News Flash

गुंतवणूकभान : असेल माझा हरी ..

व्याजदराच्या अपेक्षेने वाहन क्षेत्रातील काही शेअरचे भाव १०% हून अधिक वर गेले आहेत. पाव टक्क्यापेक्षा अधिक व्याज दरकपात येणार नाही म्हणून ज्या शेअरमध्ये शक्य असेल

| April 22, 2013 12:37 pm

व्याजदराच्या अपेक्षेने वाहन क्षेत्रातील काही शेअरचे भाव १०% हून अधिक वर गेले आहेत. पाव टक्क्यापेक्षा अधिक व्याज दरकपात येणार नाही म्हणून ज्या शेअरमध्ये शक्य असेल त्या शेअरमध्ये नफा कमावणे अधिक उत्तम.
उगवत्या सूर्याने काळोखाचे पाश दूर करावे आणि लख्ख प्रकाश पडावा असे काहीसे मागील आठवडय़ात भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत दिसले. शरपंजरी झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेस शैशवाचे घुमारे फुटू लागले आहेत.
भारतीय वेळेप्रमाणे शनिवारी पहाटे ३ वाजेपर्यंत म्हणजे न्युयॉर्क शेअर बाजार बंद होईपर्यंत पुढे काही नाटय़पूर्ण घटना घडतील याचा मागमूसही नव्हता. जणू वादळापूर्वीची शांतता नांदत होती. सकाळी उठून ज्या भारतीयांना अमेरिकेतील बंद भाव बघण्याची सवय आहे यांना आतरराष्ट्रीय बाजारात झालेला धरणीकंप जाणवला. शेवटच्या अध्र्या तासात सोन्याच्या भावात तब्बल ७० डॉलरची घसरण झाली होती. इथून सोन्याच्या भावात सुरु झालेली घसरण अजून सुरु आहे.
सोन्याच्या आणि कच्च्या तेलाच्या भावात झालेल्या घसरणीचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होऊन रुपया तब्बल १.७५% सुदृढ झाला. वितीय तुटीने गाठलेली कमाल मर्यादा भारताला पतकपातीच्या कडेलोटापर्यंत घेऊन गेली होती. अर्थसचिव व इतर अधिकारी पतमापन संस्थांना विनवीत असलेली जगाने पाहिले. त्यातून त्यांची हतबलता दिसत होती. कितीही कठोर शिस्त पालनामुळे अर्थव्यवस्था रुळावर आली नसती ती न्यूमॅक्सवरील अध्र्या तासातील घडामोडीने येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या मुळे भारताची वित्तीय तुट ४% पर्यंत राहील या गोष्टीने भारताला दिलासा दिला. सोन्याचा आणि कच्च्या तेलाचे भाव गडगडणे हे भारतीय अर्थ व्यवस्थेसाठी सुचिन्ह म्हणावयास हवे. भारताची सध्याची कच्च्या तेलाची(Oil Basket) खरेदीची सरासरी किंमत १०४ डॉलर/पिंप आहे. तेल खरेदीची किंमत ही दीर्घ कालीन ठरत असते. त्या मुळे लगेचच त्याचा परिणाम दिसणार नाही परंतु आठ नऊ महिन्याच्या कालावधीत ही किंमत ९८ डॉलर / पिंप येऊ शकेल.

