणूकदाराला वेगळे सांगावयाला नको. अशा स्थितीत ‘शॉर्ट टर्म इन्कम फंड’ नियंत्रित जोखीम, मध्यम परताव्याचा गुंतवणूक पर्याय असू शकतो. म्हणून यंदा ‘यूटीआय शॉर्ट टर्म इन्कम फंडा’ची ओळख करून घेऊ –
स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजनांना व्याजदर व अर्थव्यवस्थेतील रोखता यांचा नेहमीच सामना करावा लागतो. जितकी रोखता जास्त तितका परतावा कमी. म्हणून ही जोखीम सांभाळण्यासाठी गुंतवणूक असलेल्या रोख्यांची सरासरी मुदत निधी व्यवस्थापक निश्चित करीत असतो. ज्या योजनेच्या रोख्यांची सरासरी मुदत पाच वर्षांपेक्षा कमी आहे अशा योजनांना ‘शॉॅर्ट टर्म इन्कम फंड’ असे म्हटले जाते. अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या मुदतीच्या रोख्यांच्या परताव्याच्या दरांच्या(आयआरआर) आलेखाला ‘यील्ड कव्र्ह’ म्हणतात. तत्कालीन ‘यील्ड कव्र्ह’ व योजनेच्या गुंतवणुकीतील रोख्यांची सरासरी मुदत यावरून पुढील एका वर्षांच्या परताव्याचा अंदाज बांधता येतो. सध्याच्या ‘यील्ड कव्र्ह’चा आकार एका वर्षांपर्यंत चढा तर एका ते दोन वर्षांपर्यंत उतरता; तर दोन वर्षांनंतर क्ष-अक्षाला समांतर आहे. या आकाराला ‘इन्व्हर्टेड यील्ड कव्र्ह’ म्हणतात. म्हणून पुढील एका वर्षांच्या गुंतवणुकीतून ८.७५ ते ९.०० टक्के दरम्यान परतावा मिळणे शक्य आहे.
* फंड वैशिष्टय़े:
हा फंड २३ जून २००३ रोजी पहिल्यांदा पुनर्खरेदीसाठी खुला झाला. जेव्हा व्याजदरांनी शिखर गाठलेले असते त्या वेळी निधी व्यवस्थापक दीर्घ मुदतीच्या रोख्यात गुंतवणूक करतो. कारण व्याजदर कपातीनंतर या रोख्यांच्या किमतीत वाढ होऊन फंडाच्या परताव्याचा दर वाढतो. महागाईचा दर कमी झाला नाही तर व्याजदर अजून वर जाण्यास वाव असल्यामुळे फंडाने गुंतवणूक केलेल्या रोख्यांची सरसरी मुदतपूर्ती डिसेंबरच्या फंड फॅक्ट शिटनुसार २.५८ वष्रे म्हणजे साधारणत: ३० महिने आहे. जी आजच्या परिस्थितीत जास्त वाटते. परंतु फंड व्यवस्थापन या जोखमीचे व्यवस्थापन करू शकेल, असे व्यवस्थापकाला वाटले तर चुकीचे आहे, असे म्हणता येणार नाही.
* गुंतवणूक कुठे?
मागील एका वर्षांचा (जानेवारी-डिसेंबर २०१३) परतावा ८.२% व सहा महिन्यांच्या ५.५% परतावा ठीक वाटतो. जानेवारी-डिसेंबर २०१२ या काळातील परतावा ९.८% व जानेवारी-डिसेंबर २०११ या कालावधीतील परतावा ९.५% होता. त्याआधीच्या काळात चढे व्याजदर पाहता मागील एका वर्षांतील कमी परताव्याला जुलै महिन्यातील रिझव्र्ह बँकेच्या रोखता कमी करण्याच्या धोरणाचा परिणाम म्हणून पाहावे लागेल. डिसेंबर २०१३ अखेरच्या पोर्टफोलिओनुसार रोख्यांच्या मुदतपूर्तीची सरासरी ३० महिन्यांची आहे. सरासरी मुदतपूर्वी जितकी कमी तितका परतावा कमी व तितकी जोखीमदेखील कमी. मागील १२ महिन्यांत ही सरासरी २३ महिन्यांपासून १६ महिने इतकी आहे. व्याजदरांमध्ये होत असलेल्या बदलानुसार पोर्टफोलिओची मुदतपूर्ती कमी- अधिक केली जाते. ही बाब या फंडाचे विश्लेषण करताना जाणवली. नोव्हेंबर २०१२ ते मे २०१३ या कालावधीत फंडाने क्रिसिल शॉर्ट टर्म बॉण्ड इन्डेक्सपेक्षा तब्बल ७७% अधिक परतावा दिला. मे ते डिसेंबर २०१३ या काला वधीत क्रिसिल शॉर्ट टर्म बॉण्ड इन्डेक्सपेक्षा परतावा २५% अधिक दिला. याचा परिणाम मागील एका वर्षांचा परतावा ८ टक्क्यांहून अधिक आहे. क्रिसिल शॉर्ट टर्म बॉण्ड इन्डेक्सच्या गेल्या ६० महिन्यांच्या चलत सरासरीपेक्षा ३० टक्क्यांहून अधिक आहे. डिसेंबर २०१३ अखेरच्या पोर्टफोलिओनुसार वेगवेगळ्या गुंतवणूक साधनाची टक्केवारी सोबतच्या आलेखात दिली आहे.
* काय करावे?
रोखे बाजारातील बदल लक्षात घेऊन आपल्या गुंतवणुकीत तत्परतेने बदल करणारा हा फंड आहे. १८० दिवसांच्या आत गुंतवणूक काढून घेतल्यास ०.७५% अधिभार लागणे ही गोष्ट खटकते. इतर अधिभार नसलेले फंड या सदरातून भविष्यात शिफारस करण्यात येतीलच. तूर्तास ‘नियंत्रित जोखीम, मध्यम अपेक्षित परतावा’ प्रकारच्या गुंतवणूकदारांनी एका वर्षांसाठी या फंडाचा जरूर विचार करावा.
ल्ल या फंडात गुंतवणूक करण्यासाठी GAIN  हा एसएमएस ५६७६७५६ या क्रमांकावर पाठवा.

रोख्यांच्या किमती आणखी खालावतील..
सुधीर अग्रवाल,
निधी व्यवस्थापक, यूटीआय शॉर्ट टर्म इन्कम फंड.
*  सध्या स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजनांची स्थिती कशी आहे?
– रिझव्र्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर सध्या १० वर्षांच्या सरकारी रोख्यांच्या परताव्याचा दर जवळपास ८.६०% आहे. डिसेंबर महिन्यात महागाईचा दर कमी झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वीपासून रोख्यांच्या किमतीत व्याजदर स्थिर ठेवण्याच्या अपेक्षेने वाढ झाली होती. प्रत्यक्षात व्याजदरात पाव टक्क्याची वाढ झाल्यामुळे किमती आता खाली स्थिरावत आहेत.
* रिझव्र्ह बँकेच्या पतधोरणाचे संभाव्य परिणाम काय असू शकतात?
– रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. राजन यांनी देशाच्या आíथक परिस्थितीचे विश्लेषण करताना म्हटले तसे महागाई वाढण्याची शक्यता पूर्णपणे मावळलेली नाही. पुढील आíथक वर्षांचे पतधोरण १ एप्रिलला जाहीर होईल. अर्थातच हे पतधोरण जानेवारी व फेब्रुवारीच्या महागाईच्या दरावर ठरेल. त्यामुळे थोडा अवधी नक्कीच मिळणार आहे. या दोन महिन्यांत महागाईचा दर कमी झाला तर व्याज दरवाढ होणार नाही. रोखे बाजारात मार्च महिन्यात आíथक वर्षांचा अखेरचा महिना असल्यामुळे रोख्यांना मागणी कमी असते. म्हणून गुंतवणुकीवरचा परतावा जास्त असतो. त्यामुळे यापेक्षा जास्त काही बदल संभवत नाहीत.     
* पतधोरणाला अनुसरून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीत काय बदल केलेत?  
– आम्हाला व्याजदर वाढीची अपेक्षा होती. म्हणून जानेवारीच्या आमच्या पोर्टफोलिओत रोख्यांच्या सरासरी मुदतीत कपात झालेली दिसेल. अजूनही महागाई व त्याला अनुसरून व्याजदर वाढण्याची शक्यता असल्याने आम्ही आमच्या गुंतवणूक असलेल्या रोख्यांची सरासरी मुदत १८ ते २४ महिने दरम्यान असेल.
* स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांना तुम्ही काय सल्ला द्याल?
– फंडाच्या उद्दिष्टानुसार आम्ही रोख्यातील गुंतवणूक करताना रोख्यांची सरासरी मुदतपूर्ती १८ ते २० महिने राहील याची दक्षता घेतली आहे. ज्यामुळे भविष्यात रेपो दरात वाढ झाली तरी आमच्या एनएव्हीला त्याची कमीत कमी झळ पोहचेल. म्हणून मध्यम जोखीम व स्थिर उत्पन्न पाहणाऱ्या गुंतवणूकदारांना हा आदर्श फंड आहे.