एका अंदाजानुसार एक डॉलर/ पिंप किंमत कमी होणे म्हणजे साधारण ८०० कोटी रुपयांची बचत होते मागील आठवड्याची सांगता करताना ज्या गोष्टींचा बाजारावर परिणाम होईल असे भाकीत केले होते, त्याच गोष्टीमधील सकारात्मक घडामोडी आठवडय़ाच्या पूर्वार्धात निर्देशकाच्या वाढीस कारणीभूत ठरल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव अपेक्षेहून अधिक घसरणे, डॉलरच्या तुलनेत रुपया वधारणे, व मार्च महिन्याचा घाऊक किमतीवर आधारीत महागाईचा दर ६% हून कमी होणे या त्या गोष्टी होत. न्यूमॅक्सवर गुरुवारी बाजार बंद होताना कच्च्या तेलाचा भाव ९८.४० डॉलर/पिंप होता सोने व तेल यांच्या किमती घसरल्या व पुन्हा वर जाण्याची शक्यता सध्यातरी क्षीण असल्यामुळे २०१४ च्या पहिल्या तिमाहीची तुट ३.५% राहील असा अंदाज व्यक्त होत आहे.
थोडक्यात – रिझव्र्ह बँकेला जी भारतीय अर्थव्यवस्थेची परिणामे हवी होती ती या घसरणीमुळे दृष्टीपथात येत आहेत. म्हणून आजचे हे ‘असेल माझा हरी..’
८ एप्रिलला या स्थंभातून लार्जकॅप मधील स्टेट बँक, लार्सन टुब्रो व रिलायन्स या तीन Index Heavy weights ची शिफारस केली होती. दोन आठवड्याच्या कालावधीत तीनही शेअरच्या भावात ५ ते ८ % दरम्यान वाढ झाली. ही शिफारस करण्यामागे एक कारण होते म्हणजे उत्तम आíथक गुणोत्तरे असणारे शेअर दीर्घ काळ खालच्या स्तरावर रहात नाहीत. आणि सेन्सेक्स वर जाताना यांचे योगदान असणार होते. मागील आठवडय़ातील १८,२४२.५६ ते १९,०१६.४६ या सेन्सेक्सच्या वाढीत ४०० अंशाची वाढ एकटय़ा स्टेट बँकेमुळे झाली रिलायन्स निकालानंतर ४% हून अधिक घसरलेला रिलायंस पुन्हा स्थिरस्थावर होताना दिसत आहे.
रिलायन्सच्या अमेरिकेतील वायू उत्खानातून प्रथमच ११ दशलक्ष प्रमाणित घनफूट प्रती दिवस इतकी उत्पादनाची पातळी गाठली. तर केजी -डी६ या बंगालच्या उपसागरातील तेल क्षेत्रातून १६ दशलक्ष प्रमाणित घनफूट प्रती दिवस इतके उत्पादन होत आहे. यातील उत्पादनातील रिलायान्सचा वाट ६०% म्हणजे ९.६ दशलक्ष प्रमाणित घनफूट प्रती दिवस इतका आहे. सध्या अंतरराष्ट्रीय बाजारात ४ डॉलर /मिलियन मेट्रिक ब्रिटीश थर्मल युनिट या दराने हा वायू विकला जातो. भारतात या किंमतीचे पुन:मुल्यांकन व्हावे या साठी रिलायंस आग्रही आहे. केजी डी-१, डी-३ मधून वायू साठा आणखी चार वर्षे पुरेल असा अंदाज आहे या वायू क्षेत्रात रिलायन्सने ५०० दशलक्ष डॉलर गुंतवणूक उत्पादन वाढविण्यासाठी मागील तिमाहीत केली आहे. मग रिलायन्स या भावात घ्यायचा नाही तर कधी घ्यायचा?
आíथक वर्ष २०१३ हे भारतातील वाहन निर्मात्या कंपन्यांना मागील दशकातील सर्वात कमी वाढ दर्शवणारे वर्ष ठरले. चढे व्याज दर, वाढती माहागाई यांचा परिणाम सगळ्या प्रकारच्या वाहनाच्या खपावर याचा परिणाम झाला. मागील वर्षांचा विचार करता कमी संख्येने वाहने विकली, किंवा मामुली वाढ दिसून आली. याला अपवाद ठरली ती हलकी व्यापारी वाहने (टाटा मोटर्सचा एस, अशोक लेलॅन्डचा दोस्त व मिहद्राचे पिकअप) व एसयुव्ही गटातील वाहने. मागील वर्षभरात हलकी व्यापारी वाहनांच्या विक्रीच्या संख्येत १४% तर एसयूव्ही गटातील वाहनाच्या विक्रीच्या संख्येत ५२% वाढ झाली. या वर्षांत वाहनांच्या विक्रीतील उतरता कल स्थिर होऊन वर्षांच्या उत्तरार्धात सर्वच प्रकारच्या वाहनांच्या संखेच्या खपात वाढ दिसून येईल असा अंदाज आहे.
बजाज ऑटोच्या एकूण विक्रीत १०.२% घट झाली तर विकलेल्या वाहनांच्या संख्येत ५.९% घट झाली. परंतु तीन चाकी वाहनांच्या संख्येत ५.२% वाढ झाली या वर्षी चांगला पाउस व अपेक्षित असलेली व्याज दर कपात यांचा विचार केल्यास वर्ष भरात एकूण विकलेल्या वहानांच्या संख्येत १०-१२% वाढ शक्य आहे. मागील बारा महिन्यात मारुतीने विकलेल्या गाडय़ांच्या संख्येत ४.८% घट झाली असून विक्री १३.२% घटेल असा अंदाज आहे. मारुतीच्या वाहन मालिकेतील लहान गाड्या ए स्टार, वॅगन आर, अल्टो या सर्वात जास्त बाधीत झाल्या असून त्यांच्या संख्येत १३.९८% घट झाली आहे. स्विफ्ट डिझायर व नव्याने बाजारात उतरवलेली एलयुव्ही गटातील एरटीगा या मारुतीच्या मालिकेतील यशस्वी गाड्या असून सर्वात वेगाने विक्री वाढणाऱ्या (एसयुव्ही व्यतिरिक्त) गाडय़ा आहेत. डिसेंबर २०११ मध्ये ४३% असणारा बाजार हिस्सा नवीन गाडय़ा  बाजारात उतरविल्या नंतर बाजार हिस्सा ५०%चा टप्पा ओलांडण्यास कंपनीला यश आले आहे. दुचाकी वाहन निर्मात्यामध्ये बजाज ऑटो तर प्रवासी वाहने निर्मात्यांमध्ये मारुतीची शिफारस करावीशी वाटते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2013 12:37 pm

Web Title: vehicle market effect on shares market
Next Stories
1 वित्त-वेध : युलिप वरदान की शाप?
2 पोर्टफोलियो : मध्यम ते दीर्घ योग्य
3 गुंतवणूकभान : काय घ्यावे, काय विकावे, न उमजे मजला ..स्वस्थ बसावे?
Just Now!
X